Saturday 28 April 2018

माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नाकडे लक्ष द्यावे - पद्मभूषण देशपांडे

सोलापूर - सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात 'समाजाचे प्रश्न आणि प्रसार माध्यमे' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, दत्ता गायकवाड, संचालक डॉ. इ. एन. अशोककुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आजचे युग हे वेगवान युग आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये. बदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली आहे. यापुढच्या काळात टेलिव्हिजनचे युग संपून मोबाईलचे युग व्यापक होईल, त्यादृष्टीने भावी पत्रकारांनी तंत्रज्ञान कौशल्य मिळवायला हवे असे ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी सांगितले.

 एकेकाळी संगणक लोकांना बेरोजगार करील या भीतीतून समाजाच्या उव्‍च स्तरातून नवतंत्रज्ञानाला विरोध झाला. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले व संगणकाचा देशात प्रसार होण्यास उशीर झाला. यापुढे नवतंज्ञानाला विरोध केला जाऊ नये. सजगपणे नवतंत्रज्ञान स्वीकारावे. कालबाहय झालेले अभ्यासक्रम, पध्दती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी दत्ता बाळसराफ यांनी सांगितले.

जुने ते सर्व वाईट असे मानणे चूक ठरेल. तत्वज्ञानासारख्या अनेक महत्वाच्या विषयांची आजही तेवढीच गरज्‍ आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोककुमार म्हणाले की, माध्यमे बदलत असताना , त्यांनी जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेपासून दूर जाता कामा नये असे मत दत्ता गायकवाड यांनी मांडले.

कार्यकमाचे सूत्रसंचालन जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले. सदर कार्यक्रमास नवं महाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक निलेश राऊत, यशवंतराव चव्हान प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, विजय काणेकर, डॉ. माया पाटील, प्रा अंबादास भासके, प्रा मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे आणि विद्यार्थी इत्यादींची उपस्थिती होती. 

तृतीयपंथीयांच्या जाणीव जागृतीचा कार्यक्रम कुलाबा पोलिस ठाण्यात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्रातर्फे तृतीयपंथी आणि त्यांचे हक्क याबाबत जाणीव जागृती प्रशिक्षण शिबीरं आणि विविध शासकीय यंत्रणांसोबत ४ मे २०१८ रोजी सकाळी ९ वाजता कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये कार्यक्रम आयोजीत केला आहे. पहिला टप्पा म्हणजे शालेय शिक्षकांसोबत आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक शिक्षकांना तृतीयपंथी आणि त्यांचे हक्क जाणीव जागृती शिबिर मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या प्रशिक्षणातून अनेक लोकांना तृतीयपंथीयांबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. विविध संस्था, संघटने मध्ये सुध्दा हे प्रशिक्षण दिले आहे. यासोबतच ही कार्यशाळा पोलिस प्रशासनासमोर होणार आहे.

Tuesday 24 April 2018

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे बालनाट्य शिबिराचा शुभारंभ नाट्य शिबिरातून जगाकडे बघण्याची जाणीव निर्माण होते


नाशिक : नाटक ही कला रोजच्या घडणार्‍या प्रसंगातून निर्माण होणारी कला असून आजुबाजूच्या घटनांचे पडसाद त्यात कलावंत अभिनयातून मांडत असतो. नाट्यशिबिरे ही समाजाकडे डोळस दृष्टीने बघण्याची जाणीव करुन देतात. त्यातून मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो. नाट्यशिबीरे ही जीवन समजून घेण्याची उपयुक्त कला आहे. त्याचबरोबर आनंद देणारी कला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाट्यलेखक राजा ठाकूर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालनाट्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आलेले असून शिबिराच्या शुभारंभप्रसंगी राजा ठाकूर हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, नाटक ही मेहनत व कष्टातून शिकण्याची कला आहे. साध्या प्रसंगातून मोठा विचार त्यातून व्यक्त होतो. समाज परिवर्तनाचे ते प्रभावी माध्यम आहे. मराठी रंगभूमी ही समृद्ध असून अनेक महान कलावंतांनी योगदान दिलेले आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. या शिबिराची संकल्पना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर यांची आहे.
स्वागत व प्रास्ताविक करतांना श्री. विनायक रानडे म्हणाले की, आजच्या व्हॉटसअ‍ॅपच्या व चॅनलच्या जमान्यात मुलांना खरा आनंद अशा शिबिरातून मिळतो म्हणूनच बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर शिबीर 8 वर्षापुढील मुला-मुलींसाठी असून रविवार 22 ते शनिवार 28 एप्रिल 2018 या कालावधीत सायं. 4 ते 7 या वेळेत क्लब हाऊस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे सुरु आहे.

