Monday 30 September 2019

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान डोंबिवली आयोजित पालक मेळावा


शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, डोंबिवली आयोजित पालक मेळावा        

 विषय :- निवड : शाळेची आणि माध्यमाची
रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०१९
सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:००
स्थळ : गांधीभवन, कोथरूड, पुणे.
पालक मेळाव्यामागील भूमिका
बदलती जीवनशैली, बदलतं जग, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संपर्कात आलेले आपण आणि सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी भाषा म्हणजे इंग्रजी! आपल्या मुलांना चांगली इंग्रजी आलीच पाहिजे अशी सर्वच पालकांची तीव्र इच्छा असते, आणि ती रास्तच आहे. परंतु इंग्रजी माध्यमात शिकल्यानेच इंग्रजी भाषा येते असा गैरसमजही निर्माण झाला आहे. शिक्षक आणि पालक यांनी योग्य पद्धती वापरल्या तर इंग्रजी माध्यमात न शिकताच  जास्त प्रभावीपणे इंग्रजी शिकणे शक्य आहे. त्यासाठी या दोन्ही घटकांचे उद्बोधन होणे आवश्यक आहे. 
ज्या भाषेतून मुलांना सहजतेने अभिव्यक्त होता येते तीच भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून सर्वात चांगली. आपल्या पाल्याला  आजच्या युगात अव्वल स्थानावर ठेवायचे असल्यास घरच्या/परिसर भाषेतून अर्थात मराठी माध्यमातून शिक्षण घेणे आणि त्याचबरोबर उत्तम इंग्रजी शिकवणे हाच पर्याय सर्वोत्तम आहे.
हाच माध्यमनिवडीचा विषय घेऊन आम्ही हा पालक मेळावा आयोजित करत आहोत.
सहभागी होऊ शकणारे पालक
(१) ज्यांनी माध्यमनिवड केली नाही, असे नवपालक
(२) ज्यांची मुले मराठी किंवा इंग्रजी माध्यमात शिकत आहेत, परंतु मनात माध्यम निवडीबद्दल संभ्रम आहे, असे पालक.
(३) इंग्रजी माध्यम निवडले आहे, परंतु त्याबाबत समाधानी नाहीत, असे पालक.
(४)इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे वळण्याची इच्छा असणारे पालक.
(५) मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले इंग्रजी कसे येईल याचे मार्ग जाणून घेण्याची इच्छा असलेले पालक.
शिक्षक
मराठी माध्यमाच्या प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांत शिकवणारे शिक्षक
इतर
या विषयात कार्य करणारे किंवा रस असणारे शिक्षणप्रेमी.
टीप: सेमी-इंग्रजी हे वेगळे माध्यम नाही. ज्या शाळांमध्ये सेमी-इंग्रजी पद्धत सुरू आहे, त्या शाळा मराठी माध्यमाच्याच आहेत.
खालील गुगल लिंक भरून सहभाग नोंदवावा :
लिंक - https://tinyurl.com/yxwv28vh
टीप
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क नाही.
प्रवेशक्षमता मर्यादित असल्यामुळे  दिनांक २ ऑक्टोबर २०१९ पासून गुगल फॉर्ममध्ये नोंदणी केलेल्या व्हाट्सऍप नंबरवर/ईमेल वर निमंत्रणे पाठवण्यात येतील.
निमंत्रित सदस्यांचा एक तात्पुरता व्हाट्सऍप ग्रुप निर्माण करण्यात येईल, त्यात आयोजनाच्या विविध पैलूंबाबत चर्चा केली जाईल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा...

  दि. ३०, नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १ ऑक्टोंबर २०१९ रोजी दुपारी ३ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर, शालीमार, नाशिक येथे ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जयंत जायभावे हे या समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत. तर ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निवडक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान अधिकाधिक आनंददायी करणे व त्यांचा सन्मान करणे, त्यांना मायेचा आधार देणे, समाजातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्या विचारांची जोपासना करणे या जाणिवेतून ज्येष्ठ नागरिकदिन साजरा केला जातो.
सदर कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांचे सहकार्य लाभले आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपथित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे तसेच लोकज्योती ज्येष्ठ नागरीक मंचचे अध्यक्ष सुरेश विसपुते, उपाध्यक्ष भा.रा. सूर्यवंशी, कार्याध्यक्ष डी.एम. कुलकर्णी, सचिव रमेश डहाळे, कोषाध्यक्ष जितेंद्र येवले यांनी केले आहे. 

Sunday 29 September 2019

'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' याविषयावर व्याख्यान...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत 'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते अतुल देऊळगावकर गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

सूर विश्वास मैफीलीत ज्ञानेश्वर कासार यांच्या शब्दसूरांतून निथळली आनंद पर्वणी


नाशिक दि. २८ : शब्द आणि शब्दातील आशय स्वरांतून निथळतांना होणारी रूणझूण रसिकांना आनंद देत होती आणि गाण्यातील गोडवा अनोखी स्वरानुभुती देत होता. शब्दसूरांतून ओठांवर रेंगाळणारी जाणीव रसिकांनी अलगद आणि नकळतपणे जपूनही ठेवली. निमित्त होते सूरविश्वासचे आठवे पुष्प गायक ज्ञानेश्वर कासार यांनी गुंफले. डॉ. आशिष रानडे (हार्मोनियम), रसिक कुलकर्णी (तबला),
श्रीपाद घोलप (तानपुरा), जागृती नागरे (तानपुरा), यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक रानडे व डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
मैफीलीची सुरूवात राग मियांकी तोडीया रागाने केली. शब्द होते अब तो मोरे रामयातून अल्हाददायक वातावरण निर्माण झाले. शब्दांची, लयीची नजाकत यातून समोर आली. त्यानंतर बंदिश सादर केली. मै सन लागी, आर्तता आणि आठवणींचा माहौल याची वीण अलगद उसवली गेली. या बंदिशीनंतर ज्ञानेश्वर कासार यांनी आपली रचना सादर केली. कासे कहु मन की बिचरातून मनाची खोलवर अवस्था व्यक्त झाली. सुरांची ही मैफल राग अहिर भैरव रागापर्यंत येऊन ठेवली. प.अविराज तायडे यांची रचना सादर झाली. शब्द होते आवरे अव शाममैफीलीचा समारोप पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या अभंगांनी केला. अभंग होते सुखाचे जे सुख, चंद्रभागे तटी, पुंडलीका पाठी उभे ठाकेअनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके’.
सदर कार्यक्रम अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास गार्डन शेजारी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.  त्यात संगीत विषयात डॉक्टररेट पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.आशिष रानडे, नृत्य विषयात डॉक्टररेट मिळाल्याबद्दल डॉ. सुमुखी अथनी, नवी दिल्ली येथील स्वर्ण भारत ट्रस्ट तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल नेक्स्ट जनरेशन अवॉर्डमिळाल्याबद्दल विजया लक्ष्मी मणेरीकर यांचा सन्मान अनुक्रमे सी.एल. कुलकर्णी, डॉ. मनोज शिंपी, पं. अविराज तायडे यांच्या शुभहस्ते करण्यता आला. कलाकारांचा सन्मान पं. जयंत नाईक, श्रीराम तत्त्ववादी, एन.सी. देशपांडे, मोहन उपासनी,  माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.




Thursday 26 September 2019

विश्वास ग्रृपतर्फे शनिवारी ज्ञानेश्वर कासार यांच्या गायनाचे आयोजन...


दि. २७ सप्टेंबर, नाशिक : नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वासहा अनोखा उपक्रम विश्वास ग्रृप तर्फे सुरू करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून,विश्वास ग्रृप चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक आहेत व संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
शनिवार दि. २८ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ६.३० वा. नव्या पिढीतील गायक ज्ञानेश्वर कासार यांच्या गायनाचे आठवे पुष्प गुंफले जाणार आहे. डॉ. आशिष रानडे (हार्मोनियम), रसिक कुलकर्णी (तबला) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे करणार आहेत.
अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास गार्डन शेजारी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
वयाच्या पाचव्या वर्षी ग्वालियर घराण्याच्या सौ. स्वाती देशमुख आणि श्री. राजेश पुराणिक यांच्याकडे ज्ञानेश्वर कासार यांचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण झाले. पुढील शिक्षण पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं.श्री. सुरेश वाडकर यांच्याकडे झाले. तिथुनच त्यांच्या सांगितिक प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली. सद्या किराणा घराण्याचे पं. अविराज तायडे यांच्याकडे

Tuesday 24 September 2019

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार २०१९-२०


यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार २०१९-२०
साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम...
 मुंबई : दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार(एक युवक व एक युवती) व यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार(एक युवक व एक युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्‍या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे १९ वे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे
, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्‍या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०१९ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनीशी दिलेल्या फॉर्मवर भरुन सोमवार दि. ३० डिसेंबर २०१९ च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई - २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये (मनिषा)०२२-२२०२८५९८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा सुबोध (९८२३०६७८७९) व रमेश (९००४६५२२६२) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.

राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१९-२०


यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन
नियतकालिक स्पर्धा २०१९-२० साठी अंक पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम


मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१९-२०' चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असंख्य महाविद्यालयीन नियतकालिकांमध्ये पडलेले पहावयास मिळते या नियतकालिकांमध्ये आपले लेख, कविता लिहणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे साहित्यिक घडत असतात. युवांना आपले मत मांडायची संधी देतानाचा त्यांच्यातील कलागुणांना वाव देणाऱ्या नियतकालिकांचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील उत्कृष्ट नियतकालिकांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे.
स्पर्धेत राज्यातील उत्कृष्ट महाविद्यालयीन नियतकालीकांस यशवंतराव चव्हाण पारितोषिकाने सन्मानित केले जाते. प्रथम पारितोषिक रु. १०,०००/- चा धनादेश, द्वितीय पारितोषिक रु. ७,०००/- चा धनादेश, तृतीय पारितोषिक रु. ५,०००/- चा धनादेश, उत्तेजनार्थ (पंधरा पारितोषिके - प्रत्येक विद्यापीठातून एक) रु. ३,०००/- प्रत्येकी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे स्पर्धेचे स्वरुप आहे. सादर केलेल्या नियतकालीकांचे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये जतन करुन ते विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपलब्ध केले जाते.
स्पर्धेकरिता महाविद्यालयांनी आपली नियतकालीकांच्या दोन प्रती सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२० च्या आत प्रति, संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई - २१ या पत्त्यावर पाठवावेत. सदर नियतकालिक हे सन २०१८-१९ चे असावे. लिफाफ्यावर 'यशवतंराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धा' असा उल्लेख करण्यात यावा. अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये (मनीषा) ०२२-२२०२८५९८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा सुबोध ९८२३०६७८७९, रमेश - ९००४६५२२६२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.




ज्येष्ठ नागरिक गौरव संध्या...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक गौरव संध्या या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात डॉ. महेश चौधरी, भानुदास चव्हाण, महेश कोळी, एम. इस्माईल नेरेकर, सुरेंद्र दिघे आणि सुनिता केळकर या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून सुमधूर हिंदी-मराठी गाण्याच्या कार्यक्रमासमवेत सत्कार सोहळा पार पडणार आहे. रविवार २९ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सह्योग मंदिर हॉल, दुसरा मजला ठाणे (पश्चिम) येथे हा सोहळा संपन्न होईल. तरी वरील कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानमार्फत करण्यात आले आहे.   

