Wednesday 31 July 2019

आयडिया ऑफ इंडिया



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांचे आयडिया ऑफ इंडिया या विषयावर विनामूल्य व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बुधवार १४ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता, रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट येथे व्याख्यान संपन्न होणार असून सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Sunday 28 July 2019

'मेळा' दासू वैद्य ललितलेखसंग्रह प्रकाशन सोहळा…



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, पॉप्युलर प्रकाशन व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०१९, सायंकाळी ६.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हनहिल्स, औरंगाबाद येथे 'मेळा' दासू वैद्य यांच्या ललितलेखांच्या संग्रहांचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. दासू वैद्य, कवी सौमित्र आणि पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा सर्वांसाठी खुला असून सर्वानी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Thursday 25 July 2019

बांधणी कार्यशाळा


भारतात विशेषतः गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये वापरल्या जाणार्या प्राचीन हस्तकलांपैकी बांधणी एक आहे. भारतात साडी, कुर्ता व ओढणी तयार करण्यासाठी बांधणी कला वापरली गेली आहे. शब्द 'बांधणी' हा शब्द बंधन पासून बनलेला आहे. ज्याचा अर्थ कापड बांधणे असा आहे. कापड तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत जे वायब्रेंट रंग वापरून नमुने आणि फॉर्म तयार करतातप्राचीन भारतीय संस्कृती आणि कलांबद्दल मुलांना जागृकता निर्माण व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पूजा शिंदे, प्राची घाणेकर, शिवानी धनावडे यांनी या कार्यशाळेत मुलांना मार्गदर्शन केले. ठळक आणि उज्ज्वल रंग मुलांना सृजनशीलता, सकारात्मकता आणि एकत्रितता आणण्यास प्रोत्साहित करतात.







Wednesday 24 July 2019

विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा वापर करून नाविन्याचा शोध घ्यावा - सुनील तांबे

 अमेरिका नावाचा खंड अस्तित्वात आहे याची सुतराम कल्पना कोलंबसला नव्हती. परंतु अमेरिका युरोपियन लोकांच्या कल्पनेत होती. तिची कल्पना त्यांनी केली होती. त्या कल्पनेचा पाठपुरावा करताना अमेरिका त्यांना गवसली. तसेच आपल्या जागेवरून न हलता काही किलोमीटर अंतरावरील माणसाशी आपण बोलू शकतो ही कल्पना ग्रॅहॅम बेलने केली त्यानंतर टेलिफोनचा शोध लागला. जे आजवर कुणालाही ज्ञात नाही अशा अज्ञातातला एखादा कण वा तुकडा शोधायचा असेल तर कल्पना करावी लागते. आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास धरावा लागतो. भारतीयांकडे कल्पनाशक्तीची वानवा आहे. आपल्याला कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असो, मुंबईचं सिंगापूर वा शांघाय. आपण पाश्चात्यांकडून कल्पना घेतो. आपण नव्या जगाची कल्पना करत नाही.
तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने या पुढील काळात या आदर्शांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आणाव्यात असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुनील तांबे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक मुंबई येथील के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांना मिळाले असून, त्या महाविद्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उकरंडे, प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, उपप्राचार्य डॉ.अनिता पाटील, अंकाच्या संपादक प्रा. वृषाली देवळे उपस्थित होते. नवमहाराष्ट्र्र युवा अभियानाच्या वतीने राज्य संघटक नीलेश राऊत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनीषा खिल्लारे, रमेश मोरे यांनी परिश्रम घेतले.



बाउल सौमित्र काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, पॉप्युलर प्रकाशन व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०१९, सायंकाळी ६.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हनहिल्स, औरंगाबाद येथे बाउल सौमित्र काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कवी सौमित्र यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून बाउल चे काव्यवाचन ते करणार आहेत. हा सोहळा सर्वांसाठी खुला असून सर्वानी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Sunday 21 July 2019

वृक्षारोपण समारंभ



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई आणि नेरुळ- बेलापूर वॉकर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पारसिक हिलवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम व जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. दोन्ही संस्थांचे अध्यक्ष श्री प्रमोद कर्नाड, नगरसेवक व सभागृह नेता रवींद्र इथापे, नेत्रा शिर्के, सलुजा व संदीप सुतार यासह सुमारे १५० सदस्य उत्साहात हजर होते व वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्तम संपन्न झाला.



पं. मकरंद हिंगणे यांच्या प्रयोगशील स्वरांनी रसिकांना दिला अनोखा आनंद


विश्वास ग्रृपतर्फे सुर विश्वासचे *सहावे पुष्प




शास्त्रीय संगीत ते भक्ती संगीत अशा सुमधुर आणि प्रयोगशील स्वरांची मेजवानी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते सूरविश्वास मैफिलीत सुप्रसिद्ध गायक पं.मकरंद हिंगणे यांचे गायन. सूरविश्वासचे सहावे पुष्प त्यांनी गुंफले. सावरकरनगर येथील विश्वास हब येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वासहा अनोखा उपक्रम विश्वास गृ्रपतर्फे सुरु करण्यात आला आहे. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
मैफलीची सुरुवात आज बधाई बाजे... घनश्याम कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात श्रावण मेघांनी आच्छादित वातावरणात जणू सूर्योदय झाला. नंद यशोदेचे सगळे अभिनंदन करू लागले. हा हर्षोल्लास सालगवराली रागाच्या स्वरांनी श्रोत्यांसमोर साकारला. काहीश्या अनवट अशा, दक्षिण भारतीय संगीतातील या रागानंतर
दरस बिन सूनोही बंदिश सादर केली आणि वातावरणात स्वरांनी रिमझीमच जणू सुरु झाली.

Saturday 20 July 2019

विज्ञानगंगाचे चाळीसावे पुष्प ‘भारतीय गणिती परंपरा’ संपन्न..


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत चाळीसावे भारतीय गणिती परंपराव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. सुधाकर आगरकर यांनी गणिताचा पाया भारतात कसा रोवला गेला, प्राचीन गणित काय होते, त्याचा कसा उपयोग केला जात असे, अशा वेगवेगळ्या विषयावर उदाहरण देऊन सांगितले. गणितात उपलब्ध असलेल्या पुस्तकांविषयही त्यांनी यावेळी माहिती दिली. भारताचा गणितामध्ये उल्लेखनीय वाटा आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.









Friday 19 July 2019

दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास व ध्येय निर्माण करावे - विश्वास ठाकूर


दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असून त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांना आधुनिक जीवन जाणिवांचे भान देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ परभणी, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, नाशिक व विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक कृत्रिम अवयव व साधनांचे मोफत वाटप करण्यासाठी शिबीराचे आयोजन कुसुमाग्रज स्मारक येथे करण्यात आले त्याप्रसंगी श्री. ठाकूर बोलत होते. ते म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींनी अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळेपण निर्माण केले आहे. ते समाजासाठी आदर्शवत आहेत.
शिबिरात १५० हून अधिक दिव्यांग व्यक्तींना व्हील चेअर, श्रवण यंत्र, कुबडी, एमआर किट, कॅलिपर स्प्लिट, जयपूर फूट, कमोड चेअर, वॉकर एल्बो’, क्रचेस इ. सहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना जिल्हा परिषदेचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी शासनाच्या दिव्यांग व्यक्तिंसाठी विविध योजनांची माहिती दिली व अशा शिबिरांच्या माध्यमातून होणार्‍या फायद्यांची माहिती दिली. याप्रसंगी प्रकल्प संयोजक के.एस. उईके उपस्थित होते. तसेच जितेंद्र दाभाडे, ज्ञानेश्वर जाधव, शेख कलिम, नसिम खान यांनी शिबीरार्थींची तपासणी करून साहित्यांचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा पगारे यांनी केले.





शनिवार, २७ जुलैला चित्रपट चावडीत ‘रोमिओ अॅण्ड ज्युलिएट’...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत, शनिवार, दि. २७ जुलै २०१९ रोजी सायं. ६ वा. विलियम शेक्सपिअरच्या नाटकावर आधारित १९६८ मधील ब्रिटिश इटालियन रोमिओ अॅण्ड ज्युलिएटहा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘आंद्रे रूबलेव’


चित्रपट चावडी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व 
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शनिवार २० जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध रशियन दिग्दर्शक आंद्रे तारकोवस्की यांचा आंद्रे रूबलेवहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
आंद्रे रूबलेव हा चित्रकार १४ व्या शतकाच्या अखेर व १५ व्या शतकाच्या सुरूवातीला रशियात होऊन गेला. हा त्याचा रूढअर्थाने चरित्रपट आहे. तारकोवस्की अतिशय अत्यंत संयत व तणावरहीत गतीने चित्रप्रतिमांची व दृष्यांची एक सुंदर इमारत रचतो. ऑगस्टमधील वादळ, हिवाळ्यातील बर्फाच्छादीत शेते, शेतकरी व धर्मगुरूंचा खडतर निसर्गाशी चाललेला संघर्ष, उच्च वर्णियांची घोड्यावरून रपेट अशा अनेक दृष्यांमधून आंद्रे रूबलेव हा चित्रकार उलगडत जातो. या पार्श्‍वभूमीवर कलाकार व धर्मगुरू असलेला रूबेलेवचा अंतर:संघर्षही चितारला आहे. संपूर्ण कृष्णधवल व नितांत सुंदर छायाचित्रणाने विणलेला आंद्रे रूबलेव शेवटच्या पाच मिनीटांत काय दाखवतो ही चित्रपट रसिकांना वेगळीच अनुभूती आहे. 
१९९६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १८२ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.



Wednesday 17 July 2019

हवामान बदलाचे संकट रोखूया...!


जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे संकट समस्त मानवजात आणि पृथ्वीतलावरील सृष्टीला ग्रासून टाकत आहे. स्वाभाविकपणे भारत आणि महाराष्ट्रही यातून सुटलेला नाही.आपण सर्वजण आपापल्या क्षमतेनुसार पर्यावरण संरक्षणाच्या कामात सक्रीय आहोत. जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या खाली आणणे हे जागतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनव्यवस्थेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच कटिबद्ध व्हायचं आहे.
यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने बुधवार दिनांक १७ जुलै, २०१९ रोजी सकाळी १०.३० ते सायं ५.३० यावेळेत वरील विषयांवर बैठक व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पर्यावरणाच्या क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी झाले होते. प्रथमतः प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. दत्ता बाळसराफ यांनी उपस्थितांचे स्वागत केले व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस मा. श्री. शरद काळे यांनी प्रास्ताविक केले. टेरी संस्थेच्या डॉ. अंजली पारसनीस, यांनी हवामान बदल या विषयवार सादरीकरण केले. महाराष्ट्राचा हवमान बदल विषयक आराखडा तयार करताना टेरी संस्थेने केलेले महाराष्ट्रातील विविध भौगोलिक पट्ट्यातील स्थानांचा आणि तेथील हवामानाचा अभ्यास करताना आलेले अनुभव तसेच तयार केलेला अभ्यास डॉ. अंजली पारसनीस यांनी मांडला. त्याच बरोबर पुढील ५० वर्षांत महाराष्ट्राचे हवामान विषयक चित्र कसे असेल याचे भविष्यचित्रही दाखवले. या परिणामकारक सादरीकरणामुळे उपस्थितांना हवामानबदल समस्येचे गांभीर्य तसेच त्यावर करावयाच्या तातडीच्या उपाययोजानांची गरज लक्षात आली. बर्ड लाईफ इंटरनॅशनलच्या आशियाई विभागाचे प्रमुख श्री. प्रशांत महाजन यांनी हवामान बदल आणि जैवाविविधता यावर भर देत हवामान बदलाचा पक्षांवर होत असलेल्या परिणामांवर सादरीकरण केले. तर पार्थ बापट यांनी निश्चित ध्येय धोरणे घेऊन योग्य दिशेने कृतीशील उपक्रमांद्वारे या समस्येला उत्तर शोधले पाहिजे असे प्रतिपादन केले. यानंतर स्त्री मुक्ती संघटनेच्या श्रीम. ज्योती म्हापसेकर यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्याचे श्री. अविनाश कुबल,  श्रीम. रश्मी जोशी,  श्री. भगवान केसभट, श्री. फिरोज मसानी,  श्री. सुनील तांबे,  प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. दत्ता बाळसराफ,  श्री. प्रशांत शिंदे यांनी चर्चेमध्ये सहभागी होऊन कृती आराखडा तयर करण्याच्या दृष्टीने विविध मुद्दे सुचवले. त्यानुसार महाराष्ट्राचे ५० शाळा आणि ५० महाविद्यालये हा क्र्रुती आराखडा राबविण्यासाठी निवडले जातील. ही बैठक यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीम. मनिषा खिल्लारे, श्रीम. मीनल सावंत,  श्री. उमाकांत जगदाळे, श्री. महेश साळवी यांनी विशेष प्रयत्न केले.






