Monday 5 August 2019

काव्यवेगातील दृकश्राव्य माध्यमांच्या आधारे उलगडले ‘बाउल’ : सौमित्र


वळू नकोस माघारी, दम खाऊ नकोस,
मरगळू नकोस, चालत राहा निर्हेतुक
सभागृह तुडुंब भरलेले... सर्वत्र अंधार.. काही वेळात अंधाराला भेदत प्रकाशकिरणे भेट बाउलवर पडली... आणि मग उजळला अभिनय आणि दृकश्राव्य माध्यमातून कवितेचा पाऊणतासाचा प्रवास. दर्‍याखोर्‍यातील रस्ते, धडधडत्या मायानगरीची रक्तवाहिनी असलेल्या रेल्वेची वास्तवता, गावातल्या शेवटच्या माणसाचं नातं, कुटुंबातील मोबाईल क्रांती, नात्यातील दुरावा... हे सर्व सादर करण्याची किमया साधली प्रसिद्ध अभिनेता तथा बाउलचे लेखक सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांनी. निमित्त होते प्रकाशन सोहळ्याचे.
बाउल काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर सौमित्र यांनी दृकश्राव्य स्वरूपात काव्यसंग्रहातील कवितांचे सादरीकरण केले. प्रत्येक कवितेच्या समारोपाला संगीताचा आधार होता. कविता सादर करताना रसिकांना प्रत्यक्ष कवितेच्या विश्वात घेऊन जाणारे चित्र दाखवून खिळवून ठेवण्यात आले. कवीच्या विचारचक्राचा आणि आयुष्याचा प्रवास कसा सुरू होत, या प्रवासात, एकांतात, लोकांतातही त्यांच्या भावविश्वाला जे भिडते, भेडसावते, त्या प्रसंगांचे चित्रण शब्दबद्ध करण्यात आले. आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या प्रवासात वळू नकोस माघारी, दम खाऊ नकोस, मरगळू नको, चालत राहा निर्हेतुकअसा संदेश सौमित्र यांनी काव्यरसिकांना दिला.
गावातला शेवटचा माणूस
झोपलेला असताना निघावं,
पाय म्हणलं की रस्ता, 
रस्ता म्हटलं की, 
आपली कमिटमेंट साली
एकटेपणाशी असते,
घर जितकं दूर तिककं
यिसरायला सोपं जातं, 
रस्त्याच्या कडेला उभा राहून तू
असाच का रडतो आहेस, आधी खूप
रस्ते होते, खूप चांगले होते...
अशा एकाहून एक सरस कवितांच्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांच्या टाळ्यांचा गजर होत होता. अशा या काव्य मैफीचा शेवट कवी सौमित्र यांच्या सादरीकरणाला दाद देऊनच झाला. या काव्यवेगातील सादरीकरणाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. संगीत संयोजन रोहित सरोदे यांनी केले. प्रकाश योजना राहूल गायकवाड यांची होती. दृकश्राव्य माध्यमासाठी लक्ष्मण कोकणे यांनी मदत केले. कार्यक्रमाला शहरातील साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाजकारण आदी क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती.











No comments:

Post a Comment