Friday, 23 March 2018

कॉ. दत्ता देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त... 'लोकजागर कलापथक गाणी श्रमिकांची' या कार्यक्रम

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कचरा वाहतूक श्रमिक संघ, संविधान संवर्धन समिती, स्त्री मुक्ती संघटना, महिला राज्यसत्ता आंदोलन, कोरो-महिला मंडळ फेडरेशन, महाराष्ट्र महिला परिषद, कुसुमताई चौधरी महिला कल्याणी, शहिद भागवत जाधव स्मृती केंद्र, अनुभव मुंबई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॉ. दत्ता देशमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'लोकजागर कलापथक गाणी श्रमिकांची' या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. दत्ता देशमुख प्रतिष्ठान, संगमनेर जयहिंद लोकचळवळ, संगमनेर यांनी केले आहे. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून खासदार (राज्यसभा), ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आहेत. हा कार्यक्रम गुरूवारी दिनांक २९ मार्च २०१८ रोजी दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणार आहे. अधिक माहिती संपर्क प्रफुल्ल शिंदे - ८८९८८८२७८६, ०२२२२०२८५९८,

कॉ. दत्ता देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त थोडक्यात माहिती...
०२-०९-२०१७ ते ०२-०९-२०१८
मागच्या पिढीतील ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत, कामगार शेतक-यांचे नेते, शेती व पाणी व्यवस्थापनातील मार्गदर्शक व लाल निशाण पक्षाचे नेते दिवंगत कॉ. दत्ता देशमुख हे आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांपैकी एक महत्वाचे लोकप्रतिनिधी (आमदार) होते. ते त्या काळातील (१९४२ ते १९९४) महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावरील अत्यंत प्रभावशाली असे मार्क्सवादी विचाराचे, सर्व सामान्य जनतेचे नेते होते.
त्यांचा प्रवास : जवळे कडलग (ता. संगमनेर जि. अहमदनगर) येथे एक अत्यन्त गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दत्तांनी, उच्च बुद्धिमत्तेच्या जोरावर १९४३ मध्ये पुणे विद्यापीठाची सिव्हिल इंजिनियरची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.
म. गांधीजींच्या १९४२ च्या 'चले जाव!' आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना १५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली होती.
तुरुंगात असतानाच त्यांनी इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. इंजिनिअर झाल्यावर त्यांनी बड्या पगाराची नोकरी सोडून जाणीवपूर्वक शेतकरी व कामगार कष्टक-यांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले.
त्यांचा ठसा : १९४६ ते १९६२ अशी १६ वर्षे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत संगमनेरचे आमदार प्रतिनिधी म्हणून काम केले. परंतु फक्त संगमनेरचाच विचार न करता सम्पूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या घणाघाती भाषणांनी विधानसभा गाजवली. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी त्या त्या काळातील काँग्रेसचे मुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री आवर्जून सभागृहात उपस्थित रहात असत. विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही त्यांनी केलेल्या राजकीय कामगिरीचा एक वेगळा ठसा उमटलेला होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात साथी एस. एम. जोशी आणि कॉ. डांगे या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचे अवघड काम करून या आंदोलनाला कामगार कष्टक-यांची ताकदही मिळवून दिली होती.
मुंबई विधानसभेच्या आमदारांनी १९५२ च्या मार्चमध्ये राज्यसभेसाठी १७ खासदार निवडून दिले. कामगार किसान पक्षाचे दोन आमदारदत्ता देशमुख आणि बॅ. व्ही. एन. पाटील यांनीही डॉ. आंबेडकरांना मते दिल्यामुळे राज्यसभेची निवडणूक डॉ. आंबेडकरांना सहज जिंकता आली. दत्ता देशमुखांकडून २९ मार्चला आलेल्या अभिनंदन पत्राचे उत्तर पाठविताना डॉ. आंबेडकरांनी राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
खरा सहकारी : डॉ. बाबासाहेबांनी जनरल जागांवर आम्हाला निवडून आणाल काय? असा खोचक वाटणारा प्रश्न शिष्टमंडळात सर्वात वयाने लहान असणा-या दत्तांना विचारला तेव्हा दत्तांनी, 'जरुर प्रयत्न करु बाबासाहेब, जी काही जूट या प्रश्नावर बांधायची आहे त्यामुळे जनरल जागांवरही लोक निवडून देतील असे उत्तर दिले. ...आणि पुढे खरोखरच ज्या १९५७ च्या निवडणुका झाल्या त्यात नगरमधून जनरल जागेवर खासदार म्हणून बाबासाहेबांचे तरुण सहकारी बॅ. बी. सी. कांबळे यांना निवडून दिले.
पुढे १९६२ मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर या प्रामाणिक तत्वनिष्ठ नेत्याने निवडणुकीच्या राजकारणाला रामराम ठोकून दुष्काळी महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आणखी सखोल अभ्यास केला. दुष्काळ निवारण व निर्मूलन, रोजगार हमी योजना आखण्यात पुढाकार घेतला. शेती आणि पाणी या कळीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. परंतु इतके मूलगामी काम करूनही ते अप्रसिद्धच राहिले, कारण प्रसिद्धीच्या झोतापासून त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवले होते.
मानवी चेह-यांचे कम्युनिष्ट : विसाव्या शतकातील उपेक्षित राहिलेल्या मानक-यांचा आढावा घेतल्यास त्या यादीत कॉ. दत्तांचे नाव फार वरचे राहील. वास्तविक वैयक्तिक लाभाच्या अनेक मोठ्या संधी, (अगदी मुख्यमंत्री पदाचीसुद्दा) चालून आली असतानासुद्धा या तत्वनिष्ठ नेत्याने त्या निस्पृहपणे नाकारल्या ही गोष्ट त्यांच्या पिढीतील सर्वानाच माहीत होती. त्यामुळेच त्यांच्या काही विचाराबद्दल मतभेद असणारे इतर पक्षातील नेतेही त्यांच्याबद्दल मनापासून आदर बाळगीत. आदर्श विरोध आणि विरोधक कसा असावा याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या कृतीतून आणि उक्तीतून दाखवून दिला होता. ते 'पोथीनिष्ठ' कम्युनिस्ट नव्हते तर 'मानवी चेहरा असलेले कम्युनिस्ट' होते. त्यामुळेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचेपासून सर्वच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आदच केला.

१ नोव्हेंबर १९९४ रोजी दत्तांचे दुःखद निधन झाले.

No comments:

Post a Comment