Tuesday 16 July 2019

यंदाचा अर्थसंकल्प अर्थकारणाची दिशा बदलणारा : चंद्रशेखर टिळक


अर्थसंकल्पाला अनेक कंगोरे आहेत. जे भविष्यातील बदलांची नांदी म्हणवतील. २०१९ चा अर्थसंकल्प हा देशाच्या अर्थकारणाची दिशा बदलणारा म्हणवला जाऊ शकतो. आधार-पॅन लिंकिंग हे लोकांना साधा सरकारी विषय वाटत असला तरी तो करचुकव्यांवर सरकारने केलेला सर्जिकल स्ट्राईकच असल्याचे मत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान - विभागीय केंद्र औरंगाबाद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर व एमजीएम जनसंवाद व वृत्रपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्पोरेट जगतासाठी अर्थसंकल्प २०१९या विषयावर त्यांनी एमजीएमच्या आइन्स्टाईन सभागृहात आपले विचार मांडले. इन्कमटॅक्सच्या माध्यमातून सरकारला मिळणारा कर हा ११ लाख कोटींच्या पुढे आहे. त्यामुळे ही यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकार पाऊले टाकणार आहे. तुम्ही इतका कर भरला आहे, इतका इन्कमटॅक्स शिल्लक आहे, असे एसएमएस यापुढे मोबाईलवर आले तर आश्चर्य वाटायला नको, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला सिएमआयएचे अध्यक्ष गिरीधरण संगनेरिया, शिवप्रसाद जाजू, राम भोगले, विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिव नीलेश राऊत, आशिष नहार,  रविंद्र कोंडेकर, मुकुंद कुलकर्णी, डॉ. रेखा शेळके, दीपली चांडक, जगन्नाथ काळे, सुबोध जाधव, शिव कदम, वेदांशु पाटील आदींची उपस्थिती होती.
ई-व्हेईकल्सची सध्या कन्सेप्टरुजतेय
ई-व्हेईकल्सचे धोरण राबवून २०२२ पर्यंत अशी वाहने बाजारात आणण्यासाठी सरकार कार्य करीत असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले. देशातील ऑटो कंपन्यांचे यातून नुकसान होईल आणि रोजगार अडचणीत येण्याचा धोका उद्योजक व्यक्त करीत आहेत; मात्र सरकारच्या दृष्टीने सध्या कार्य त्या वेगाने सुरु नाही. दरम्यान, ऑटो क्षेत्राच्या भविष्याविषयी ऑटो विश्वाचे अभ्यासक उमेश दाशरथी यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना याबाबत चिंता व्यक्त केली आहे.





नवलेखकांच्या लेखन, आशयावर संस्कार गरजेचे – वसंत भोसले


वारणा वार्षिक नियतकालिकास
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा नियतकालिक पुरस्कार

माणसाची जीवनशैलीच बदलत चालली असून जाणीवा, संवाद बदलत आहेत. आधुनिक साधनांचा उपयोग करणारी नवी संस्कृती तयार होत आहे. दर्जेदार लिकाणासाठी अभ्यासपूर्ण माहिती पुरवून आदर्श, नवीन मूल्य जपणारे, नवविचाराने प्रेरित असणारे साहित्य आणि साहित्यकार घडणे ही आजच्या काळाची गरज आहे. नवलेखकांच्या लिखाणावर, आशयावर संस्कार करण्याची गरज असून नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांना दर्जेदार लेखन लिहिण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन शिक्षकांच्या पुढे असल्याचे मत लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले.
वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात वारणा वार्षिकनियतकालिकास मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा प्रथम पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात वसंत भोसले बोलत होते.
दत्ता बाळसराफ यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देऊन म्हणाले की, नवलेखकांची आजच्या समाजाचे वास्तव साहित्याच्या माध्यमातून मांडावे, गेल्या साठ-सत्तर वर्षांत देशाने खूप प्रगती केली असून सन २०१४ नंतरच प्रगती होत आहे हा गैरसमज पसरवत असल्याचे सांगितले. ऑनलाईनच्या जमान्यात ही माध्यमांनी समाजाच्या व राजकारणाच्या वास्तव घडामोडी समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन बाळसराफ यांनी केले. कार्यक्रमात दत्ता बाळसराफ, नवमहाराष्ट्र युवा अभियानचे राज्य संघटक नीलेश राऊत, सयोजक विजय कान्हेकर, वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. सुरेखा शहापुरे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी  नवमहाराष्ट्र युवा अभियानचे राज्य संघटक नीलेश राऊत यांनी प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय शब्दगौरव वक्तृत्व स्पर्धेची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी २०० हून अधिक नियतकालिक स्पर्धेतून वारणा, नियतकालिक स्पर्धेत प्रथक क्रमांक प्राप्त करून यशस्वी ठरल्याचे सांगितले.







Monday 15 July 2019

हवामान बदलाचे संकट रोखूया – चर्चासत्र

                                                                                                 
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे संकट समस्त मानवजात आणि पृथ्वीतलावरील सृष्टीला ग्रासून  टाकत आहे. स्वाभाविकपणे भारत आणि महाराष्ट्रही यातून सुटलेला नाही. आपण सर्व जण आपापल्या क्षमतेनुसार पर्यावरण संरक्षणाच्या कामात सक्रीय आहोत. जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या खाली आणणे हे जागतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनव्यवस्थेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच कटिबद्ध व्हायचं आहे. यासाठी आवश्यक लोकशिक्षण आणि कृती आराखडा राबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन चर्चा  विनिमय करावा अशी कळकळीची विनंती आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबईच्या वतीने बुधवार दिनांक १७ जुलै, २०१९ रोजी सकाळी १०.३० ते सायं ५.३० यावेळेत वरील विषयांवर बैठक व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पूर्व नोंदणी आवश्यक ...संपर्क :- संगीता खरात ९९३०४०१३२९