Thursday 19 September 2019

विज्ञानगंगाचे बेचाळीसावे पुष्प ‘आय.ओ.टी. चे तंत्रज्ञान' संपन्न...

click here to watch full video

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत आय.ओ.टी. चे तंत्रज्ञानया विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते डॉ. रामचंद्र सत्यदेव तिवारी यांनी आय. ओ. टी. तंत्रज्ञान म्हणजे नेमक काय? त्याचा उपयोग कसा केला जातो? एखाद्या वस्तूचा उपयोग करून तिला आय. ओ. टी. तंत्रज्ञान जोडून कसा उपयोग करता येऊ शकतो हे त्यानी समजावून सांगितले. आय. ओ. टी. तंत्रज्ञानामुळे आधुनिकीकरण कस वाढत चालले आहे हे त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगितले. शेवटी प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.









यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘वॉल्टज् विथ बशीर’



चित्रपट चावडी’ 
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शनिवार २१ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इस्राईल दिग्दर्शक अरी फोलमन यांचा वॉल्टज् विथ बशीरहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
चित्रपट चावडीमध्ये चार अ‍ॅनिमेशन व पूर्ण लांबीच्या चित्रपटांचे आयोजन करण्याचे योजले आहे. हा एक स्वतंत्र चित्रपट प्रकार जगभर हाताळला जातो. त्यामानाने भारतात तो तितकासा प्रचलीत नाही.
वॉल्ट्स विथ बशीर हा चित्रपट पहिल्या इस्राईल व लेबॅनॉन युद्धावर जे १९८० च्या दशकात घडले व त्यावर आधारीत आहे. ही दिग्दर्शक अरी फोलमनचीच गोष्ट आहे. अरीने ह्या युद्धात भाग घेतला होता. पण त्याला त्याचे विस्मरण झाले आहे. ह्या विस्मरणातून तो अनेक गोष्टी ज्या भूतकाळात घडल्या त्याचा शोध घेतो आहे. स्वप्न व सत्य यांच्या सीमारेषेवरील त्याचा प्रवास तसेच युद्ध व त्याचे संहारक परीणाम असा हा विस्मयकारक प्रवास अद्भुत असाच आहे. २००८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी ९० मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.


यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत रंगली...

click here, to watch full video


अभिजीत अनिल खोडके प्रथम, तर ऐश्वर्या एस.भद्रे द्वितीय...

मुंबई १८ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे आयोजित 'यशवंत शब्दगौरव' राज्यस्तरीय अंतिम फेरी बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी  यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रियाताई सुळे तसेच सरचिटणीस श्री. शरद काळे यावेळी उपस्थित होते.
यशवंत शब्दगौरव राज्यस्तरीय स्पर्धा ९ विभागामध्ये घेण्यात आली, त्यामध्ये ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक अभिजीत अनिल खोडके (सीपी अॅन्ड बेरार कॉलेज नागपूर ) यांना १५,००० रुपये रोख रक्कम व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर दुसरा क्रमांक ऐश्वर्या एस. भद्रे (मुंबई विद्यापीठ ) १०,००० रुपये रोख रक्कम व मानचिन्ह व तिसरा क्रमांक शुभम सतीश शेंडे (एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर)  ह्यास ७,००० रुपये रोख व मानचिन्हे तसेच उत्तेजनार्थ म्हणून जीवन प्रकाश गावंडे (श्री शिवाजी आर्ट व कॉमर्स, अमरावती), गणेश ज्ञानदेव लोळगे (एएमजीओआय, कोल्हापूर ), श्रुती अशोक बोरस्ते ( एचपीटी कॉलेज, नाशिक), अभिजीत अंबारास जाधव ( एसएमटी, सीएचएम कॉलेज, मुंबई) व तेजस दिनकर पाटील (मॉर्डन कॉलेज, पुणे ) ३००० रोख रुपये व मानचिन्ह देण्यात आले.

Monday 9 September 2019

यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नांदेड यांचा उपक्रम
नांदेड, दि. ९ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक, ग्रामीण विकास यासह अन्य क्षेत्रात भरीव कार्य करणा-या व्यक्ती व संस्था यांना यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्थांनी नामनिर्देशन दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पाठवण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नादेडच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा थोर वैचारिक वारसा पुढे नेला आहे. राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला उच्चस्थान मिळवून दिले. प्रखर स्वातंत्र्य सेनानी दूरदृष्टीचे राजकारणी, मुत्सद्दी सुसंस्कृत लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमाणसात चिरंतन आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे निरंतर सुरु राहावा यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली व विभागनिहाय संपूर्ण महाराष्ट्रभर विभागीय केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. समाजहित डोळ्यासमोर ठेवून राज्यात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नादेडच्या वतीने कृषी, औद्योगिक, समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजित एकात्मता, विज्ञानतंत्रज्ञान, ग्रामीणविकास, मराठी साहित्य संस्कृती, कला क्रिडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती व संस्था यांचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात योणार आहे. १५ हजार रु. रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच २५ नोव्हेंबर २०१९ रोजी नांदेड येथे एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
पुरस्कारासाठी पुढील निकष पूर्ण करणा-या व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. कोणत्याही व्यक्ती व संस्थेचे वैयक्तीक अर्ज विचारात घेतले जाणार नसून त्यासाठी संबंधित जिल्हा किंवा विभागातील विभागातील लोकप्रतिनिधी, नामांकित संस्था, कुलगुरू, साहित्यिक, संमेलन अध्यक्ष यांची शिफारस असणे आवश्यक आहे. व्यक्ती व संस्थेची संपूर्ण माहिती मराठी मध्ये असावी. सोबत दोन फोटो, कार्याची माहिती, संस्थेचा परिचय, कार्याची ठळक वैशिष्ट्ये, संपर्क आदी तपशील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नांदेड येथे दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पाठवावेत अये आवाहन विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.  

Sunday 8 September 2019

झुंडशाहीच्या विचारांचे दडपण आपल्या भाषणात येऊ देऊ नका, मोकळेपणे व्यक्त व्हा : श्रीपाद भालचंद्र जोशी


यशवंत शब्दगौरव नागपूर विभागीय फेरीचा अभिजीत खोडके मानकरी !

नागपूर (दि.८) : सध्या देशात झुंडशाहीच्या विचारांचे प्राबल्य आहे. तुम्ही कसे वागायचे, काय बोलायचे, काय वाचायचे हे ठरवणारे लोक निर्माण झाले आहेत. तुम्ही त्याच्या विरोधात गेलात की तुम्ही देशद्रोही होता. पण तो विचार माणुसकीला धरून नसेल तर त्याचे समर्थन करू नका. आपला विवेकी विचार जिवंत ठेवा आणि तोच तुमच्या शब्दांमधून व्यक्त करा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व युगांतर शिक्षण संस्थेचे तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या नागपूर विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी जोशी बोलत होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी, संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, सचिव विवेक कोबाडे यांचे मार्गदर्शन लाभले, याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळपांडे, सरचिटणीस गणेश गौरखेड़े, प्राचार्य डॉ. दीपक मसराम, डॉ.स्वाती धर्माधिकारी, कार्यक्रम समन्वयक डॉ. अर्शिया सैय्यद, प्रा. दिगंबर टूले, प्रा. सचिन हुँगे, बाबा कोम्बाडे, अभिजित राऊत, निशिकांत काशीकर, जगदीश पंचबुद्धे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ. कल्पना उपाध्याय, डॉ. मंजुषा सावरकर, प्रा. महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले. या स्पर्धेत नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ६० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - अभिजित खोडके, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर, द्वितीय क्रमांक : विनय भीमराव पाटील, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर, तृतीय क्रमांक : श्रावणी प्रकाश चव्हाण, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर, उत्तेजनार्थ क्रमांक : पूनम जगदीश रामटेके, नरेंद्र तिडके महाविद्यालय, रामटेक व विशाखा गणोरकर, एल. ई. डी. महाविद्यालय, नागपूर
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, विभागीय संघटक अभिजीत राऊत, दिनेश मासोदकर, संजय पुसाम, प्रविण राठोड, नीलिमा, निलेश झालटे, राहुल कामळे आदींनी परिश्रम घेतले.