Sunday, 12 August 2018

वाहतुक सुरक्षा उपक्रमाचा विश्वास को-ऑप. बँकेतर्फे गौरव

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील रस्ते वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाहनचालकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, बेशिस्तपणा हे यामागचे कारण आहे. रस्ते वाहतूकीमध्ये होणारे अपघात हा ही एक प्रश्‍न यानिमित्ताने समोर आला आहे. हे अपघात कमी होण्यासाठी वाहनचालकाने काळजी घेण्याबरोबरच वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे निश्‍चितच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. वाहतूक सुरक्षा व हेल्मेट सक्तीविषयी जनप्रबोधन व्हावे या उद्देशाने विश्वास को-ऑप. बँक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांचे संयुक्त विद्यमाने काठे गल्ली, नाशिक येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची संकल्पना बँकेचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. विश्वास को-ऑप. बँक सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अग्रभागी असते. त्याचाच एक भाग होता. विश्वास ठाकूर यांची ‘नाशिक फर्स्ट’ या संस्थेतर्फे व वाहतूक सुरक्षेविषयक प्रबोधन करण्यासाठी २४ सन्माननीय व्यक्तींमध्ये DON (Dost of Nashik) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून वाहतूक सुरक्षेविषयी ते अनेक उपक्रम राबवित असतात. 

निमित्त होते गेल्या ९९ दिवसांपासून काठेगल्ली सिग्नल, द्वारका येथे केरळ महिला विकास समितीतर्फे राबविण्यात येणार्‍या ‘हेल्मेट सक्ती’ विषयी उपक्रमाचे त्यांच्या या अभियानास आज १०० दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केरळ महिला विकास समितीच्या श्रीमती जया कुरूप व त्यांच्या सहकार्‍यांचा सौ. ज्योती विश्वास ठाकूर यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलतांना सौ. ज्योती विश्वास ठाकूर म्हणाल्या की, तरूण पिढीने आपल्या जीवनाचे मोल तसेच कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी. हेल्मेट सक्ती शिवायही हेल्मेट वापरण्याची सवय ज्या दिवशी जोपासली जाईल त्यादिवशी भारतात होणार्‍या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत हे कौतुकास्पद आहे. विश्वास को-ऑप. बँकेचा यातील सहभाग सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
संदीप भानोसे यांनी याप्रसंगी रस्ते अपघात आणि नियमांचे उल्लंघन या विषयी जनजागृती होण्यासाठी असे उपक्रम निश्‍चितच दिशादर्शक आहेत असे विचार मांडले. यावेळी काठे गल्ली सिग्नलवर हेल्मेटधारक व सिट बेल्टचा वापर करणार्‍यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ज्योती विश्वास ठाकूर, माधुरी हावरे, मधुरा पंचाक्षरी, बँकेच्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारीका देशपांडे, किशोर त्रिभुवन, वैशाली दाणी, स्मिता पवार, पूनम काशिकर, प्रियंका ठाकूर, रूचिता ठाकूर, जया हरीदास, मिनी नायर, अनु रविंद्रन आदी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment