Thursday 29 August 2019

बोलीभाषा काळजातील भावना घेऊन येते,वक्तृत्व कलेत तिची जोपासना करा - डॉ.अनिता नेवसे जाधव



 यशवंत शब्दगौरव कोल्हापूर विभागीय फेरीचा गणेश लोळगे मानकरी !

दि.२९ (कोल्हापूर) : वेगवेगळ्या भागातून आपली बोली घेऊन आलेल्या आणि वक्तृत्वाची जोपासना करणाऱ्या विद्यार्थी स्पर्धकांनी आपली बोली सोडून शुद्ध भाषा बोलण्याच्या प्रयत्नात आपल्या मूळ भाषेचा गोडवा हरवू देऊ नये. वक्तृत्व कला तुम्हाला आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढायला मदत करते.मी महाविद्यालयीन काळात वक्तृत्व स्पर्धांमधून सहभाग नोंदविला, आज मला न्यायधीश म्हणून न्यायदान करतांना त्या आकलनाचा मोठा उपयोग होतो, असे प्रतिपादन कोल्हापूर कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश डॉ.अनिता जाधव नेमसे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ. श्रीधर येरवाडे उपस्थित होते. तर प्राचार्य डॉ. आर पी लोखंडे, विशाल तांबे, रोहित पाटील, सुवर्णा भुजबळ, आदिल फरास, बाळासाहेब महामुलकर, कल्पेश चौगुले, राकेश कामठे, डॉ.किरण देशमुख, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. ताज मुलानी व प्रा.महेश अचिंतलवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कोल्हापूर विभागीय फेरीत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ५० स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - गणेश ज्ञानदेव लोळगे, अशोकराव माने महाविद्यालय, वाठार, द्वितीय क्रमांक - आलिशा अनिल मोहिते, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सांगली केंद्र, तृतीय क्रमांक - स्वरदा चंद्रशेखर फडणीस, के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, उत्तेजनार्थ - मयूर संजय शिरतोडे, ई एम सी ए राजमाची, कराड व अक्षय अरविंद पाटील, विश्वासराव नाईक महाविद्यालय, बत्तीस शिराळा
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, प्रा. संजय ओमासे, प्रा. प्रकाश चव्हाण, तेजस सन्मुख आदींनी परिश्रम घेतले.






Wednesday 28 August 2019

सृजन कार्यशाळा आयोजित गणपतीची मूर्ती बनवणे कार्यशाळा...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, येथे सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सृजन कार्यशाळेत गणपतीची मूर्ती बनवणे या विषयावर मूर्तीकार प्राची घाणेकर रविवार १ सप्टेंबर सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत इयत्ता सहावी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.



Tuesday 27 August 2019

कल्पनाशक्तीचा वापर वक्तृत्व विकासासाठी आवश्यक : आर.जे.संग्राम खोपडे


भक्ती देशमुख प्रथम परितोषिकाची मानकरी.

दि.२७ (पुणे) : वक्तृत्व कला फक्त तुमचे विचार व्यक्त करण्याचे साधन नाही, तर त्याचा उपयोग तुम्हाला आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या करिअर साठी होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही अधिक चौकस राहून घडणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण केले पाहिजे. तसेच विविध क्षेत्रांमधील पुस्तकांचे वाचन करून तुमच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायला हवा. मनुष्य आणि प्राण्यात तो मोठा फरक आहे. मनुष्याला कल्पनाशक्तीचा वापर करता येतो. त्याचा उपयोग करून आपले वक्तृत्व अधिक सकस करावे, असे आवाहन प्रसिद्ध रेडिओ जॉकी संग्राम खोपडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र्र युवा अभियान व रयत शिक्षण संस्थेचे एस एम जोशी कॉलेज हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या विभागीय फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक चेतन तुपे पाटील होते, तर या कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक विशाल तांबे, संतोषकुमार फड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगुले, विजय कान्हेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तीन सभागृहात सदरील स्पर्धेचे आयोजन करून नंतर दुसरी फेरी घेण्यात आली. अंतिम फेरी मुंबई येथे दि. १८ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक - कु.भक्ती अरविंद देशमुख, आबासाहेब गरवारे महाविद्यालय,
द्वितीय क्रमांक - तेजस दिनकर पाटील, मॉडर्न महाविद्यालय,
तृतीय क्रमांक - अंकिता संजय शिवतारे, एस.पी.कॉलेज,
उत्तेजनार्थ - शुभम सतीश शेंडे, एस. एम. जोशी कॉलेज व
शेख आतिक,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्राचार्या डॉ. सुषमा चाफळकर, अॅड. हनुमंत शिंदे, संतोष सहाणे, पांडुरंग कंद,  अश्विनी पंढरपुरे आणि प्रा. महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वीसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, डॉ. अमित नागरे, डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. ठाकरे, प्रा. दीपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Friday 23 August 2019

‘यशवंत शब्द गौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न’


उत्तम वक्ता होण्यासाठी वाचन व सभोवतालचे सजग भान आवश्यक - प्रा. मिलिंद मुरूगकर
दि. २३, नाशिक : समाज संकेतांना धक्का देणारी माध्यमक्रांती झाल्याने लोकशाहीची प्रक्रीया तीव्र होईल अशी जाणीव निर्माण होण्याऐवजी आज आपण जास्तीत जास्त व्यक्तिवादी होत चाललो आहोत. त्यातूनच माणसांमाणसांत हिंसा उफाळून येत आहे. ते रोखण्यासाठी उत्तम वाचन आणि सभोवतालाकडे सजगपणे पाहणे गरजेचे आहे व त्यासाठी माध्यमांचा अनावश्यक वापर टाळावा. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. मिलिंद मुरूगकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियान व एच. टी. पी. कला, आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता विभागीय यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एच.पी.टी. महाविद्यालयात ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव येथील महाविद्यालयातून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे :
प्रथम क्रमांक : श्रुती बोरस्ते (एच.पी.टी. कला व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालय, नाशिक)
द्वितीय क्रमांक : सौरभ सोनार (डॉ. बाबासाहेब आंबडेर लॉ कॉलेज, धुळे)
तृतीय क्रमांक : शुभांगी ढोमसे (के.के.वाघ महाविद्यालय, पिंपळगाव (ब.)
उत्तेजनार्थ : गायत्री वडघुले (के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक)
उत्तेजनार्थ : महिमा ठोंबरे (एच.पी.टी. कला व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालय, नाशिक)

स्मिता देव यांचे अप्रतिम सुपर फूड्स...

click here for the full video
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे मोफत प्रात्यक्षिक सुपर फूड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युट्यूबवर रूचकर मेजवानी मधून पाककला दाखवणा-या प्रसिद्ध शेफ स्मिता देव यांनी आपल्या पाककलेचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी उपस्थित महिलांना काही पदार्थ करून दाखवले. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, त्याच गोष्टी करा असं त्या म्हणाल्या. शिवाय स्वयंपाकाचा विषय असल्याने या कार्यक्रमाला महिलानी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला.
तसेच गेटकिचच्या प्रिया दिपक यांनी त्यांच्या नैसर्गिक अस्सल कुकवेअर विषयी माहिती दिली. त्याचे फायदे सांगितले. तसच ही भांडी हवी असल्यास kitch.in या संकेतस्थळावरून खरेदी करू शकता.










Thursday 22 August 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी द मिरर


चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शनिवार २४ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध रशियन दिग्दर्शक आंद्रे तारकोवस्की यांचा द मिररहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
हा चित्रपट म्हणजे रशियन दिग्दर्शक कवी आंद्रे तारकोवस्कीचा हा आत्मचिरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट प्रवास, त्याची स्मृती व स्वप्न यांच्या सीमारेषांवर खेळतो. त्याचप्रमाणे त्याच्या स्वदेश रशियाची ही कहाणी आहे. १९३० चे दशक, दुसरे महायुद्ध व १९७० चे दशक अशा कालखंडामध्ये विभागलेला हा चित्रपट इतिहास व एका प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शकाची कहाणी यांचा अत्यंत काव्यात्मक मिलाफ आहे.
१९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १०७ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

शाडू माती गणेश मुर्ती कार्यशाळा संपन्न…


दि. २० : पर्यावरणाचे जनत व संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी इको फ्रेंडलीही संकल्पना प्रत्येकाने आपल्यात रूजवणे म्हणजे निसर्गाशी मैत्री होय. त्यासाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करून प्रत्येकाने आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन सौ. राजश्री शिंपी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणा विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने दिनांक २० व २१ ऑगस्ट रोजी दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. पहिली कार्यशाळा महानगरपालिका शाळा क्र. ४३, अटल बिहारी वाजपेयी प्राथमिक विद्यामंदिर, काठे गल्ली येथे झाली तर दुसरी पंचवटी माध्यमिक विद्यालय उदय कॉलनी क्रांतीनगर, पंचवटी येथे संपन्न झाली. संकल्पना विश्वास गृपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.
पर्यावरण जागृतीचा, रक्षणाचा अनोखा संदेश देणारी शाडू मूर्ती पासून गणेश मुर्ती कार्यशाळाविद्यार्थ्यांमध्ये नवी जाणीव निर्माण करणारी ठरली.
यात १०० हून अधिक विद्यार्थ्यांना सहभाग घेतला. यात सौ. शिंपी यांनी शाडू मातीचे फायदे विशद केले व विद्यार्थ्यांकडून गणेश मूर्ती बनवून घेतल्या. तसेच ध्वनी व जलप्रदूषण गणेशोत्सवात होत असल्याने ते रोखण्याचे आवाहन केले.
शाळेचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत पाटील यांनी केले. ते म्हणाले की, पर्यावरणाविषयी लोकजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून असे उपक्रम राबवण्याची गरज आहे. त्याच प्रयत्नांचा हा भाग आहे. यावेळी शाळेचे शिक्षक धनंजय शुक्ला, नामदेव बागूल, रोहिदास कोकणी, अंकुश तळपे, निता आमले यांनी मेहनत घेतली. या प्रसंगी दिपांजली महाजन, मुख्याध्यापक व्ही के आहिरे, एस एस आव्हाड, एन सी कारे, मनिषा पगारे, ममता जाधव, ज्ञानेश्वर शिरसाठ उपस्थित होते.







Wednesday 21 August 2019

औरंगाबाद येथे यशवंत शब्दगौरव राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची विभागीय फेरी उत्साहात संपन्न…



चित्रपट समिक्षक अशोक राणे यांची प्रमुख उपस्थिती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

दि. २१; औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची विभागीय फेरी मंगळवार, दि. २० ऑगस्ट २०१९ रोजी एमजीएम वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या चित्रपती व्हि. शांताराम सभागृहात प्रसिद्ध चित्रपट समिक्षक अशोक राणे, डॉ. रेखा शेळके, विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, दिग्दर्शक शिव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्राथमिक फेरीत स. भु. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका विनोद धुमाळ हिने प्रथम पुरस्कार पटकाविला. तिला रुपये पाच हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पुरस्कार माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातील विद्यार्थीनी कल्याणी मधुकर काकडे हिने पटकाविला. तिला रुपये तीन हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तृतीय पारितोषीक मातोश्री डॉ. कंचन महाविद्यालयातील विद्यार्थी हर्षद शेखर औटे यास रुपये दोन हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थीनी पौर्णिमा ईश्वर तोटेवाड व मौलाना आझाद महाविद्यालयातील विद्यार्थी शेख इरफान इक्बाल यांना प्रत्येकी रुपये एक हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर इतर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार, सचिन दाभाडे, दिपक पवार यांनी काम पाहिले. यावेळी प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानचे विभागीय संघटक सुबोध जाधव, मंगेश निरंतर, गणेश घुले, प्रा. आशा देशपांडे, कविता सोनी, विशाखा गारखेडकर, मंगेश मर्ढेकर, विनोद काकडे, महेश हरबक आदींनी परिश्रम घेतले.









Tuesday 20 August 2019

यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा औरंगाबाद केंद्राच्या फेरीला जोरदार सुरुवात.

यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा औरंगाबाद केंद्राच्या फेरीला जोरदार सुरुवात.







Saturday 17 August 2019

विज्ञानगंगाचे एकेचाळीसावे पुष्प ‘आईसलँडमधील बर्फ व ज्वालामुखी’...

click here to watch full video
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत एकेचाळीसावे पुष्प आईसलँडमधील बर्फ व ज्वालामुखी’ वर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते समीर लोंढे यांनी आईसलँडचा इतिहास, त्याची ओळख, ते नेमक कुठे वसलेले आहे, तिथली पर्यटनसंस्कृती, हिमनदी, ज्वालामुखी अशा अनेक गोष्टींची माहिती चित्र आणि विडिओद्वारे दिली. ऑरोरा बोरलिस (नोर्थेन लाईट्स) त्याची निर्मिती कशी होते, हे त्यांनी विडिओद्वारे समजावून सांगितले. तसेच प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.









Friday 16 August 2019

पूरग्रस्तांसाठी मदतकार्य...



दि. १६ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई च्या वतीने सांगली, सातारा येथील पुरग्रस्थांच्या मदती करीता दुसरी गाडी रवाना करण्यात आली. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, प्रतिष्ठानचे सचिव श्री. शरद काळे, विद्याधर खंडे, मुंबई संघटक उमाकांत जगदाळे, सुरेश पाटील, संगीता गवारे, अरविंद, महेश साळवी, सेंट्रल कॅटर्सचे सुधाकर शेट्टी, चेतना मॅनेजमेंट मधील विध्यार्थी, प्राध्यापक डॉ.नेमलेकर, डॉ. सिद्धी सहप्राध्यापक बंधन रुपवते इ. उपस्थित होते.
याप्रसंगी आदरणीय सुप्रियाताईंनी पुरग्रस्थांच्या मदतीकरिता मुंबईकरांच्या वतीने मदत करण्याचे आवाहन केले.





युवा स्वतंत्रता ज्योत रॅली -अंबाजोगाई



युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा जागृत करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र-अंबाजोगाई तर्फे बाजोगाईत युवा स्वतंत्रता ज्योत रॅली काढण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक स्वाती भौर मॕडम यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मागील अनेक वर्षापासून नियमितपणे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या रॅलीचे आयोजन करण्यात येते.
 अंबाजोगाई नगर पालिका कॉम्प्लेक्स मधील विवेक सिंधु कार्यालयासमोरून या रॅलीची सुरूवात झाली. सावरकर चौक - मंडीबाजार - योगेश्वरी देवी मंदीर - शिवाजी चौक - पंचायत समिती - बस स्थानक असे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरून फेरी पूर्ण करण्यात आली. प्रतिष्ठान चे सचिव डॉ. नरेंद्र काळे यांच्या पुढाकाराने  दरवर्षी या रॅलीचे आयोजन करण्यात येते.







युवा स्वातंत्र्यज्योत रॅली - मुंबई


 दि. १४: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र पुरुषांना अभिवादन करण्यासाठी तरुणांमध्ये स्वातंत्र्य दिनाविषयी आदराची जाणीव व जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. युवा स्वातंत्र्यज्योत रॅलीची सुरुवात श्री. सुरज भोईर यांच्या प्रस्ताविकाने झाली. त्यांनी सदर युवा स्वातंत्र्य ज्योत  रॅलीचा उद्देश सहभागींसमोर मांडला. यानंतर प्रमुख पाहुणे मा. डॉ. जी.जी.परीख (ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, व अध्यक्ष - युसूफ मेहेरअली सेंटर) यांनी तसेच गांधी बुक सेंटर चे विश्वस्त आर.के. सोमय्या सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व युवा पिढीच्या भविष्यात काय काय अपेक्षा आहेत आणि त्यांचे दायित्व काय आहे आणि असावे यावर विवेचन केले. यानंतर मा. डॉ. जी.जी. परीख यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली व स्वातंत्र्य दिन चिरायू होवो या घोषणेने रॅलीचे उदघाटन झाले. वंदे मातरम, भारतीय संविधानाचा विजय असो, युवा पिढीका नारा हैं, भारत देश हमारा हैं, स्वातंत्र्यदिन चिरायू होवो अशा घोषणा देत रॅली मार्गस्थ झाली.
पुढे ही अभिवादन रॅली गावदेवी मार्गे ऑगस्ट क्रांती मैदान येथे पोहोचली तेथील गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन व पुष्पांजली अर्पण करून महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदानास उजाळा दिला गेला.
त्यानंतर  श्री.किसनदादा जाधव (माजी नगरसेवक), आणि श्री.अमोल मडामे( संविधान अभ्यासक)  यांनी सहभागींना संबोधित केले. तसेच युवा अध्यक्ष श्री. निलेश भोसले यांनी उवस्थितांशी संवाद साधला. यानंतर श्री. सुरज भोईर यांच्या उत्स्फूर्त गीतांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. तसेच सुरज भोईर आणि श्री.रमेश सांगळे यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे जाहीर वाचन करून शेवटी राष्ट्रगीत गायन केले. श्रीम. मनिषा खिल्लारे यांनी शेवटी पाहुण्यांचे व सहभागींचे आभार मानून  रॅलीची सांगता केली.
सदर युवा स्वातंत्र्यज्योत रॅली आयोजनकरीता श्री.रमेश सांगळे, श्री. सुरज भोईर, श्री. सुरज चव्हाण, श्री. महेश साळवी, श्री.रमेश मोरे आणि श्रीम. मनिषा खिल्लारे यांनी परिश्रम घेतले. तसेच श्वेता, मनाली, स्नेहा, प्राजक्ता आणि टीम, श्रीम. रेश्मा, श्रीम. मंजू, श्री. निलेश भोसले व टीम ह्या सगळ्यांमुळे  रॅली अधिक उत्साहात संपन्न झाली.
सर्वांचे मनःपूर्वक आभार....