Wednesday 28 February 2018

संगीत संध्या ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ला चांगला प्रतिसाद

औरंगाबाद : “अक्षरांच्या साह्यांनी, काना मात्रा वेलाट्यांनी मर्‍हाटीचा टिळा मी लाविला, जिवापाड जपू माय मराठीला” या कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या लावणीला तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.

मराठी भाषा दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व नाथरंग प्रस्तुत एमजीएमच्या आईनस्टाईन सभागृहात ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ हा काव्य सांगितिक कार्यक्रम नूकताच संपन्न झाला. मराठी भाषेचा आजपर्यंतचा प्रवास, गीत, भजन, लावणी, पोवाडा अशा विविधांगाने उलगडण्यात आला. ‘मधुर भाषिनी अमृतवाणी वंदन करिते तुला...’ असे वंदन गीत सौख्यदा देशपांडे यांनी सादर करून काव्य सांगीतिक कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रिया धारूरकर यांनी कुसुमाग्रज यांची ‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा’ हे काव्य सादर केले. आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून ते आजमितीपर्यंतचे काही निवडक काव्य, गीत वाचून दाखवीत त्यांनी या मैफलीत रंगत आणली. यावेळी कुसुमाग्रज, सुरेश भट, माधव ज्युलियन, ना. गो. नांदापूरकर अशा साहित्यिक, कवींच्या कविता, गीत संगीताच्या तालावर सुरेखपणे मांडल्या. बहिणाबाईंच्या ओवीही सर्वांना आनंदित करून गेल्या. ‘अवनीत हिंदवी राष्ट्रां, त्याचे उत्कृष्ट, महावैशिष्ट्य... नांदवी तीच माय मराठी’ हा शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांचा पोवाडा अजिंक्य लिंगायत यांनी सादर करीत सर्वांची दाद मिळविली.

अखेरीस मेणबत्तीच्या उजाळ्यात ‘मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे’ ही प्रतिज्ञा सर्वांनी म्हटली. प्राचार्या रेखा शेळके अध्यक्षस्थानी होत्या. प्रारंभी श्रीकांत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, काव्य रसिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tuesday 27 February 2018

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता विषयावर राज्यस्तरीय बैठक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विकास अध्ययन केंद्र, कोरो मुंबई आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर मंगळवारी १३ मार्च २०१८ रोजी सकाळी ९.३० ते ५ पर्यंत चव्हाण सेंटर मध्ये राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण असावे, यासाठी आयोजीत राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये आतापर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या सहभागाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! या कामाला पुढे घेऊन मंगळवारी १३ मार्च २०१८ रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आपण सहभागी होऊन एकल महिलांसाठी स्वतंत्र्य धोरणाची आवश्यकता या विषयावरील आपले विचार, मतं, संशोधनात्मक लेख व सूचना मांडाव्यात. एकदिवसीय विचार मंथनाच्या प्रक्रियेतून समोर आलेल्या मुद्द्यांवर आपण एकत्र मिळून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाचा तयार झालेला प्राथमिक मसुदा शासनाला सादर करता येईल, असे आम्हास वाटते. सोबत विषयाची सुची जोडली आहे.
विषय - भटके विमुक्त महिला, एकल महिला आणि सुरक्षा, एकल महिला आणि संपत्तीचा अधिकार (सासर आणि माहेर), एकल महिला आणि आरोग्य, एकल महिला आणि मुलांचे संगोपन, एकल महिला आणि उपजीविकेचा हक्क, एकल महिला शासकीय योजनेतील अडथळे, एकल महिला आणि वृध्दापकाळातील समस्या, एकल महिला आणि घरचा हक्क, अल्पसंख्याक समाजातील एकल महिलांचे प्रश्न दलित, मुस्लिम, आदिवासी, तभटके विमुक्त महिला, तृतीयपंथी एकल महिला, अविवाहित एकल महिलांच्या समस्या, एचआयव्हीग्रस्त महिलांच्या समस्या, शेतक-यांच्या विधवा महिला, सैनिकांच्या विधवा महिला, घटस्फोटीत महिला, परितक्त्या महिला, एकल महिला आणि निवा-याचा हक्क, तीन वर्षापेक्षा अधिक काळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नीच्या समस्या, शरीर विक्रय व्यवसायातील एकल महिला समस्या, देवदासी किंवा अन्य धार्मिंक रूढीतील एकल महिला, दिव्यांग एकल महिला, हिसेंच्या बळी एकल महिला, नैसर्गिक आप्तीच्या बळी एकल महिला आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या एकल महिला.
तरी आपणास नम्र विनंती कि, आपण आपले मत, विचार, सूचना, अनुभव, एकल महिलांचे आपल्या भागातील प्रश्न, समस्या, अडचणी व संशोधनात्मक लेख इत्यादी दिनांक १० मार्च २०१८ पर्यंत singlewomenpolicy@gmail.com आणि rkpatil@gmail.com या जीमेल आयडीवरती पाठवावेत.

