यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१७’ ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणा-या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो तसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. पुरस्काराचे यंदाचे एकोणिसावे वर्ष आहे. सदरील पुरस्कारांचे वितरण सोमवार दि. १५ जानेवारी २०१८ रोजी कल्चरल सेंटर, सिंह्गड इन्स्टिट्यूट कॅम्पस, सिंह्गड रोड, वडगाव, पुणे येथे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष श्री. अजित निंबाळकर व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सन २०१७ सालचा‘यशवंतराव चव्हाण विशेष युवा क्रीडा पुरस्कार’ भारतीय हॉकीपटू आकाश चिकटे (हॉकी) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे आहे. या वर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार – युवक व युवती’ क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोहम्मद नुबैरशेख (बुद्धिबळ) व किशोरी शिंदे (कबड्डी) यांना तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सतीश सिडाम (ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत) व कृपाली बिडये (हिजडा आणि ट्रान्सजेन्डर समूहासाठी कार्यरत)यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी २१ हजार रु. रोख, व सन्मानपत्र असे आहे.
यासोबतच प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेचा निकालही जाहीर झाला असून यात कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा, जि. नाशिक यांच्या ‘बांधिलकी’ या नियतकालिकास प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. १० हजार रोख, प्रमाणपत्र असे आहे. Nagesh Karajagi Orchid College of Engg. & Tech., जि. सोलापूर यांच्या ‘Orchid Aura – 2017’ नियतकालिकास द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. ७ हजार रोख, प्रमाणपत्र असे आहे. विद्याभारती महाविध्यालय, अमरावती यांच्या ‘प्रतिभा’ नियतकालिकास तृतीय पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. ५ हजार रोख, प्रमाणपत्र असे आहे. तर नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला आणि वाणिज्य व विज्ञान महाविध्यालय, जि. नाशिक यांच्या ‘नक्षत्र-भारतीय स्वातंत्र्याची ७० वर्ष’ या नियतकालिकास तरराधाबाई काळे महिला महाविध्यालय, अहमदनगर यांच्या ‘माई’ नियतकालिकांस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रु. ३ हजार रोख, प्रमाणपत्र असे आहे. वरील सर्व पुरस्कार्थीचे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment