Wednesday 18 March 2020

आव्हानांना प्रति आव्हान देणारा समाज निर्माण झाला पाहिजे – प्रा.आनंदराव जाधव

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परिसंवादात मान्यवरांचे मत




 मुंबई दि. १४ : प्रत्येक काळात आव्हाने असतातच. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळीही खुप मोठी आव्हाने होती. यशवंतराव चव्हाणांकडे महाराष्ट्राचे नेतृत्व होते.सन १९५७ ते १९६० हा अत्यंत संघर्षाचा काळ होता. महाराष्ट्राच्यासमोर पैसा, शिक्षण, दारिद्र्य अशी अनेक आव्हाने होती. यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे उत्तुंग काम केले. बहुजनांची मुले शिकली पाहिजेत यासाठी ईबीसी सवलत मंजूर केली. राजकारणात तोच टिकून राहतो, जो आव्हाने पेलतो. राजकारणामध्ये सगळ्यांना सगळंच करावं लागतं, पण मिळवलेली सत्ता कोणासाठी वापरायची हे ज्याला कळलं तोच यशस्वी राज्यकर्ता ठरतो असं ते म्हणत. विरोधकांनाही सन्मान देणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक होता. विरोधी पक्षातील भाई उद्धवराव पाटील सभागृहात मत व्यक्त करताना सत्ताधारी सुद्धा शांत बसत. परंतु हल्ली सभागृहात लोकप्रतिनिधी दंगा करताना दिसतात, आपण का दंगा करतो आहोत हे देखील त्यांना समजत नाही. केवळ दंगा करणे म्हणजे आव्हानाला तोंड देणे नव्हे, तर आव्हानांना प्रतिआव्हान देणारा समाज निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, माजी उपप्राचार्य प्रा. आनंदराव जाधव यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र, लातूरच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राची जडणघडण आणि यशवंतराव चव्हाण यांचे योगदान या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे हे उपस्थित होते. तर परिसंवादातील वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथील निवृत्त उपप्राचार्य प्रा. आनंद जाधव व तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापुर येथील मराठी विभाग प्रमुख मा. प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख हे उपस्थित होते.

Friday 13 March 2020

अनेक शहरे उद्योगाच्या क्षेत्रात उच्चांक गाठण्याच्या मागे यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी महत्त्वाची होती – शरद पवार


राज्य आल्यावर त्याचा वापर कसा करायचा ही भूमिका मांडण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक व्याख्यानातून केले. पंचायत राज्याची यंत्रणा आणली. इतकेच नाही तर सामाजिक, शेती, शिक्षण, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी त्यांनी केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक शहरे उद्योगाच्या क्षेत्रात उच्चांक गाठण्याच्या मागे यशवंतराव चव्हाण साहेबांची दूरदृष्टी महत्त्वाची होती असे उद्गार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान महत्त्वाचे आहेच शिवाय हे राज्य मराठी भाषिकांचे होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण यात महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले असेही ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलो आहोत. दरवर्षी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या दिवशी आपण करतो. मला आनंद आहे की, यावेळेला ज्यांना नोबल पुरस्कार प्राप्त झाला त्यातून भारताचे नावलौकिक वाढवण्याची कामगिरी केली अशा डॉ. अभिजित बॅनर्जी यांचा आपण सन्मान करतो आहोत असेही श्री. पवार यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण साहेब हे देशातील विविध विषयात योगदान दिलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होते. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले, शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, सांपत्तिक पार्श्वभूमी अजिबात नाही. पण मातेचे संस्कार ज्यांच्यावर झाले त्याचे ऋण सदैव मानणारे, मातृ पितृ बद्दलाची प्रचंड आस्था असणारे असे यशवंतराव चव्हाण साहेबांचे व्यक्तिमत्व होते, अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांच्या विविध पैलूंवर भाष्य केले.
शैक्षणिक क्षेत्रात कायदेपंडित झाले. पण त्याचा उपयोग कधीच त्यांनी खटले लढवण्यासाठी केलेला नाही. यातून उभं आयुष्य सामान्य माणसांच्या प्रश्नांची वकिली करण्याचे काम केले. शेतीही महत्त्वाची आहे. त्यात बदल करण्याचा विचार त्यांनी मांडला. यात अनेक संधी उभारण्याचे काम केलं. त्यासाठी कृषी औद्योगिक समाजाची निर्मिती करण्याचा विचार त्यांनी दिला. त्यासोबतच त्यांच्याभोवती अनेक विचारवंतांचा वर्ग असायचा. त्यातून सुसंस्कृत समाज उभारण्याचे काम त्यांनी केले होते.
चीनसारखं संकट देशात आल्यावर नाउमेद झालेली जनता पाहून देशात पुन्हा एकदा मनोधैर्य वाढवण्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेतली आणि राज्यातील सत्ता सोडून केंद्रात जाण्याची भूमिका घेतली. इतकेच नाही तर त्याहून अनेक विभागात आपल्या मोलाच्या कामगिरीचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांची प्रेरणा घेऊन आपण आपली पुढील वाटचाल करू असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जयंत लेले यांच्या यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन भारत: समाज आणि राजकारण या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस शरद काळे, डॉ. अनिल काकोडकर, अरुण गुजराथी, जयंत लेले, प्रदीप चंपानेरकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे कोषाध्यक्ष हेमंत टकले उपस्थित होते.










Thursday 12 March 2020

यशवंतराव चव्हाण यांची १०७ वी जयंती साजरी


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र परभणी व चतूरंग प्रतिष्ठान परभणी तर्फे आज दि.१२ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची १०७ वी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे परभणी केंद्रातर्फे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विलास पानखेडे(कार्याध्यक्ष, परभणी केंद्र) तर प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विरसे उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरवातीस स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते शिवाजी विरसे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जिवनातील विविध घडामोडी, बालपण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग, त्यांचा राजकीय प्रवास, या सारख्या ईतर अनेक घडमोडी उपस्थित प्रेक्षकासमोर मांडल्या. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोम विलास पानखेडे यांनी केला. या कार्यक्रमाची प्रस्तावना तथा सुत्रसंचालन विष्णू वैरागड तर आभार प्रदर्शन प्रदिप चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी चतुरंग प्रतिष्ठानचे विलासराव चट्टे, अमोल क्षीरसागर, टेकाळे व ईतर मान्यवर तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, परभणी केंद्राचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या अभिवादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.





कोरोना : उद्योगांसाठी संकट नव्हे संधी

सुनिल किर्दक यांचे प्रतिपादन, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन
औरंगाबाद दि. १२ : कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून, भारताने त्या संदर्भात चिंता करण्याऐवजी आपल्या औद्योगिक धोरणात सकारात्मक बदल केल्यास चीनला पर्याय म्हणून भारत पुढे येऊ शकतो, असे प्रतिपादन उद्योजक सुनील किर्दक यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानस, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात किर्दक बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय केंद्राचे अध्यक्ष तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती मा. अंकुशराव कदम, तर प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुधीर गव्हाणे यांची उपस्थिती होती. 'व्यापार उद्योगाला कोरोना व्हायरसचा फायदा की तोटाया विषयावर सुनील किर्दक यांनी मांडणी केली. ते म्हणाले की, कुठलीही साथ कोणत्याही देशात असली तरी त्यात कुणाचाही फायदा बघणे योग्य नाही. जागतिक बाजारपेठेवर चीनचे वर्चस्व असून जवळपास सर्वच देश चीनवर च्या उत्पादनांवर अवलंबून आहेत. कोरोनाच्या साथीमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे साहजिक आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास चीनला पर्याय म्हणून भारत पुढे येऊ शकतो, मात्र त्यासाठी औद्योगिक धोरणात मोठे बदल करून त्या दृष्टीने पावले उचलावे लागतील. चीनची उत्पादन क्षमता आणि पुरवठा हे स्वस्त दराच्या भुमिकेवर अवलंबून आहेत. त्या स्पर्धेत उतरण्यासाठी आपण मागणी आणि आपल्या क्षमतेचा विचार करून धोरणांची आखणी करायला हवी. मात्र हे एका रात्रीत होणे शक्य नसून भविष्याच्या दृष्टीने ही संधी समजून घेत आताच पावले उचलायला हवीत.
यावेळी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला. यशवंतराव चव्हाण यांनी सर्व समाजाचा विचार करून घेतलेले निर्णय हे दूरगामी परिणाम करणारे होते, हे आता सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात अंकुशराव कदम यांनी यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्त्व आणि कर्तृत्त्व समजून घेण्यासाठी त्यांच्यावरील ग्रंथांचा अभ्यास करावा, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, प्रा. डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, शिव कदम, राजकुमार तांगडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी नीलेश राऊत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश देशमुख यांनी केले.




यशवंतराव चव्हाण साहेब यांची १०७ वी जयंती सोहळा

दिनांक १२ मार्च  २०२० रोजी स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या १०७ व्या जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र कराड यांच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८:३० वाजता सजवलेल्या बग्गीमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची प्रतिमा ठेऊन सौ. वेणूताई चव्हाण स्मारक येथून पदयात्रेस प्रारंभ  झाला. ही पदयात्रा "विरंगुळा" येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विजय दिवस चौक, दत्त चौक, आजाद चौक, चावडी चौक मार्गे १० वाजता "प्रीतिसंगम" या साहेबांच्या समाधीस्थळी पोहोचली. या पदयात्रेस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र कराडचे  सदस्य श्री नंदकुमार बटाणे श्री अशोकराव गणपतराव चव्हाण सचिव श्री मोहनराव डकरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी व सौ. वेणूताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण कॉलेज, शिवाजी हायस्कूल व विठामाता हायस्कूल या संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते. समाधीस्थळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आदरांजली व पुष्पांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





यशवंतराव चव्हाण साहेब यांची १०७ वी जयंती सोहळा

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने औरंगाबाद विभागीय केंद्राच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषद आवारातील चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुबोध जाधव, अॅड.राहुल तायडेज्ञानेश बोद्रेसचिन दाभाडेअजय भवलकरउदय भोसलेप्रतीक राऊत उपस्थित होते.

गझल कवितांतून जीवन समृद्ध करण्याचे सामर्थ्य - प्रदीप निफाडकर


नाशिक (दि. ११) : मराठी-उर्दू-हिंदी शायरांनी जगण्याचं प्रतिबिंब आपल्या लेखनातून तरलपणे मांडले आणि साहित्य विश्व समृद्ध केले. सर्वसामान्यांच्या कष्टप्रद जीवनाला चव दिली, आशय दिला. शब्दांच्या विलक्षण छटा आणि जीवनाचे तत्वज्ञान दिले. माधव ज्युलियन, सुरेश भट, फैज, मीर, हसरत मोहानी, गुलाम अली शायरांच्या  एकाहून एक सरस गझलांतून गझलकार प्रदीप निफाडकरांनी सायंकाळ सोनेरी केली. निमित्त होते गझलदीपमैफिलीचे. उष:काल होता होता काळरात्र झाली, आत्ता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...  अशी चेतना जागवणारे सुरेश भट आणि तितक्याच तरलपणे प्रेमाची महतीही भटांनी विशद केली. कवी असतो म्हणून झाडं बहरतात अशा आशावाद निफाडकरांनी गझलेतून मांडला. सूर्याला सकाळी उठवण्याचे काम किंवा चंद्राला निजवण्याचे काम कवी आपल्या शब्दांतून करतो आणि आपले वेगळेपण व्यक्त करतो, प्रतिभेची ताकद व शक्यता व्यक्त करतो. कवीचं जगणं असो किंवा सामान्यांची जगरहाटीची वाताहातही कवी प्रभावीपणे शब्दांतून मांडतो व ते नंतर जीवनाचे सार होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीपया कार्यक्रमाचे आयोजन विश्वास हब येथे करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने म्हणाले की,भाषा ही माणसांमधील पूल आहे. त्यातून माणूस जोडण्याचे काम होते. एकमेकांविषयी आपुलकी, विश्वास निर्माण होतो. भाषा ही आईसारखीच असून ती प्रेम, वात्सल्य यांचा अनोखा मिलाफ आहे. मराठी, हिंदी, उर्दू यांच्या समन्वयातून जीवनाचा नवा अर्थ रसिकांना सापडत असतो. अनेक शायरांनी एकात्मभावाची, समाजनतेची शिकवण दिली व नवा विचार दिला. यावेळी श्री. कडासने यांनी उर्दू, हिंदी भाषेच्या बंधूत्वाची ओळख विविध शेर व कवितांतून करून दिली आणि रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. सुनिल कडासने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधिक्षक यांचा परिचय डॉ. हरीभाऊ कुलकर्णी यांनी केला. सुनिल कडासने यांचा सन्मान बी. एस. एन. एल. चे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केला. प्रदीप निफाडकर यांचा परिचय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिकचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी केला. तसेच प्रदीप निफाडकर यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांच्या हस्ते करण्यात आला. मा. डॉ. सुभाष पवार यांचा सन्मान प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते करण्यात आला. 
कार्यक्रमास कार्यक्रमास विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, प्रतिष्ठानचे सदस्य  नितीन ठाकरे, बी. एस. एन. एल. चे महाप्रबंधक नितीन महाजन, विश्वास बँकेचे संचालक विक्रम उगले, डॉ. वासुदेव भेंडे, विश्वास को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील, कवी संजय चौधरी, नरेश महाजन, सोमनाथ साखरे, सुशिला संकलेचा, अश्विनी बोरस्ते, अ‍ॅड. मिलींद चिंधडे, विलास पंचभाई, रघुनाथ साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.





यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी नाईट ट्रेन


चित्रपट चावडी
नाशिक (दि. १३) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को- ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शुक्रवार, १३ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक जर्झी कावलेरोविच यांचा नाईट ट्रेनहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
एका गर्दीने भरलेल्या रेल्वेत एक स्त्री व एक पुरूष येतात. त्याच डब्यात पोलीस एका गुन्हेगाराला शोधण्यासाठी येतात आणि एक रोमांचक थरार असलेले नाट्य उभे राहते. रहस्य, भय, गुढता, प्रेम यांचा संगम असलेला हा चित्रपट अभिजात म्हणून गौरविला गेला आहे. जर्जी कावलेरोविच यांचा १९५९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १०० मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मानद अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Wednesday 11 March 2020

सर्वसामान्य माणुस राजकारणात आणण्याचे कार्य यशवंतराव चव्हाण यांनी केले – प्रा. अंबादास घुले


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाई व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण - एक अष्टपैलू व्यक्तीमत्व या विषयी प्रा. डॉ. आबादास घुले, अमरावती यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला मा. आ. पृथ्वीराज साठे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाईचे अध्यक्ष मा. अनिकेत लोहिया, उपाध्यक्ष दगडू लोमटे, सचिव डॉ. नरेंद्र काळे, बबन लोमटे, अभिजीत जोंधळे, प्राचार्या वनमाला गुंडरे, अभिजीत जोंधळे, प्रा. एस. के. जोगदंड, श्रीमती प्रतिभाताई देशमुख, पाशुमियॉ सर, प्राचार्य आण्णासाहेब जाधव इ. उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करुन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेंद्र काळे यांनी केले, तर प्रमुख व्याख्याते यांचा परिचय दगडू लोमटे यांनी करुन दिला.
 यावेळी व्याख्याते प्रा. डॉ. अंबादास घुले यांनी बोलताना असे सांगितले की, यशवंतराव चव्हाण हे सर्वसामान्य माणुस राजकारणात आला पाहिजे यांसाठी कायम त्यांनी प्रयत्न केले, मानवतावादी दृष्टीकोन साहित्य सध्या उपलब्धता नाही. यशवंतराव चव्हाण यांचे चरित्र कृष्णाकाठ आज वैचारिक जडणघडणीसाठी वाचणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमात प्राचार्या डॉ वनमाला गुंडरे,  यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पृथ्वीराज साठे होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिलीप भिसे यांनी केले, तर आभार प्रा. मुकुंद राजपंखे यांनी मानले, यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाई व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
उद्योजक व मसीआ माजी अध्यक्ष सुनील किर्दक व्यापार-उद्योगाला करोनाचा फायदा की तोटा? या विषयावर गुरुवार, १२ मार्च २०२०, दुपारी १२ वाजता आचार्य विनोबा भावे सभागृह, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे व्याख्यान देणार आहेत.

Tuesday 10 March 2020

महिलांनी संतुलित आहार व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा... - डॉ. सौ. कल्पना संकलेचा


जागतिक महिला दिन
नाशिक (दि. ९) : आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून मनाची व शरीराची काळजी घेणे म्हणजेच जीवनाचा आनंद घेण्यासाठी सक्षम होणे होय. त्यासाठी जीवनसत्वयुक्त आहार, व्यायाम व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना सुधीर संकलेचा यांनी केले.
विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व आरोग्यया विषयांवर डॉ. सौ. कल्पना संकलेचा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सदर कार्यक्रम विश्वास हब येथे संपन्न झाला.       
डॉ. सौ. संकलेचा यांनी यावेळी अ‍ॅनेमिया, फायब्रॉइड, विविध कॅन्सर या आजारांची लक्षणे व वेळीच घ्यायची काळजी तसेच रक्तदाब, हिमोग्लोबिन, बोन डेन्सीटी या तपासण्यांची गरज सांगितली व उपस्थित महिलांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना विश्वास ठाकूर म्हणाले की, कुटुंबाला घरपण देणारी महिला, अनेक आघाड्यांवर मेहनतीने, निरपेक्षपणे लढत असते. तिचे आरोग्य उत्तम तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम असते. म्हणूनच महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.
यावेळी कोरोना व्हायरस विषयी जनप्रबोधनपर माहिती व उपायांविषयी माहिती देण्यात आली. बँकेच्या कर्मचारी, अधिकार्‍यांना हँड सॅनिटायझर, ग्लोजचे वाटप करण्यात आले.
डॉ. कल्पना संकलेचा यांचे स्वागत वैशाली जामदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे, प्रियंका ठाकूर आदिंनी परिश्रम घेतले.