Thursday 22 February 2018

'ओर्चीड इरा' या नियतकालिकास द्वितीय पारितोषिक

सोलापूर येथील नागेश कराजगी ओर्चीड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांच्या 'ओर्चीड इरा' या नियातकालिकास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नियतकालिक स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. याचा पुरस्कार वितरण समारंभ आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी ज्येष्ठ संपादक पद्मभूषण देशपांडे, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, प्राचार्य डॉ.जे.बी.डाफेदार, सोलापूर केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, सदस्य दत्ता गायकवाड, विजय कान्हेकर, नीलेश राऊत, श्रीकांत देशपांडे, सुहास काळे, प्रा. बी. आर. बिराजदार, प्रा. शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.


याप्रसंगी या नियतकालिकात ज्या विद्यार्थ्यांनी लेख लिहिले त्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Tuesday 20 February 2018

राधाबाई काळे महिला महाविद्यालयाला नियतकालिक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक

अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाने राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.आज या महाविद्यालयात या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.रयत शिक्षण संस्थेचे हे महाविद्यालय आहे.

ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे व प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी उपस्थित विद्यार्थिनींसोबत संवाद साधला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. दीनानाथ पाटील, विजय कान्हेकर, ज्येष्ठ पत्रकार महेश कुलकर्णी, कवी संजीव तनपुरे, अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, राहुल राजळे, अंकाचे संपादक डॉ.संजय नगरकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Monday 19 February 2018

नाशिक येथील 'बांधिलकी' नियतकालिकास प्रथम पारितोषिक प्रदान

नाशिक : यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय नियतकालिक स्पर्धेचा प्रथम पारितोषिक वितरण कार्यक्रम ता. देवळा, जि.नाशिक येथील कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयात आज संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. पद्मभूषण देशपांडे, कार्यक्रम संयोजक मा.दत्ता बाळसराफ, मा. विजय कान्हेकर, मा. नीलेश राऊत, प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर, संस्थेचे सचिव गंगाधरमामा शिरसाठ, आणि प्रा.एकनाथ पगार मान्यवर उपस्थित होते.
या महाविद्यालयाचे 'बांधिलकी' नावाचे नियतकालिक दैनंदिनी विशेषांकावर आधारित आहे. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 16 February 2018

यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये योगा क्लासेस


नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रत्येकजण काहीतरी नवीन संकल्प करत असतो. त्याच अनुशंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने संकल्पकर्त्यांसाठी योगा क्लासेस सुरू करण्यात आले आहे. सध्या योगा क्लासेस प्रतिष्ठानमध्ये बुधवार आणि शुक्रवार सकाळी ७ ते ८ या वेळेत नियमित सुरू आहेत. दुसरी बॅच लवकरचं सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी ybcyoga@gmail.com या जीमेल आयडीवर किंवा ८८७९७८४८४७ मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा. सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थीला पार्किंगची व्यवस्था प्रतिष्ठानतर्फे उपलब्धतेनूसार देण्यात येईल. प्रशिक्षणार्थीकडून २२०० रूपये आणि जीएसटी असं शुल्क आकारलं जाईल. 

Thursday 15 February 2018

मराठी भाषा दिनानिमित्त "ऐसी अक्षरे रसिके मेळवीन"...

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्याचा मानदंड कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिवस व मराठी भाषा दिनानिमित्त नाथरंग प्रस्तुत काव्य सांगितिक कार्यक्रम "ऐसी अक्षरे रसिके मेळवीन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे होईल. सादरकर्त्या व लेखन - प्रिया धारूरकर, सादरकर्त्या व दिग्दर्शन - सौख्यदा देशपांडे, संगीत संयोजन : अजिंक्य लिंगायत, अथर्व बुद्रुककर...

नियतकालिक स्पर्धा २०१७ पारितोषिक वितरण सोहळा

यशवंतराव  चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे नियतकालिक स्पर्धा २०१७ पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर येथे २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०१८ दरम्यान केले आहे.
पहिला कार्यक्रम २० फेब्रुवारीला कर्मवीर रामरावजी आहेर कला व वाणिज्य महाविद्यालय, देवळा, नाशिक येथे होईल. त्यानंतर दुसरा कार्यक्रम दुपारी १२ वाजता नूतन विद्या प्रसारक मंडळाचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव, नाशिक येथे होईल. तिसरा कार्यक्रम २१ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमहनगर येथे होईल. तर चौथा कार्यक्रम २२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता नागेश कराजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी, सोलापूर येथे होईल. 

Sunday 11 February 2018

दुसरे जिल्हास्तरीय बालकुमार साहित्य संमेलनास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद



अंबाजोगाई : बालसाहित्य लिहिण्यासाठी साहित्यीकांनी पुढाकार घ्यायला हवा कारण साहित्यातून कल्पना शक्ती विकसित होते आजची मुले स्मार्ट आहेत. तेंव्हा ’शामची आई’ या कथेची नव्या स्वरूपाने मांडणी करणे गरजेची आहे. अशा संमेलनातून सृजनशीलतेला वाव मिळतो. विज्ञानवादी साहित्य निर्मिती करणे काळाची गरज असून विज्ञान डोळसपणा शिकविते तर कला जीवन सौंदर्य खुलवते असे प्रतिपादन उद्घाटक दिपाताई देशमुख यांनी केले. तर यावेळी  मोबाईलकडे जादूचा दिवा म्हणून बघा.कारण, मोबाईलमध्ये विश्‍व सामावले आहे. साहित्य जगण्याच भान देतं. जगण समृद्ध करत हे सांगुन बालकांनी साहित्य वाचल पाहिजे, जे वाटेल ते लिहिलं पाहिजे असे विचार संमेलनाध्यक्ष बालाजी मदन इंगळे यांनी मांडले. तर यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना डॉ.द्वारकादास लोहिया यांनी साने गुरूजी यांची आठवण करताना मुलांमध्ये देव बघणे हा नवा दृष्टीकोण असल्याचे सांगुन या संमेलनात हस्त लिखीत, टाकावूतून टिकावू वस्तूंची निर्मिती व त्याचे प्रदर्शन भरविल्याबद्दल संमेलन आयोजकांचे अभिनंदन केले.
  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई केंद्र अंबाजोगाई व मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने २ रे जिल्हास्तरीय बाल कुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
    यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून डॉ.द्वारकादास लोहिया,उद्घाटन म्हणून दिपाताई देशमुख  व संमेलन अध्यक्ष म्हणून बालाजी मदन इंगळे, संमेलन कार्यवाह अभिजीत जोंधळे,डॉ.दीपाताई क्षीरसागर,माजी आ. उषाताई दराडे,मानवलोकचे अध्यक्ष अशोकराव देशमुख,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंबाजोगाईचे सचिव डॉ.नरेंद्र काळे, मनस्विनी प्रकल्पच्या प्रा.अरुंधती पाटील,वेणूताई चव्हाण कन्या शाळेच्या मुख्याध्यापक प्रतिभाताई देशमुख, बालसाहित्यीक नागनाथ बडे आदींची विचार पिठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गोदावरी कुकुंलोळ कन्या शाळेतील मुलींच्या संचाने स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत स्मृती चिन्ह, फेटा, शाल व मुलांनी तयार केलेल्या गुच्छांनी करण्यात आले.
    प्रास्ताविक करताना संमेलन कार्यवाह अभिजीत जोंधळेयांनी ग्रंथ दिंडीत शहरातील १२ शाळा मधील सुमारे दिड हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगुन या समेलनाच्या यशस्वीतेसाठी मानवलोक, मनस्विनी महिला प्रकल्प व वेणुताई कन्या माध्यमिक विद्यालय तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई केंद्र अंबाजोगाई  यांचे सहकार्य लाभले अंबाजोगाईत वर्षभर विविध व्याख्यानमाला होतात बालझुंबड सारखा उपक्रम ही घेतला जातो. कुमारवयीन मुलांसाठी असे संमेलन असावे या कल्पनेतून मुलांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच समतोल विकास झाला पाहिजे. कुमारवयीन मुलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यातील सृजनशीलता वाढीस लागावी म्हणून हा उपक्रम संमेलन रूपाने होत असल्याचे जोंधळे म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्याचा स्नेह पेरणार्‍या हस्तलिखीतांचे प्रकाशन व आदीत्य सतिष आगळे या इयत्ता ८ वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या ’अक्षराचं लेण’ या हस्तलिखीत कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
    या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना दिपाताई देशमुख यांनी आपले मौलिक विचार मांडून मातृभाषेतून विद्यार्थ्यांची जडण-घडण होते. अशा संमेलनातून सृजनशीलतेला वाव मिळतो. कल्पना शक्ती विकसित होते. हे सांगुन त्यांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. तर संमेलन अध्यक्ष बालाजी मदन इंगळे यांनी आपल्या विविध कवितांचे सादरीकरण केले. उपस्थित विद्यार्थीनींनी त्यांना भरभरून दाद दिली. कवितेच्या वळीवर सभागृहाने ठेका धरला. तर ’मेल नाही आजूण आभाळ’ ही कविता सादर करून शेतकरी आत्महत्येचा संदर्भ देवून बालाजी इंगळे यांनी सभागृहाला आंतःर्मुख केले. उद्घाटक डॉ.द्वारकादास लोहिया यांनी बालसाहित्यातून कसदार निर्मिती व्हावी व जबाबदार समाज घडावा यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी आ. उषाताई दराडे यांनी मानवता हाच धर्म असल्याचे सांगुन आपल्या मनातले बोलता आले पाहिजे. असे त्या म्हणाल्या. लोकनेते यशवंतरावजी चव्हाण,खासदार शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करीत यांच्यासारखे समाजभान असलेले नेतृत्व महाराष्ट्राला सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.तर दिपाताई क्षीरसागर यांनी लहान मुलांचे भाव विश्व जाणून घेवून साहित्यी निर्मिती झाली पाहिजे. हे सांगत मुलांचा बुद्धांक वाढला पण भावनांक कमी झाला आहे. विज्ञान विषयक साहित्य निर्मिती झाली पाहिजे. असे मौलीक विचार त्यांनी मांडले. उपस्थितांचे आभार मानताना डॉ.नरेंद्र कांळे यांनी  संमेलनाच्या आयोजनाची रूपरेषा मांडली. या संमेलनातून बाल साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळेल असे महत्वपुर्ण विचार डॉ.नरेंद्र काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी सभागृहात अमर हबीब,बालाजी सुतार,डॉ.श्रीहरी नागरगोजे, संतराम कराड,प्रा.वैशाली गोस्वामी,श्रीकांत देशपांडे,सखा गायकवाड,प्रा.विष्णु कावळे,मुजीब काझी, प्रा.अनंत मरकाळे, डॉ.राहुल धाकडे,प्रविण ठोंबरे,अॅड.जयसिंग चव्हाण,परिवर्तन साहित्य चळवळीचे अध्यक्ष प्रा.गौतम गायकवाड,  विद्याधर पांडे,डॉ.मुकुंद राजपंखे,डॉ.देवराज चामनर,अनंतराव चाटे, भारत सालपे,विवेक गंगणे, पत्रकार रणजित डांगे,विजय हामिने, रोहिदास हातागळे, मुशीरबाबा,विकास गरड, नंदकुमार पांचाळ, उत्तम शिनगारे,दत्ता वालेकर,वैजनाथ शेंगुळे,दत्ता देवकते आदींची यावेळी उपस्थिती होती.हे बाल कुमार साहित्य संमेलन अंबाजोगाई बसस्थानकासमोर वेणूताई चव्हाण कन्या माध्यमिक शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनात शालेय विद्यार्थ्यांचे कवी संमेलन,कथाकथन, ग्रंथदिंडी,हस्तलिखित स्पर्धा,पुष्पगुच्छ बनवणे स्पर्धा,शब्द कोडी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागत समिती सदस्य प्रा.अरुंधती पाटील, गणपत व्यास,सुवर्णा लोमटे मॅडम,डॉ नरेंद्र काळे,नामदेव गुंडाळे, भागवत मसने,ज्योती भोसले,बन्सी पवार आश्विनी कुमार मुकदम, उषा रामधामी,प्रभावती अवचार व गणेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे.

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. ही चर्चा प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, सलमा गुरू, गौरी सावंत, अभिना आहेर, जैनब पटेल, राजेंद्र कांविनडे आणि फिरोज अश्रफ इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका कड यांनी केले तर तृतीयपंथी आणि त्यांच्यासमस्या याविषयी अभिना आहेर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तृतीयपंथी यांनी सांगितलेल्या कौटुंबिक , शैक्षणिक आणि आर्थिक समस्यांना सुप्रिया सुळे यांनी योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रिया पाटील आणि माधुरी सरोदे यांनी केले.

Wednesday 7 February 2018

औरंगाबाद विभागातर्फे शनिवारी 'समर' चित्रपट

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, औरंगाबाद आणि एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी कार्यक्रमांतर्गत १९९९ ला प्रदर्शित झालेला 'समर' चित्रपट शनिवारी १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता आईनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखवण्यात येणार आहे.
समर चित्रपटाला  नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला आहे. तर श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका किशोर कदम, राजेश्वरी सचदेव, रजीत कपूर, रवी झंकाल आणि सीमा बिस्वास...

Sunday 4 February 2018

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त भुजंगराव कुलकर्णींची शंभरी पुर्ण...














यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१७' थोर प्रशासकीय सेवक भुजंगराव कुलकर्णी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दोन महिन्यापूर्वी प्रदान करण्यात आला होता. आज  भुजंगराव कुलकर्णी हे शंभर वर्ष पुर्ण करीत आहेत. त्यांना दीर्घायुरोग्य लाभो, त्यांची प्रदीर्घ वाटचाल समाजाला यापुढेही मार्गदर्शन करीत राहिल.
 विविध शिफारसींचा विचार करुन पारितोषिक निवड समितीने ज्येष्ठ, कार्यक्षम, चारित्र्यसंपन्न व यशस्वी सनदी अधिकारी ( भारतीय प्रशासन सेवा) मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांची या वर्षीच्या पारितोषिकासाठी निवड केलेली होती. मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांनी त्यांच्या सेवा काळात भूमी सुधारणा (कूळ कायदा) ची जनगणना, पुणे महानगरपालिका, नागरी विकास व आरोग्य, जलसंपदा, न्हावाशेवा बंदराची संरचना, मराठवाडा विकास योजना, मराठवाडा वैधानिक मंडळ, मागासलेल्या भागाचे सबलीकरण यांसारख्या अनेक शासकीय कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.
या क्षेत्रांतील त्यांचे असाधारण कर्तृत्व लक्षात घेऊन हे पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी चव्हाण सेंटर मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.

Saturday 3 February 2018

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता एक दिवसीय कार्यशाळा....

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. ही चर्चा प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात शनिवारी १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत होईल.
विशेष म्हणजे या परिसंवादात प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. सुप्रिया सुळे यांच्यासह विषयांवर काम करणारे अभ्यासक, तसेच शासकीय प्रतिनिधी इत्यादी मान्यवर परिसंवादाला उपस्थित राहणार आहेत.
१३ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ह्या परिसंवादामध्ये तृतीयपंथी महिला आणि त्यांच्या समस्या याविषयी चर्चा करण्यात आली होती. या सर्व चर्चेमधून एक समान सूर समोर आला तो म्हणजे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आखणी करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सदर विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून नोंदणी आवश्यक आहे. संपर्क- मनिषा खिल्लारे ७०२०२९९६७७

Friday 2 February 2018

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘रिमेम्बर’



नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ३ फेब्रंवारी २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध कॅनेडियन दिग्दर्शक अ‍ॅटम एगोयान यांचा ‘रिमेम्बर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
कॅनेडियन दिग्दर्शक अ‍ॅटम एगोयान यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ मध्ये जीवनगौरव हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्शीयन आर्मेनियन वंशाचे एगोयान कॅनेडातील तसेच जागतिक पटलावरचे महत्त्वाचे दिग्दर्शक मानले जातात.
‘‘रिमेम्बर’’ २०१५ मध्ये जर्मनी येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९४ मिनीटांचा आहे.
नाझींच्या अत्याचाराच्या दरम्यान घडलेल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आयुष्यात खूप काही गमावल्यानंतर जगून करायचे काय? या जाणीवेपर्यंत हे कुटुंब येते आणि त्यातून हे नाट्य घडते. गत आयुष्यातील घटनांची, आठवणींची मालिका येथे समोर येते आणि दाहक वास्तवाची प्रचिती देते.
‘रिमेम्बर’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.