Friday 19 May 2017

शेती सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

शेती सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर 

शेतीतील सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अन्य राज्याच्या तुलनेत विविध निकषांवर 81 टक्के गुण मिळवून आघाडीवर आहे, असे प्रशस्तीपत्र खुद्द निती आयोगाने दिले आहे.
भारतीय लोकप्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान - २०१७’ मध्ये ‘व्हिजन ऑफ निती आयोग फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या विषयावर निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त तथा भारतीय लोकप्रशासन संस्थेचे महाराष्ट्र शाखेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव एस.जी.काळे आदी उपस्थित होते.
कांत यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती सुधारणेचा कार्यक्रम निती आयोगाने गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सुरू केला. त्यात कृषी उत्पन बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा, जमीन भाडेपट्टी सुधारणा, खाजगी जमिनींवर वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या सर्व बाबतीत महाराष्ट्र सर्वप्रथम क्रमांकावर आहे.
 कांत म्हणाले की, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपीचा) दर १० टक्क्यांपर्यंत आणि दरडोई उत्पन्न 6 हजार ८०० अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवून भारताला गरिबीमुक्त देश बनविण्याचे उद्दिष्ट निती आयोगाने ठेवले आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मधील महिलांचे योगदान वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जगभरातील महत्त्वाच्या देशामध्ये जीडीपीमधील महिलांचे योगदान ४० टक्के असताना भारतात हे प्रमाण केवळ १७ टक्के एवढे आहे, ते वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी  १५ वर्षाचे व्हिजन डॉक्युमेंट आणि ७ वर्षांचा धोरण आराखडा, तीन वर्षाच्या कृती आराखडा निती आयोगाकडे तयार आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यात भारतातील तरुणाईचे मोठे योगदान राहणार आहे. जग वृद्धत्त्वाकडे झुकत असताना भारतात कार्यक्षम तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच विकासाच्या वाटेवरील आपले सर्वात मोठे भांडवल ठरणार आहे. स्टार्टअप क्षेत्रात भारतीय तरुणांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.  शिक्षण, आरोग्य, कृषी यासारख्या क्षेत्रातील वेगवेगळे स्टार्टअप देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत आहेत. आयआयटी सारख्या शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण झालेले ३७ टक्के विद्यार्थी हे स्टार्टअपमध्ये करिअर घडवित आहे हे चित्र आशादायक आहे.
ते पुढे म्हणाले की, देशातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मुलभूत कामगिरी होणे आवश्यक आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांशिवाय विकासाचे स्वप्न साध्य करता येणार नाही. जगभरातील उत्पादन पद्धती बदलत असून जगभरात तंत्रज्ञानाधारित उत्पादन पद्धतीचा स्वीकार होत असताना आपणही त्याबाबतीत मागे राहता कामा नये. तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील ही भीती अनाठायी असून रोजगार संधी वाढतील फक्त त्यांचे स्वरूप बदलेल. तंत्रज्ञान हे भारताच्या विकासातील सर्वात महत्त्वाचे साधन ठरेल. पुढच्या तीन ते चार वर्षात भारत कॅशलेस व्यवहारांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आघाडी घेऊन विकासाचे निर्धारित लक्ष साध्य करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले टाकेल.

No comments:

Post a Comment