Sunday 22 April 2018

कोचिंग क्लासेस मुलांच्या सृजनशीलतेला मारक...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या वेळच्या शिक्षणकट्टयात "खाजगी कोचिंग क्लासेस" या विषयावर चर्चा झाली. न्यायालयाकडून खाजगी कोचिंग क्लासेस वरती नियंत्रण ठेवण्याचे निर्देश शासनास दिल्याने शासनातर्फे विधेयकाचा कच्चा मसुदा तयार झाला आहे. त्यावर शिक्षणकट्टयात चर्चा करण्यात आली.

ही चर्चा का ठेवण्यात आली ..? या विषयीची भूमिका श्रीमती बसंती रॉय यांनी उपस्थितांना सांगितली. कोचिंग क्लासेस ही आजच्या समाजाची भावनिक गरज बनली आहे. यास पालक , शिक्षक आणि आजची परीक्षा पद्धती कारणीभूत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होतो. म्हणून हे धोरण ठरविताना विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवावा. त्याचा विकास शाळा आणि क्लास दोघांच्याही समन्वयाने करावा. या विधेयकातून लहान आणि मराठी माध्यमाचे क्लासेस वगळण्यात यावेत. अशीही धारणा काही सदस्यांनी शिक्षणकट्टयात व्यक्त केली.

खाजगी क्लासेस मुलांना परीक्षार्थी बनवतात तोच तो अभ्यासक्रम पुन्हा पुन्हा करून घेतात याने मुलांची सृजनशीलता मरून जाते याकडे शिक्षण विकास मंचचे संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे यानी लक्ष वेधले. या कार्यक्रमास मोठया प्रमाणात शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक,पालक, पत्रकार याची उपस्थिती होती. शेवटी उपस्थितीचे आभार समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी मानले.

Wednesday 18 April 2018

१० वी, १२ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमीनार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी विभागातर्फे १० वी आणि १२ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चव्हाण सेंटरमध्ये मोफत करिअर मार्गदर्शन सेमीनारचे आयोजन करण्यात आले आहे. सेमीनार १२ मे २०१८ रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होईल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईतर्फे देवराष्ट्रे येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईतर्फे देवराष्ट्रे, जि. सांगली येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर २५, २६ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत होईल. दोन दिवसीय कार्यशाळेसाठी तब्बल १५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कार्यशाळेत स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जीवन प्रवास, व्यवसाय मार्गदर्शन, स्टडी गाईडंस (अभ्यास कसा करावा), वयात येतांना, पालकांसाठी जनजागृती सत्र, गीत कलापथक निर्मिती आणि अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर वक्ते मार्गदर्शन करणार आहे

चव्हाण सेंटर मध्ये सुट्टीच्या काळात कंम्प्यूटर कोर्सेस

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी खास कंम्प्यूटर कोर्सेसचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुला असून प्रथम येणा-या विद्यार्थ्यांस प्राधान्य दिले जाईल. basic computing Course, Multimedia & Animation Course, kLiC Certificate Course, kids Course इत्यादी कोर्सेस शिकवले जातील. अधिक माहितीसाठी - अकादमी इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, 9769256343, 22817975, 22043617

Wednesday 11 April 2018

शिक्षण कट्ट्यावर ‘खाजगी कोचिंग क्लासेस’ विषयावर चर्चा

शिक्षणप्रेमींनी शिक्षणासाठी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच ‘शिक्षण कट्टा’. शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांनासोबत घेऊन हा शिक्षणकट्टा गेली सहा वर्ष सुरु आहे. यावेळी हा कट्टा शनिवार दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजी दुपारी २ वाजता, बोर्ड रूम, पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी शिक्षण कट्ट्यावर ‘खाजगी कोचिंग क्लासेस’ या विषयावर चर्चा होणार आहे. खाजगी कोचिंग क्लासेस, टेस्ट सिरीज, गृह शिकवणी, ऑनलाईन क्लासेस यासारख्या इतर समांतर शिक्षण व्यवस्था आज अस्तित्वात आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून खाजगी शिकवणी वर्ग अधिनियम तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. या सर्व मुद्यांवर सदर कट्ट्यावर चर्चा होईल.शिक्षण विकास मंचचे संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे आणि बसंती रॉय यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यात सहभागी होऊन आपले विचार मांडावेत ही विनंती. संपर्क – माधव सूर्यवंशी ९९६७५४६४९८

'पुनरवलोकन' नृत्य चित्रपट महोत्सव

औरंगाबाद : महागामी तर्फे 'पुनरवलोकन' नृत्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन रूक्मिणी सभागृह, एमजीएम, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. चित्रपट महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या सह-आयोजनातून होणार असून महोत्सवाचे उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक, पद्म भूषण अटूर गोपालकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. 

२८, २९ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणा-या महोत्सवात फिल्म स्क्रिनिंग, टॉक्स्, पॅनेल डिस्क, मास्टर क्लास आणि लाईव्ह डान्स परफॉरमॅन्स इत्यादी गोष्टींचा प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे. संपर्क - ९३७२०९३१८९, ८८०६३८९२३४, ९८२२२४४२५०.

Tuesday 10 April 2018

सोलापूर जिल्हातील सहकारी बँकांकरिता एकदिवसीय कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हातील सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापक यांच्या करिता 'एक दिवसीय कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी २१ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत हॉटेल साईप्रसाद कॉन्फरन्स हॉल, रेल्वे लाईन्स, रामलाल चौक, सोलापूर येथे आयोजीत केलेल्या कार्यशाळेत 'सहकारी बँका संबंधीत कामगार कायदे' या विषयावर अॅड. श्री. आर. आर. गाणू हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर प्रश्नोत्तरे व चर्चा, आभार प्रदर्शन आणि स्नेह भोजन असा दिवसभराचा कार्यक्रम होईल.
डॉ. गो. मा. पवार (अध्यक्ष), राजशेखर शिवदारे (कोषाध्यक्ष), राहूल शहा यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्र सोलापूर आणि राजगोपाल झंवर (अध्यक्ष), कल्याणराव काळे (उपाध्यक्ष), आणि प्रकाश सोनटक्के (सी.ई.ओ) सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बॅक्स् असोसिएशन लि. सोलापूर यांनी आपल्या बँकेचे अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. कार्यशाळा शुल्क ५०० रूपये एका व्यक्ती कडून आकारले जाईल. संपर्क ९४२१०६९७०५

Sunday 8 April 2018

'सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा स्वागत व अंमलबजावणी राज्य परिषद' संपन्न

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा स्वागत व अंमलबजावणी राज्य परिषद' यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नूकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रसह इतर राज्यातून अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. नामदार राजराजे नाईक निंबाळकर (म. सभापती, महाराष्ट्र विधान परिषद) प्रमुख वक्त्या मा. आमदार डॉ. निलमताई गो-हे (प्रतोद व प्रमुख, विधान परिषद विशेष हक्क समिती), प्रमुख अतिथी मा. लक्ष्मीकांत देशमुख (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) प्रमुख उपस्थिती मा. खासदार सुप्रिया सुळे (कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई), मा. आमदार जोगेंद्र कवाडे (सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद) मा. अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती) इत्यादी मान्यवरांनी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Friday 6 April 2018

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘इनलँड एम्पायर’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ०७ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध अमेरीकन दिग्दर्शक डेव्हीड लींच यांचा ‘इनलँड एम्पायर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.

‘ए वूमन इन ट्रबल’ ही ‘इनलँड एम्पायर’ या चित्रपटाची टॅगलाईन आहे. हॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातील विखुरलेल्या भयानक घटनांची गुंफण यात आहे. तिच्या भावविश्वाचे आणि समग्र स्त्रीच्या जगण्याचा शोध यात आहे. कॅमेरा व संगीत यांचा विलक्षण वापर चित्रपटाचे वेगळेपण आहे. 
युरोपमध्ये सुरू झालेली नवचित्रपटांची चळवळ यथावकाश अमेरीकेत पोहोचली. डेव्हीड लींच हा तिच्या पहिल्या पिढीचा बिनीचा शिलेदार आहे. डेव्हीड लींच खरंतर प्रथम चित्रकार व नंतर चित्रपट दिग्दर्शक त्याच्या चित्रपटातील विलक्षण चित्र व्यवस्था मानवी शरीराचे एक वेगळेच ‘दर्शन’ गूढ, अतिवास्तव वातावरण निर्मिती, अस्वस्थता आणि मानवी व्यवहारांचा अजब खेळ एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. 
‘इनलँड एम्पायर’ २००६ मध्ये अमेरीका येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १८० मिनीटांचा आहे. 
‘इनलँड एम्पायर’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Wednesday 4 April 2018

'सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा स्वागत व अंमलबजावणी राज्य परिषद'

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा स्वागत व अंमलबजावणी राज्य परिषद' यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये ७ एप्रिल २०१८ रोजी आयोजीत करण्यात आली आहे. 

