Friday 28 June 2019

'करियर वर बोलू काही'


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे तर्फे शनिवार दिनांक २९ जून २०१९ रोजी श्री. यजुर्वेन्द्र महाजन, दीपस्तंभ फौंडेशन, जळगाव यांचे 'करियर वर बोलू काही' या विषयावर के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, विद्याविहार येथे सकाळी ८.३० ते १० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.



सामाजिक कार्यकर्ता निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान व समतावादी प्रतिष्ठान, चाफेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय सामाजिक कार्यकर्ता निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर नेरळ, जि. रायगड येथे दि. २९ व ३० जून ,२०१९ रोजी स. ९.०० ते सायं.६.०० या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबिरात विविध विषयांवरील व्याख्याने, गटचर्चा तसेच नेचरट्रेल इत्यादी मार्फत सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Thursday 27 June 2019

महिला धोरण पंचवीस वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक क्रांतीकारी पाऊल टाकून महिला धोरण लागू केले होते. त्यास आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र परभणीच्या वतीने "महिलांचे स्वयंसिध्दतेकडे वाटचाल"या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दि. २५ जून २०१९ रोजी परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान परभणी विभागीय केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने प्रशासकिय कामासाठी RFO सौ.सुषमा नाना जाधव व ज्योती बगाटे(कोषाधिकारी)यांना तर उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेला सौ.जयश्री अंबादासराव मुंढे, सौ माधूरी सूधीर राजूरकर व आयशा बेगम यांना कर्तृत्वान महिला म्हणून मान्यवरांचे हस्ते सन्मान-पत्र, पुस्तक व रोपटे देवून यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.सौ.मीनाताई वरपूडकर (महापौर,परभणी म.न.पा.) तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान परभणी केंन्द्राच्या निमंत्रक मा.प्रा.फौजिया खान मॅडम(माजी राज्य मंत्री) मा.सौ.भावनाताई नखाते(उपाध्यक्ष,जि.प.परभणी तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान परभणी केंन्द्राच्या महिला व्यासपीठ प्रमुख)तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा.डॉ.विशाला पटनम, मा.सौ.माधूरी क्षिरसागर, मा.मिता गूलवाडी, मा.श्री.प्रताप देशमुख(माजी.महापौर,म.न.पा.परभणी) मा.श्री.कांतराव देशमुख(झरीकर काका)(सल्लागार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)मा.श्री.विजय कान्हेकर(सचिव,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे संयोजन तथा सुत्रसंचालन मा.सौ.सोनाली देशमुख(राष्ट्रीय सरचिटणीस, महिला आघाडी)तर आभार मा.सौ.नंदाताई राठोड(शहराध्यक्ष महिला आघाडी)यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू वैरागड(समन्वयक,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र,परभणी)यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणीचे सव॔ सन्माननीय सदस्य तथा शहरातील प्रतिष्ठित महिला, युवती, युवक तथा पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






करिअर मार्गदर्शन व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद...




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे दहावी व बारावी नंतरचं नवं क्षितीज’ या विषयावर प्रा. संदीप नेमळेकर यांचे स्टर्लिन कॉलेज नेरूळ येथे करिअर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी २०० हून अधिक उपस्थित विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. प्राध्यापक संदीप नेमळेकर व मिलिंद आचार्य यांनी ३ तास सविस्तर मार्गदर्शन केल्यावर विद्यार्थ्यांच्या अनेक करिअरविषयक प्रश्न विचारले असता त्यांनी मार्गदर्शन केले. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे मुलांचा कल पाहून त्यांना उचित मार्गदर्शन झाल्याने पालकवर्ग समाधानी होता. 













Wednesday 26 June 2019

नवीन शैक्षणिक धोरण मसुदा - २०१९ विषयावर चर्चासत्र


शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंच आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ६ जुलै २०१९ रोजी दुपारी २ वाजता गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे शिक्षण कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी (समन्वयक) भ्रमणध्वनी क्रमांक ९९६७५४६४९८ वर संपर्क करा.


