Sunday, 2 April 2017

गोविंदराव तळवलकरांच्या आठवणीचे स्मरण...

गोविंदराव तळवलकरांच्या आठवणीचे स्मरण...

ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंदराव तळवलकर यांची स्मृतीसभा १ एप्रिल २०१७ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार, मा. मंत्री विनायकराव पाटील, माजी क्रिकेटर माधव आपटे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी तळवलकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
तळवलकरांच्या विषयी बोलताना प्रताप आसबे म्हणाले की मुंबईत मटामध्ये कामाला आलो आणि हिमालयाच्या पायथ्याशी आलो असे मला वाटले. 'समाजवादी लक्ष भोजन' हा त्यांचा अग्रलेख वाचून मी प्रेरित झालो होतो. तळवलकरांनी लिहिताना कुणाचीही पर्वा कधीच केली नाही. जवळच्या लोकांवर तर अधिक टिका केली. तळवलकर कट्टर लिबरल डेमोक्रॅट होते असे उद्गार प्रताप आसबे यांनी काढले...
महाराष्ट्र टाइम्स चे संपादक अशोक पानवलकर यांनी माझ्या संपादकीय कारकिर्दीत तळवलकर यांच्या दु:खद निधनाची बातमी येऊ नये. पण ती आली त्याला पर्याय नव्हता असे पानवलकर म्हणाले.
विनायकराव पाटील तळवलकरांविषयी बोलताना म्हणाले की तळवलकर ज्याला जसे भेटले त्याला तसे वाटले. पत्रकारांचे, संपादकांचे, राजकीय पुढा-यांचे, साहित्यिक, कलाकारांना वेगवेगळे तळवलकर भेटत गेले. मला विचाराल तर हे सर्व तळवलकर एकच होते. उत्तम पत्रकारिता हे तळवलकरांचे ध्येय होते. म्हणून त्यांच्याकडून उत्कृष्ट पत्रकारिता होऊ शकली.
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी तळवळकरांच्या आठवणींना उजाळा देताना असे म्हणाले की अलिकडे चांगली पत्रकारिता ही चांगला व्यवसाय होऊ शकत नाही. असं मानलं जात पण यातला आदर्श म्हणजे गोविंद तळवलकर.. त्यांच्या अंगी लिहिण्याचा जो निर्भीड भाव होता, तो आजच्या संपादकांमध्ये असण आवश्यक आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष शरद पवार म्हणाले की ही श्रद्धांजली सभा नाही. गोविंदरावांना असले शब्द आवडत नव्हते. खरंतर त्यांच्या आठवणीचे स्मरण करण्यासाठी ही स्मृतीसभा आयोजित केली आहे. गोविंदरावांचे अग्रलेख हे महाराष्ट्राला चर्चेचा विषय असायचे. गोविंदराव असे एकमेव संपादक असतील ज्यांचे अग्रलेख २५ वर्षांनंतरही लक्षात राहिले आहेत. फक्त आपले स्वत:चेच नाही तर दुस-यांनी लिहिलेले चांगले अग्रलेख देखील ते छापायचे. गोविंदरावाचे अग्रलेख राज्याला दिशा देणारे असायचे. महाराष्ट्राच्या अनेक हिताच्या निर्णयाच्या मागे गोविंदराव होते. त्यांचा सल्ला आम्ही घ्यायचो. त्याचा फायदा आम्हाला झाला पण त्याचे श्रेय त्यांनी स्वत: कधी घेतले नाही. गोविंदराव उरळीकांचन इथल्या बापू कांचन या सामान्य शेतक-यांपासून ते इंदिरा गांधीचे माध्यम सल्लागार शारदा प्रसाद पर्यंत सर्वच लोकांसोबत संवाद ठेवायचे हा त्यांचा विशेष गुण होता अशा वेगवेगळ्या अष्टपैलू गुणाना उजाळा दिला.

No comments:

Post a Comment