Sunday 21 October 2018

विनामूल्य रांगोळी कार्यशाळा संपन्न

रांगोळी म्हणजे प्रसन्नता, सकारात्मक व भारतीय संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब असं चित्र लगेच डोळ्यांसमोर चटकन उभं राहतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "मंजिरीच्या झटपट रांगोळ्या व रांगोळी काढायच्या सोप्या व विविध पद्धतीवरती प्रशिक्षणार्थींच्या आग्रहाखातर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

चूकीच्या पध्दतीने शेती केल्याने शेतीचं वाटोळं झालं...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत एकतिसावे पुष्प व्याख्याते डॉ. आनंद कर्वे यांचे 'आदाने फुकट पण शेतकरी कर्जबाजारी' या विषयावरील व्याख्यान नुकतेच चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट येथे संपन्न झाले.

कार्यक्रमाला काही शेती जाणकार आणि शेतीविषयी अनभिज्ञ असलेली मंडळी हजर होती. कर्वे यांनी पिके कशा पद्धतीने घ्यावी, त्याचं नियोजन कसे करावे, कीटकनाशक फवारणी केव्हां करावी, एकाचवेळी दोन पिकं कशी घ्यावी आणि परदेशात कशी पिकं घेतली जातात इत्यादी मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दोन पिके कशी घेतली जातात, याबाबत त्यांनी जपानचं उदाहरण दिलं. जपानमध्ये भाताच्या पिकासोबत गव्हाचं पीकं घेतलं जातं. भाताची पेरणी झाल्यानंतर महिनाभरात गहू पेरला जातो. गव्हामुळे तण अजिबात उगवत नाही आणि भाताचं पिकं काढल्यानंतर महिनाभरात गव्हाचंही पीक काढलं जातं असं त्यांनी सांगितलं. 

Friday 19 October 2018

६ हजार कर्णबधीर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोफत डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप होणार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रातील औरंगाबाद, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात, विशेष शाळांमध्ये ० ते १० या वयोगटातील कर्णबधीर मुलांना आत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र बसविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. साधारण एका लाभार्थ्यांस दोन कानाचे दोन यंत्र व सहाय्यक साधनं असे २५००० रूपयांचे यंत्र बसविण्यात आले. आजपर्यंत या उपक्रमात १५००० हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यंत्र बसविल्यानंतर त्या मुलांची भाषा, वाचा विकासाचा व विविध पातळीवरील विकासाचा आढावा देखील घेण्यात येत आहे.

यावर्षी उपरोक्त कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली असून स्टार्की फाऊंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, टाटा ट्रस्ट, मुंबई, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन, ठाकरसी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील (पुणे, सातारा, सांगली, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, उस्मानाबाद, नांदेड, जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगांव, बुलढाणा, सिंधुदुर्ग अशा एकूण २२ जिल्ह्यांमध्ये सामान्य व विशेष शाळांमधील कर्णबधीर मुलांसाठी नाव नोंदणी कर्णसाचाचे मोजमाप शिबीरे आयोजीत करण्यात आली होती.

६००० कर्णबधीर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शुक्रवार दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजी, शिवछत्रपती स्पोर्टस, कॉम्पलेक्स, बालेवाडी, पुणे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत मोफत डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या  शिबिरात सहभागी होणा-या लाभार्थ्यांची संख्या पाहता या कार्यक्रमाची नोंद ही जागतिक विक्रमासाठी प्रसिध्द असलेल्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा मानस आहे.

या कर्णबधिर मुलांना डिजीटल श्रवणयंत्र लावल्यानंतर ऐकू येणा-या ध्वनी लहरींमुळे, त्यांच्या चेह-यावर झळकणारा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी आपली उपस्थिती प्राथनीय आहे. 

Monday 15 October 2018

वंचित बालकांचे हक्क विकासाच्या केंद्रस्थानी असावेत - भाल कोरगावकर

सोलापूर : वंचित बालकांचे हक्क विकासाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. वंचित मुलांच्या शाश्वत पुनर्वसनासाठी समाज व शासन सक्रीय पुढाकार घ्यावा असे आवाहन भाल कोरगावकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर, आपलं घर बालगृह, वालचंद कला वा शस्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपलं घरच्या रौप्यमहोत्सवानिमित्त "वंचित मुले व समाज" या विषयावर एकदिवसीय परिसंवादात आयोजीत करण्यात आला होता. बीजभाषण करताना ते पुढे म्हणाले कि, पोषण आहार व बालशिक्षण हा भारतीय बालकांच्या संदर्भात जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. सारे जग अक्षर साक्षरता साध्य करून डिजीटल साक्षरतेकडे वाटचाल करताना भारतातील मुले मुलभूत हक्कांपासून वंचित आहेत. बालपण निर्देशांकात ब्रिक्स देशांत भारताचा सर्वात शेवटचा क्रमांक आहे. वंचित मुलांचा प्रश्न समाजाच्या दया व सहानुभूतीवर अवलंबून न ठेवता कायद्यानेच शाश्वत पुनर्वसन करण्याकरिता शासनाने पावले उचलली पाहिजेत असे प्रतिपादन भाल कोरगावकर यांनी केले.