फिनलंडची शिक्षणपद्धती - प्रशिक्षण - कार्यशाळा



फिनलंड या देशाची शिक्षणपद्धती जगात सर्वोत्कृष्ट समजली जाते. या पद्धतीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेरंब कुलकर्णी आणि डॉ. शिरीन कुलकर्णी सध्या भारतात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई एक कार्यशाळा आयोजित करत आहे. या दोन्ही तज्ज्ञांचा परिचय आणि कार्यक्रमाचा तपशील सोबत जोडला आहे.
कार्यशाळेचा विषय: फिनलंडची शिक्षणपद्धती
दिनांक: (रविवार) ७ जुलै, २०१९
वेळ: सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० 
स्थळ: गांधी भवन, कोथरूड, पुणे ४११०३८
कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्थाचालक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षणप्रेमी यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


नोंदणी शुल्क : नाही. (मात्र या विषयात रस आहे, हे दाखवण्यासाठी १०० रुपये एवढी नाममात्र रक्कम कार्यक्रमासाठी आल्यानंतर प्रतिनिधींकडून आकारण्यात येईल.)
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
०९.३० १०.०० चहापान
१०.०० १.०० भोजनपूर्व सत्र
१.०० २.०० भोजन
२.०० ५.०० भोजनोत्तर सत्र

कार्यशाळेत फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचे पुढील मुद्दे हाताळण्यात येतील:-
*
ऐतिहासिक अंगांनी आढावा
*
धोरणकर्त्यांची भूमिका
*
शिक्षकांचे प्रशिक्षण
*
मूल्यमापन - महत्त्व आणि   पद्धती
*
फिनलंडकडून भारताला काय शिकता येईल?

कार्यशाळेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर होईल.



Monday 24 June 2019

राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा सर्वसमावेशक,प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे : डॉ.वसंत काळपांडे

राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा सर्वसमावेशक,प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे : डॉ.वसंत काळपांडे



औरंगाबाद : दि.२३ – केंद्र शासनाच्या वतीने चर्चा व सूचनेसाठी जाहीर करण्यात आलेला राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा हा सर्वसमावेशक व शिक्षण प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचा विचार करून बनवलेला असून,त्यावर कुठल्याच एका राजकीय विचारप्रक्रियेची छाप नाही,हे त्याचे वेगळेपण आहे.वंचित घटक,विशेष व्यक्ती,तृतीयपंथी या सगळ्या सामाजिक घटकांना शैक्षणिक प्रक्रियेत सामावून घेण्याचा विचार यात मांडण्यात आला आहे.यातील तरतुदींचा अभ्यास करून केंद्र शासनाला आपण वैयक्तिक पातळीवर देखील सूचना पाठवू शकतो.तीस जून ही सूचना पाठविण्याची शेवटची तारीख आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक व शिक्षण विकास मंचाचे संयोजक डॉ.वसंत काळपांडे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई – विभागीय केंद्र औरंगाबाद,महात्मा गांधी मिशन,शिक्षण विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते.याप्रसंगी विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.बी.बी.चव्हाण,प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ,केंद्राचे कार्यकारिणी सदस्य डॉ.श्रीरंग देशपांडे,डॉ.अपर्णा कक्कड,डॉ,अनुया दळवी,साधना शाह यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ.बी.बी.चव्हाण यांनी शिक्षण धोरण कायदा २०१९ च्या महत्वाच्या तरतुदींचे विस्तृत सादरीकरण केले.या चर्चासत्रात शंभरहून अधिक मुख्याध्यापक,प्राचार्य,संस्थाचालक,शिक्षक,प्राध्यापक,बाल मनोचिकीत्सक,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,पालक यांनी सहभाग नोंदवला.सादरीकरण झाल्यानंतर सर्व उपस्थित प्रतिनिधींनी आपल्या सूचना व अभिप्राय व्यक्त केले

या धोरणात वय वर्ष ३ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या प्रगतीबद्दल तरतुदी करण्यात आलेल्या आहे,त्यात प्रामुख्याने पूर्वप्राथमिक वयोगटाचा समावेश हा आरटीई मध्ये करणे,शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदलून तो पूर्वप्राथमिक गटापासून सुरु तयार करणे.राष्ट्रीय व राज्य शिक्षण आयोगाची स्थापना,बी एड चा अभ्यासक्रम दोन व चार वर्षांचा करणे अशा अनेक बाबींचा समावेश आहे.नर्सरी ते पदव्युत्तर शिक्षणाचा विचार यात करण्यात आलेला आहे.आठवीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विषयांची निवड करता येणार आहे,म्हणजेच विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान बरोबर नाट्य अथवा नृत्यकला शिकता येईल.अशा अनेक तरतुदी असलेल्या या धोरणाच्या मसुद्याचा अभ्यास करून केंद्र शासनाला तीस जूनच्या आत आपणास आपल्या सूचना व अभिप्रायnep.edu@nic.com या ईमेल आयडीवर पाठविता येतील.

या चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत,सुबोध जाधव,दीपक जाधव,रुपेश मोरे,राजेंद्र वाळके,प्रवीण देशमुख,त्रिशूल कुलकर्णी,श्रीकांत देशपांडे,महेश अचिंतलवार,विनोद सिनकर,उमेश राऊत आदींनी परिश्रम घेतले.

Sunday 23 June 2019

विज्ञानगंगाचे एकोणचाळीसावे पुष्प ‘बहुपयोगी गणित’ संपन्न..




विज्ञानगंगाचे एकोणचाळीसावे पुष्प ‘बहुपयोगी गणित’ संपन्न..
संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.








यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत एकोणचाळीसावे ‘बहुपयोगी गणित’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यांते डॉ. विवेक पाटकर यांनी या विषयावर बोलताना गणित पदोपदी आपण उपयोग करीत असतो. अभिजात गणित व त्यांचे उपयोग, नवीन गणित व नविन उपयोग, नवीन प्रश्न व नवीन गणित अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी उदाहरण देऊन विज्ञानप्रेमींना सांगितले. तसेच विज्ञानप्रेमीच्या प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. आपण ह्या व्याख्यानाचे फेसबुक लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/392559764692937/संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Wednesday 19 June 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित करिअर मार्गदर्शन व्याख्यान...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे दहावी व बारावी नंतरचं नवं क्षितीज’ या विषयावर प्रा. संदीप नेमळेकर यांचे करिअर मार्गदर्शन व्याख्यान शुक्रवार २१ जून २०१९ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत स्टर्लिंग काँलेज हाँल, नेरुळ येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.

नवीन शैक्षणिक धोरण मसुदा - २०१९ विषयावर चर्चासत्राचे आयोजन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी मिशन व शिक्षण विकास मंच यांच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण मसुदा- २०१९ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन रविवार दि. २३ जून २०१९ रोजी करण्यात आलेले आहे. जेएनईसी महाविद्यालयात सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान हे चर्चासत्र संपन्न होईल. शिक्षणतज्ज्ञ आणि मुख्य संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. बी.बी.चव्हाण, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुभाष कांबळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सुरजप्रसाद जैस्वाल, विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्रयोगशील शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अभ्यासक, पालक, पत्रकार या चर्चेत सहभाग नोंदवणार आहे.
या नवीन शैक्षणिक धोरणातील चांगल्या तरतुदी कोणत्या आहेत? कोणत्या तरतूदीचा अजून अंतर्भाव यात असावा? कोणत्या तरतूदी बरोबर नाहीत त्यात काय बदल व्हावा? यासंदर्भात या चर्चेत विचार व्यक्त केले जाणार आहे. तसेच या चर्चेत अंतिम झालेल्या मुद्दांचा गोषवारा केंद्र शासनाला या धोरणाच्या मसुद्याबाबतचा अभिप्राय म्हणून कळविला जाणार आहे. या चर्चासत्रात सहभाग मर्यादीत व निःशुल्क असून केवळ नोंदणी करणार्‍या प्रतिनिधींनाच सहभागी होता येणार आहे. नोंदणीसाठी ०२४०-२३५१७७९ अथवा ९८२३०६७८७९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मूळे, सचिव नीलेश राऊत, सदस्य डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, प्रा.दासू वैद्य, डॉ.मुस्तजीब खान, डॉ.अपर्णा कक्कड, बिजली देशमुख, डॉ.रेखा शेळके, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, रेणुका कड, विनोद सिनकर, रुपेश मोरे, राजेंद्र वाळके आदींनी केले आहे.



Monday 17 June 2019

‘नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९’ चर्चासत्र संपन्न...

शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंचच्या वतीने चर्चासत्र नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. या विषयाच्या अनुषंगाने बसंती रॉय यांनी प्रेझेंटेशन सादर केले. शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्या तृटी आहेत, तसेच कोणत्या गोष्टी होणं गरजेच आहे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक विकास मंचाचे संयोजक वसंत काळपांडे, दत्ता बाळसराफ , राज्यभरातील वेगवेगळ्या शाळा  कॉलेज आणि  संस्थांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.













‘हिंदू विवाह कायदा.. एक आढावा’ व्याख्यानाचे आयोजन…

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरम आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आपला कायदा जाणून घ्याव्याख्यानमाले अंतर्गत हिंदू विवाह कायदा.. एक आढावाया विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. जे. बी. पाटील हे प्रमुख मार्गदर्शक होते. हिंदू विवाह कायदा कोणाला लागू पडतो, त्याचा उद्देश काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिली.
हिंदू विवाह कायदा , त्याअंतर्गत येणाऱ्या गोष्टी, घटस्फोट याविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. शेवटी प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.










सुखदा बेहेरे- दीक्षित यांच्या स्वरांच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध...


सूरविश्वास
पं. कुमार गंधर्व यांच्या सुरांचे स्मरण, पं. वसंतराव देशपांडे यांची विलक्षण गायकी यांची आठवण करून देणारी सुरमयी सकाळ आणि आपल्या स्वतंत्र शैलीचा गायनाविष्कार सादर करून सुखदा बेहेरे-दीक्षित यांनी सूर विश्वासची कोवळ्या स्वरांची सोनेरी रिमझिम आनंददायी केली. नव्या पिढीतील गायिका  सुखदा बेहेरे-दीक्षित यांच्या गायनाचे पाचवे पुष्प गुंफले गेले. हर्षद वडजे (हार्मोनियम), गौरव तांबे (तबला) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.
नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वासहा अनोखा उपक्रम विश्वास गृप तर्फे सुरू करण्यात आला आहे. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
नाट्यसंगीतातील गाजलेले पं. वसंतराव देशपांडे यांचे या भवनातील गीत पुरानेनाट्य परंपरेची आठवण करून देणारे होते. पं. कुमार गंधर्व यांचे एक सुर चराचर छायेतून निर्गुण भक्तीचा अनुभव भक्तीमय करून गेला.
याप्रसंगी पं. मकरंद हिंगणे, विराज रानडे, विश्वास ठाकूर यांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. मनोज शिंपी, राजाभाऊ मोगल, रमेश देशमुख, मिलींद धटिंगण, प्रितम नाकील, स्वाती राजवाडे, डॉ. गिरीष वालावलकर, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. विनायक देवधर, मंजुषा चिमोटे, अनिल ओढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.




जीवनातील अनुभवांच्या संहितेचे नेटके व्यवस्थापन म्हणजे उत्तम लेखक...! -डॉ गिरीश वालावलकर



प्रतिभावंत लेखक जीवनाकडे तटस्थपणे आणि नव्या दृष्टीने बघत असतो त्यामुळे त्याच्या येणारे वास्तव वाचकाला आपलेसे वाटते. लेखक समाजाच्या मनोव्यापाराचा अभ्यास करत असतो व शोध घेत असतो. जीवनाच्या प्रवाहाच्या बदलत्या रंगाकडे खऱ्या लेखकाचे लक्ष असते म्हणून त्याची निर्मिती अभिजात व काळाला पुरून उरते, असे प्रतिपादन लेखक व कॉर्पोरेट व्यवस्थापन तज्ञ डॉ.गिरीश वालावलकर यांनी केले.
गिरीश वालावलकर यांच्या लेखनाच्या निर्मिती क्षमतेचे व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाचं जगणं हे वेगवेगळ्या जाणिवांच असते व प्रत्येकाकडे जीवनाची संहिता असते त्यात सर्जनशीलता,
भावना, विचार, अनुभव विश्व असते त्याचा योग्य संगम म्हणजे प्रतिभेचे लेखनाचे व्यवस्थापन असते. ऑस्कर वाईल्ड, विजय तेंडुलकर, श्री ना.पेंडसे, सिग्मन फ्राईड,डोटोव्हसकी, टॉमस हार्डी अशा अनेक लेखकांनी जीवनाचं सत्य मांडले, त्यामुळे त्यांचे लेखन वाचतांना नवं-नवे अर्थ लागत जातात असेही डॉ.वालावलकर म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, आभार विनायक रानडे यांनी मांडले. सूत्रसंचालन स्वाती पाचपांडे यांनी केले. कार्यक्रमास वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार, अश्विनी कुलकर्णी, चित्रकार, मिलिंद जोशी, दिलीप पाटील, शरद पटवा, किरण सोनार, उद्योजक सतीश पाटील आशिष चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.




Thursday 13 June 2019

विज्ञानगंगाचे एकोणचाळीसावे पुष्प ‘बहुपयोगी गणित’...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत बहुपयोगी गणितया विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक पाटकर शुक्रवार दि. २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला,  जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.



Monday 10 June 2019

दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - विश्वास ठाकूर



दिव्यांग बांधवांचे पुर्नवसन हा समाजासाठी मुलभूत जाणिवेचा भाग असून यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकत्त्वाचा दृष्टीकोन जोपासण्याचीही गरज आहे. त्यांच्यात आत्मविश्वास व बळ निर्माण करण्याबरोबरच त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अपंग हक्क विकास मंच, मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील गरजू दिव्यांग बंधु-भगिनींना आवश्यकतेनुसार लागणार्‍या कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यासाठी मोफत नाव नोंदणी व मोजमाप/तपासणी शिबीराचे आयोजन कुमुसाग्रज स्मारक येथे करण्यात आले होते. या तपासणी शिबीरामध्ये व्हिल चेअर, श्रवणयंत्र, कुबडी, एम.आर.किट, कॅलिपर, स्प्लिंट, जयपुर फुट, कमोड चेअर, वॉकर, चष्मा, एल्बो क्रचेस, वॉकिंग स्टिक, अंधचष्मा, अंधकाठी, ब्रेलकिट इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी विश्वास ठाकूर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आज सर्व क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपल्या कतृत्वाने नावलौकिक संपादन केला आहे व आपले वेगळेपण सिध्द केले आहे. समाजाचा आपण काही देणे लागतो. या भावनेने त्यांच्याशी आपण नाते जोडावे. शिबिरात 300 हून अधिक दिव्यांग बंधु भगिनींनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद नाशिक समाज कल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील म्हणाले की
, दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना कार्यरत असून त्यांना अशा शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे.
शिबिरात तपासणी प्रकल्प समन्वयक-जितेंद्र दाभाडे , तंत्रज्ञ-वसीम खान व असिस्टंट तंत्रज्ञ कलीम शेख यांनी काम पाहिले.




Thursday 6 June 2019

शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षण कट्टा


शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'.
|यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंचच्या वतीने चर्चासत्र नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९  चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून २०१९ रोजी दुपारी २ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शिक्षण कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी (समन्वयक) भ्रमणध्वनी क्रमांक ९९६७५४६४९८ वर संपर्क करा.