Tuesday, 4 July 2017

छत्र्यांवर ओघळला पावसाच्या शब्द-चित्रांचा अविष्कार

छत्र्यांवर ओघळला पावसाच्या शब्द-चित्रांचा अविष्कार
सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कार्यशाळेला जोरदार प्रतिसाद


नाशिक : पांढर्‍या शुभ्र छत्र्या आणि त्यावर ओघळणारे सप्तरंगी रंग आणि पावसावरच्या कवितांच्या, गाण्यांच्या ओळी कार्यशाळेतील प्रत्येकाला नवनिर्मितीचा आनंद देत होत्या. पावसाचे अनेक विभ्रम आपआपल्या छत्रीवर रेखाटत होता. पाऊस आणि मानव यांचं नातं किती विलक्षण आणि आनंददायी असते, याचाच हा अनुभव होता.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, अबीर क्रिएशन्स, अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या अंब्रेला पेंन्टींग कार्यशाळेचे विश्वास क्लब हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अच्युत पालव यांनी सप्रयोग मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस ५० हून अधिक रसिकांनी सहभाग नोंदविला.

अच्युत पालव यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या मनात पावसाचं रूप असतं आणि त्याचा अविष्कार प्रत्येक कलावंत, रसिक कलाकृतीतून देत असतो. आरती प्रभूंच्या ‘येरे घना येरे घना, असो किंवा चिंब पावसानं रान झालं आबादानी’ महानोरांचे शब्द असो त्याला एक सर्जनाचं दृश्य रूप असतं. पावसाळ्यातील पाण्याचा खळखळाट सरींवर सरी असोत. तीच अनुभूती प्रत्येक जण घेत होता. छत्र्यांतून अक्षरातून निथळणारा पाऊस आठवणींचा, विरहाचा, शुभ्रसंकेताचा उद्गार देत होता. पाऊस आपल्यातील सृजनशीलतेलाच आव्हान देत असतो. कार्यशाळेसाठी निलेश गायधनी, केतकी गायधनी व चिंतामण पगारे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment