Tuesday, 13 November 2018

आहार, विहार, विचार,आचार मिळून स्वास्थ्याचा विचार - सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जितुभाई कुटमुठीया

नाशिक : आहार, विहार, विचार, आचार मिळून स्वास्थ्याचा विचार पूर्ण होतो, त्यासाठी नकारात्मक विचार न करणे हा सर्वात मोठा सकारात्मक विचार आहे, त्याकरीता शरिरासाठी आवश्यक आणि मुलभूत गोष्टींचा विचार करणे म्हणजे निरोगी आयुष्य होय, असे प्रतिपादन सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जितुभाई कुटमुठीया यांनी केले.
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, ग्रेप कंट्री, ग्रंथ तुमच्या दारी, इशाश्री कन्सट्रक्शन, अ‍ॅम्रो कॉलेज सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मेक वर्ल्ड बेटर’ उपक्रमातंर्गत ‘मंत्रा टु बी हेल्थी’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक  करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. आर्किटेक्ट मंजु बेळे-राठी यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. व्याख्यानाचा शुभारंभ विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री. जितुभाई कुटमुठीया म्हणाले की, जगातील अशी एकही व्यक्ती नाही, ज्यांना एखादा विकार किंवा आजार नाही. वडापाव आपण अगदी चवीने खातो. पण आपलं पोट त्याला नाही म्हणतं. तरी देखील आपण चवीचवीने खातो आणि त्रास करून घेतो. आपल्यामध्ये कायम सकारात्मकता असावी. आपल्यातील नकारात्मकतेमुळे आपण मानसिक ताण वाढवून घेतो त्याचा शेवटी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. मधुमेहाची वय असलेल्यांनादेखील तीन महिने औषध सेवन न करता बंद ठेवून त्यांची प्रकृती उत्तम राहिल्याचे त्यांनी उदाहरण दिले. औषधांच्या जास्त सेवनाने देखील विविध आजार बळावतात. औषधांच्या सवयीमुळे त्यातील अनावश्यक घटक लिव्हरपर्यंत पोहचतात. या सवयीमुळे विविध आजार वाढून माणसावर मृत्युदेखील ओढावला जाऊ शकतो.

आपण हायजेनिक - हायजेनिक म्हणतो पण आपल्या शरिरात देखील बँक्टेरीया देखील असतो. लहान मुलांना आपण अन्न पाणी सर्व काही स्वच्छ देतो उकडून देतो पण बाहेरचं काही खाल्लं तर ते लगेच आजारी पडतात. त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते.

माजी कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी जितुभाई यांच्या सेंद्रीय शेती प्रक्रियेची दखल घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेव्हा आमच्या पिकांवर बी-१२ रोग नव्हता तेथील एका संस्थेतील एचओडीकडून त्यांनी खात्री केली की बी-१२ चा प्रादुर्भाव राज्यात सर्वत्र असतांना आमच्या शेतीतील पिकांवर हा रोग नसल्याची खात्री होताच शरद पवार यांनी जितुभाई यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांची प्रशंसा केली. हा रोग आमच्या कोणत्याही पिकांवर नव्हता कारण कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत आमच्या पिकांवर टाकत नसल्याचे ते म्हणाले.
क्लोरीनचं पाणी आपल्या शरिराला खुप घातक असतं. जैन समाजबांधव लोक पाण्यात राख टाकून पाणी पितात. याने पाण्यातील क्लोरीन कमी होऊन पाण्यातील मिनरल्स वाढते आपण देखील रोज सकाळ संध्याकाळ पाण्यात राख टाकून पाणी पिले पाहिजे.

देशी शुद्ध तुप, कच्च्या घाण्याचे खोबर्‍याचे तेल शरिरासाठी चांगले असते. रिफाईन तेल हे शरिरासाठी घातक असते. गहू साखर, रिफाईन ऑईल दुर केल्यास तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. त्याऐवजी नागली, भात खावा, असेही ते म्हणाले.

आपण फळांवर कीटकनाशकांचा मारा करतो. कीटक नाशकांसह खातो आणि आजारपण वाढवून घेतो एखाद्या पिकावर जिवाणी असतात ते पिक काढल्यावर मरतात मग जमीनीवर पसरतात आणि पाऊस पडल्यावर  बी १२ सारखे रोग पिकांवर पसरतात. घरात आपण झाडलेली रस्त्यावरची धुळ, माती सुद्धा आपल्या कुंडीतील रोप चांगल्या पद्धतीने वाढवते.

‘मेक वर्ल्ड बेटर’ या संकल्पनेच्या माध्यमातून  अशा अनेक व्याख्यान आणि पर्यावरण पुरक उपक्रम विनामुल्य स्वरूपात कोणताही आर्थिक उद्देश समोर न ठेवता पर्यावरणाच्या आणि मानवी आरोग्याच्या संरक्षणासाठी आपण यापुढे राबवणार असल्याचे मंजु बेळे-राठी म्हणाल्या.
यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमास डॉ.सुधीर संकलेचा, किरण चव्हाण, विनायक रानडे, धनंजय ठाकूर, मनिष मारू, शैलेश येवले, निता वैद्य, अश्‍विनी देशपांडे, जय नरसे, श्रीकांत चिंचोलीकर, प्रकाश कठपाळ, विनोद चावला, सुनंदा सोनी, संदीप मदाने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंजु बेळे-राठी यांनी केले.

No comments:

Post a Comment