Monday 9 March 2020

यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रांच्या अभिवाचनाचे आयोजन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा केंद्र ठाणे तर्फे राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रांच्या अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रांचे अभिवाचन डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे आणि मकरंद सावंत सादर करणार आहेत. रविवार दिनांक १५ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता, ठाणे नगर वाचन मंदिर, टेंभीनाका, ठाणे (पश्चिम) येथे विनामूल्य हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Friday 6 March 2020

डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखतीचं आयोजन

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई ; दि. ६ : चंद्रकांत नागेशराव पाटील यांचा जन्म ०३ सप्टेंबर १९४४ रोजी अंबाजोगाई, बीड येथे झाला. ते मराठी कवी, अनुवादक आणि समीक्षक आहेत. महाराष्ट्रातील १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठीप्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला आहे. मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’ हा पुरस्कार त्यांना १४ सप्टेंबर, २०१९ रोजी प्रदान करण्यात आला आहे.
मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. भीष्म सहानी यांचीतमसही कादंबरी, चंद्रकांत देवताले, पाश इत्यादी नामवंत कवींचे मराठी अनुवाद, मराठी कवितांचे हिंदी अनुवाद, परदेशातील कवींच्या निवडक कवितांचे मराठी अनुवाद, मराठी आणि हिंदी भाषेत लिहीलेली साहित्य समीक्षा, वर्तमानपत्रांतून स्तंभ लेखन अशा माध्यमांतून ते व्यक्त होत असतात. हिंदी आणि मराठी भाषेत चंद्रकांत पाटील यांची आजवर ५० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे करण्यात आले होते. त्यांची ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अभ्यासक सुनील तांबे यांनी घेतली.
या मुलाखतीत कविता, संमेलने, अनुवाद, वाचनीयता, साहित्य व्यवहार या अनुषंगाने डॉ. चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांनी त्यांच्या साहित्याबद्दलचा, त्याच्या लेखनाबद्दलचा, त्यांनी केलेल्या लेखनाचा, अनुभवांचा उलगडा केला.
आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या अनुभवांचं प्रभावी शब्दांकन करणं आणि कमीत कमी शब्दांत शब्दांकन करणं आणि त्याच्या आधारे एक सृष्टी निर्माण करणं, एक जग निर्माण करण हिच माझी कवितेबद्दलची भूमिका आहे, असं संक्षिप्त मत त्यांनी व्यक्त केलं.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, कवी वसंत गुर्जर, श्याम मनोहर, रामदासजी भटकळ, राम दुतोंडे आदि मान्यवर उपस्थित होते.





Tuesday 3 March 2020

एक अस्सल नाट्यानुभव ‘शब्दांची रोजनिशी’ संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, वी नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित, अतुल पेठे दिगदर्शित शब्दांची रोजनिशीहा नाट्याविष्कार वाशी येथे केतकी थत्ते, अतुल पेठे यांनी सादर केला. नाट्य रसिकांनी दिलेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे सभागृह गच्च भरले होते.
जगातूनच अस्सल भाषेचा ऱ्हास होत आहे. मराठी भाषेबद्दल तर हे अधिकच अधोरेखित होतं. विविध भाषा, त्यावर होणाऱ्या अन्य भाषेंची अतिक्रमणे व ह्यातून मूळ भाषेतील शब्दांचे लुप्त होणे व एकूणच भाषेचा ऱ्हास होत जाणे, ह्यावर मार्मिक भाष्य करणारं प्रायोगिक व दुर्बोधतेतुन सरलतेकडे नेणारा अतुल पेठे व केतकी थत्ते ह्यांच्या थक्क करणाऱ्या अभिनयाने नटलेला नाट्याविष्कार म्हणजे शब्दांची रोजनिशी हे नाटक. दिड तासाचा हा प्रयोग नवी मुंबई केंद्राच्या सह प्रायोजकत्वातून वाशीच्या साहित्य मंदिर वातानुकूलित सभागृहात पार पडला, तेव्हा पूर्ण वेळ निशब्द शांतता पसरली होती, रसिक प्रयोग पाहण्यात गुंतून गेले होते. अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांच्या प्रयत्नाने नवी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवी मुंबई विभागीय केंद्राच्या माध्यमातून असे सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांना पहायला मिळत आहेत.