महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी स्वागतपर भाषण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. त्यानंतर खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक भाषणात अपंग हक्क विभागातर्फे ६००० विद्यार्थांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले याची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले. त्यामध्ये विजय कान्हेकर यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले त्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्यावतीने आरोग्य, अपंग व इतर उपक्रमाविषयी थोडक्यात आढावा घेतला. तसेच विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून राबविला जात आहे. शिक्षण व शिक्षणक्षेत्रात होणारे बदल प्रतिष्ठानच्या माध्यामतून राबविणे अशा अनेक उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमात १२ मार्च २०१९ रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ रिझर्व्ह बँकेचे माजी २३ वे गव्हर्नर रघुराम राजन यांना दिला जाईल अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केली.
नव्या पिढीच्या संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त व्हावे, त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनाला चालना प्राप्त होऊन नव-नवीन संशोधन विद्वज्जनांच्या पुढे यावे या उद्देशाने विदर्भ संशोधन मंडळाची स्थापना होऊन विस्तार झाला. सदर संस्थेचे दीर्घकालीन वाङमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून यावर्षी यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार विदर्भातील 'विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर' या संस्थेला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार संस्थेच्या वतीने राजेंद्र पाठारे व मदन कुलकर्णी यांनी स्विकारला.या पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले
No comments:
Post a Comment