             या परिसंवादाचे उद्घाटन शुभांगी बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोष कोटी होते. तर विचारमंचावर साथी पन्नालाल सुराणा, विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड, प्रा.डॉ.अबोली सुलाखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. युवकांच्या सहभागानेच वंचित मुलांचा प्रश्न सुटू शकेल व भविष्यात पाखर सारख्या संस्थांची गरज राहू नये अशी अपेक्षा शुभांगी बुवा यांनी यावेळी व्यक्त केली.

प्राचार्य. डॉ. संतोष कोटी म्हणाले कि समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही महिने वंचित बालकांसाठी काम करणाऱ्यांनी संस्थेत विनामुल्य काम करावे. किल्लारी भूकंपात अनाथ झालेल्या बालकांचे बालकत्वाची जबाबदारी भाई पन्नालाल सुराणा व आपलं घरणे घेतली सदर प्रकल्प उभारणीसाठी मा. शरद पवार साहेबांनी मोलाची भूमिका बजावली आहे. व यास त्यांचा खारीचा वाटा आहे, हे ऐतिहासिक व अभिनंदनीय समाजकार्य आहे. आदिवासी समाजात एकही अनाथ बालक आढळत नाही. मात्र सुशिक्षित समाजातील वंचित व अनाथ बालकांची संख्या समाजाच्या सुसंस्कृतपणावर प्रश्न निर्माण करते असे प्रतिपादन प्राचार्य. डॉ. कोटी यांनी केले. उद्घाटनाच्या सत्रात प्रा. डॉ. अबोली सुलाखे यांनी वंचितांच्या पुनर्वसनात संगीताचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. संगीत मनोरंजनासोबत जीवन जगण्याचा आधार मिळवून देते असे त्या म्हणाल्या. उद्घाटन सोहळ्याची प्रस्तावना साठी पन्नालाल सुराणा यांनी केली व आपलं घरच्या स्थापना व रौप्य महोत्सवी वाटचालीला आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अभय जाधव व प्रा. श्रीकांत धारूरकर यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश ठाकूर यांनी केले.

                 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभागतीत सर्व प्राध्यापक. डॉ. इंदिरा चौधरी, डॉ. निशा वाघमारे, डॉ.विजया महाजन, डॉ.संदीप जगदाळे, डॉ.जितेंद्र गांधी व डॉ.अभय जाधव आणि समाजकार्य विद्यार्थी स्वयसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. 

Wednesday 10 October 2018

मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉप

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉपचे शनिवारी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११ ते ६ या कालावधीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, ४ था मजला, सांस्कृतिक सभागृह, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये व्हाट्सअप्प, फेसबूक, आणि ट्विटर सोबत स्मार्ट फोन बाबत परिपुर्ण माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तसेच टॅक्सी बूक करणे, गूगल मॅप शोधून काढणे, बूक माय शो, एम-इंडिकेटर, स्विगी, बीग मार्केट आणि पेटीएम इ. अॅपची माहिती सुध्दा दिली जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल. संपर्क संजना - ८२९१४१६२१६, ०२२-२२०४५४६० (२४४) आहे.

Tuesday 9 October 2018

विज्ञानगंगाचे एकतिसावे पुष्प...आदाने फुकट पण शेतकरी कर्जबाजारी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत एकतिसावे पुष्प व्याख्याते डॉ. आनंद कर्वे यांचे 'आदाने फुकट पण शेतकरी कर्जबाजारी' या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दि १९ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

Monday 8 October 2018

ज्येष्ठ नागरिकांचा १९ वा आनंद मेळावा संपन्न..
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये एक विशिष्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या व फेस्कॉमच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळाव्याचे आयोजित केला जातो. आनंद मेळाव्याचे हे १९ वे वर्षे आहे. आतापर्यंत ५४ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये दोन पुरुष व दोन महिनला ज्येष्ठ नागरिकांना सत्कार करण्यात येतो. यावर्षी रविवार दि. ७ ऑक्टोबर २०१८ रोजी चव्हाण केंद्रामध्ये कुर्ला ते मुलुंड, नवी मुंबई या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांचा मेळावा भरविण्यात आला. यामध्ये जयमाला गोडबोले (घाटकोपर)सावित्री राव (नवी मुंबई ), रमेश अहिरे (घाटकोपर) व मुकुद कोलागिनी (नवी मुंबई) यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी घाटकोपर ज्येष्ठ नागरिक संघ व उत्कर्ष ज्येष्ठ नागरिक संघ (नवी मुंबई) यांचा ही सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे अध्यक्ष श्री. शरद काळे हे होते व प्रमुख अतिथी म्हणून लेखिका मीना वैशंपायन उपस्थित होत्या. अंदाजे ४०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात उपस्थित होते. सोबत खालील लिंक वर क्लिक करुन कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहू शकता..
https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/301183813803588/
https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/262412797948038/
https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/153233728954151/