सकाळी १० वाजता कार्यक्रमाला समूह गीतांच्या सादरीकरणाने सुरूवात होईल. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. नामदार राजराजे नाईक निंबाळकर (म. सभापती, महाराष्ट्र विधान परिषद) उद्घघाटक मा. नामदार देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), प्रमुख वक्त्या मा. आमदार डॉ. निलमताई गो-हे (प्रतोद व प्रमुख, विधान परिषद विशेष हक्क समिती), प्रमुख अतिथी मा. लक्ष्मीकांत देशमुख (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) प्रमुख उपस्थिती मा. खासदार सुप्रिया सुळे (कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान), मा. आमदार जोगेंद्र कवाडे (सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद) मा. अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती) इत्यादी मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत.

तसेच सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा व अंमलबजावणी या विषयावरती अॅड. डी. आर महाजन, अॅड. डॉ. निलेश पावसकर, अॅड. मनिषा महाजन आणि अॅड. रंजना गवांदे इत्यादी वक्ते मार्गदर्शन करतील. 
समारोप समारंभास अध्यक्ष म्हणून मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील (ज्येष्ठ नेते व संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस), प्रमुख अतिथी मा. पृथ्वीराज (माजी मुख्यमंत्री) प्रमुख उपस्थिती मा. नामदार राजकुमार बडोले (मंत्री, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य), मा. आमदार विद्याताई चव्हाण (सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद), मा. आमदार हर्षवर्धन सपकाळ (सदस्य, महाराष्ट्र विधानसभा) प्रमुख वक्ते मा. रजनीश शेठ (म. विशेष प्रधान सचिव, गृह मंत्रालय, महाराष्ट्र) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

अॅड. व्ही. एन. कांबळे, अॅड. मनिषा महाजन, कृष्णा चांदगुडे, माधव बागवे, मिलिंद देशमुख, सुशीला मुंडे आणि प्रशांत पोतदार यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने लोकांनी उपस्थित रहावे अशी विनंती केली आहे.

Monday 2 April 2018

तृतीयपंथींचा कार्यक्रम उत्साहात साजरा.

अनाम प्रेम, शोधना कन्सटन्सी, वॉटरइड इंडिया, अपंग हक्क विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथींसाठी जीवनमान सुधारणा आणि सुलभ स्वच्छता या विषयावरती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला देशभरातून तृतीयपंथी आले होते.
कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कृपाली बिडये यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक समीर घोष यांनी केले. क्लेमेंट चाऊवेट यांनी जीवनमान सुधारणा याबाबत तृतीयपंथी समुदायाला मार्गदर्शन केले.
अभिना अहेर, विद्या राजपूत, सोबिन कुरिआकोसे इत्यादी मान्यवरांनी स्वतंत्र शौचालय याबाबत तृतीयपंथी समुदायाला मार्गदर्शन केले. तसेच विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली.

Sunday 1 April 2018

अशोक शहाणे यांचे 'विद्रोह आख्यान'

संस्कृतमधून अभिव्यक्तीच्या मर्यादा येत असल्यानेच मराठी भाषा जन्मास आली. ज्ञानेश्वरांचे ‘अमृतातेही पैजा जिंके’ हे म्हणणे संस्कृतला उद्देशूनच होते; मात्र त्याबद्दल कुणी अवाक्षरही काढत नाही. त्या काळात संस्कृतमधून व्यक्त होण्याला मर्यादा येत असल्यानेच मराठी भाषा निपजली आणि याचे दाखले चक्रधरांच्या लीळाचरित्रातही आढळतात, असे रोखठोक प्रतिपादन संस्कृतीविषयक ज्येष्ठ भाष्यकार, लघुअनियतकालिकांचे अध्वर्यू अशोक शहाणे यांनी केले. आपल्याकडे भाषा शिकवण्याकडे अनास्था असल्याचे सांगत शहाणे यांनी भाषाशिक्षण गांभीर्याने होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. केवळ मराठी  भाषा शिकवणाऱ्या शाळा स्थापन करायला हव्यात, अशी सूचनाही त्यांनी या वेळी मांडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे आणि ‘साद’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहाणे यांचे ‘आख्यान’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी साहित्य, लघुअनियतकालिके, भाषा, अनुवादप्रक्रिया आदी विषयांवर शहाणे यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला.