Thursday 28 September 2017

'शिक्षण कट्टा'-'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचण्या'


शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. शिक्षकतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक आणि विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहे. शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षणकट्टा' या उपक्रमांर्तगत नियमितपणे आयोजन केले जाते. 
शनिवारी ७ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी २ वाजता 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचण्या' या विषयावर बोर्ड रूम, पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शिक्षण कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर आजमावण्यासाठी शैक्षणिक वर्षे २०१५ पासून पायाभूत चाचण्या २ री ते ८ वी तील सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्यात आला आहेत. 
या अनुषंगाने पुढील मुद्दयांवर चर्चा होणार आहे. चाचण्यांचा मुख्य उद्देश/ प्रयोजन, या चाचण्यामुळे अंमलबजावणी शालेयस्तरावर कशा प्रकारे सुरू आहे ?,  या चाचण्यामुळे शाळांमध्ये कोणते बदल दिसून येत आहेत ?, या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव आणि हा कार्यक्रम अधिक प्रभावी कशाप्रकारे करता येईल. वरील सर्व मुद्द्यांवर शिक्षण कट्ट्यात चर्चा होईल. 'शिक्षण विकास मंच' चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यात सहभागी होऊन आपले विचार मांडावेत ही विनंती.  

Wednesday 27 September 2017

लघुपट निर्मितीसाठी दृश्यमाध्यमाच्या जाणिवा विकसित होणे गरजेचे



नाशिक : लघुपट निर्मिती करतांना व त्यामध्ये गतीमानता येण्यासाठी रोजच्या जगण्यातील गोष्टीला प्राधान्य देण्याबरोबरच वर्तमानातील सहज साध्या भाषेचा वापर करावा. घडणार्‍या घटनेकडे कृती म्हणून बघावे. तसेच कथेचे बीज हे दर्जेदार आणि अविष्कारासाठी पुरेपूर शक्यता असणारे हवे. दृश्यमाध्यम असले तरी शब्दांचा नेमका वापर करण्याचे कौशल्य दिग्दर्शकाकडे असावे. त्यातून कलात्मक आणि उत्तम  लघुपट समोर येतो. असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट समीक्षक, लेखक, अशोक राणे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, प्रयोग मालाड, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास लॉन्स यांच्या संयक्त विद्यमाने ‘लघुपट निर्मिती कार्यशाळे’चे आयोजन विश्वास क्लब हाऊस येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. राणे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ‘लघुपट निर्मिती करतांना दिग्दर्शकाने आपल्यातील दृश्यमाध्यमाच्या शक्यता तपासाव्यात आणि त्यातून मला काहीतरी आणि नेमके सांगायचे आहे. याची जाणीव अधोरेखित करावी. सिनेमाची एक भाषा असते आणि त्याचा वापर करण्याची शैली विकसित करावी. दृश्यातील व्यक्तीमत्त्वाच्या कंगोर्‍यातून खूप काही व्यक्त होत असते त्याचा पुरेपूर वापर करावा.’
यावेळी श्री. राणे यांनी भारतीय व जागतिक सिनेमाचे वेगळेपण, पटकथा, कॅमेरा आणि कथा मांडण्याची तांत्रिक शैली यांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले.
भारतात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावेत आणि ते फिल्मिन्गो इंटरनॅशनल लघुपट महोत्सवात जगप्रसिद्ध कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या व्यासपीठावरून जगभर जावेत, हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख हेतू होता.
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना दिग्दर्शक शिव कदम म्हणाले की, दिग्दर्शकाने पात्राच्या भूमिकेनुसार कथेची मांडणी करावी. पात्राचा प्रवास का कसा होतो? पात्राच्या भूमिकेनुसार लघुपटातील कथेत जिवंतपणा निर्माण करणे, सरळ-साधी गोष्टी सांगण्याची पद्धत यात वेगळेपण असायला हवे. उत्तम चित्रपट निर्मितीसाठी सर्व कलांचा व्यासंग आणि जाण असणे महत्त्वाचे आहे. संगीत चित्रकला यांची जाण दृश्य माध्यमाला पूरकच आहे असेही श्री. कदम म्हणाले.
प्रास्ताविक व स्वागत करतांना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, नाशिकमधील अनेक कलावंत लघुपट, चित्रपट क्षेत्रात जगभर नाव कमवत आहेत. त्यांना अशा कार्यशाळांमधून मार्गदर्शन, व्यासपीठ मिळण्यास निश्‍चितच मदत होईल. सिनेमा, लघुपटातून अनेक विषय प्रभावीपणे तरूण दिग्दर्शक मांडत आहेत. हे चित्रपटसृष्टीला बळ देणारे आहे.
कार्यशाळेत लघुपट म्हणजे काय? पटकथा लेखन, छायाचित्रण आणि संकलन, लघुपट निर्मितीची इतर अंगे, लघुपट त्यांचे आणि आपले आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत शंभरहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण काळे यांनी केले. 

Sunday 24 September 2017

लघुपट निर्मिती कार्यशाळेला मुंबईतून सुरूवात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान व प्रयोग मालाड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'फिल्मिगो' आंतराराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात मुंबई, बदलापूर, नाशिक, अहमदनगर औरंगाबाद, अंबाजोगाई, पुणे, बारामती आणि सोलापूर या ठिकाणी लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पहिली कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाली.

माणूस विशीमध्ये आला की, त्याला आपल्या भावना, विचार व्यक्त करावेसे वाटतात. हल्लीच्या युगामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यामुळे अगदी कुणीही मोबाईलच्या सहाय्याने शॉर्ट फिल्म बनवू शकतो.  जगामध्ये अनेक देशांमध्ये 'मोबाईल फिल्म फेस्टिवल सुरू होत आहेत.  शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी आपला विचार हा मनामध्ये ठाम असायला हवा, आपल्याला आपले काम दाखवायचे आहे असे मार्गदर्शक अशोक राणे यांनी उपस्थितांना सांगितले.

आपले बजेट किती आहे त्यानुसार आपल्याला शूटींगची ठिकाणे निवडता येतात. त्यामुळे आपल्याला मनातील विचार आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून दाखवता येतात. अगदी दहा पंधरा मिनिटांच्या कालावधीमध्ये लोकांवर प्रभाव पाडणारे हे फार उत्तम माध्यम असल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येते असे महेंद्र तेरेदेसाई म्हणाले.

कार्यक्रमामध्ये विविध शॉर्ट फिल्म दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. अशोक राणे आणि महेंद्र तेरेदेसाई यांनी त्यांच्या आयुष्यातील काही मोजके अनुभव सुध्दा सांगितले. 

Saturday 23 September 2017

७०० कर्णबधिर मुलांना डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप


स्टार्की फाऊंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाउंडेशन, नरोत्तम सक्सेरीया फाउंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, विद्या प्रतिष्ठान बारामती, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ७०० कर्णबधिर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी करून आधुनिक डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २९ सप्टेंबर २०१७ रोजी शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ च्या दरम्यान ग. दि. माडगुळकर सभागृह, विद्या प्रतिष्ठान, एम. आय. डी. सी. बारामती, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्टार्की हिअरींग फाउंडेशन अमेरीका हे आधुनिक डिजीटल श्रवणयंत्र उपलब्ध करून देणार आहेत.

Thursday 21 September 2017

‘चित्रपट चावडी’ तर्फे 'फिल्म उत्सव'..
















नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत रविवारी २४ सप्टेंबर २०१७ रोजी फुड या विषयावर चार आंतरराष्ट्रीय चिटपटांच्या 'फिल्म उत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी बाबेटे फिस्ट, २ वाजून ३० मिनिटांनी स्वीट बीन, सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी ज्युली अँण्ड ज्युली, सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी लंच बॉक्स असे क्रमाणे चित्रपट असतील.  सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.

Friday 15 September 2017

'व्हर्टिकल फार्मिंग'चे धडे


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत एकोणिसावे पुष्प, डॉ. शरद पां. काळे यांनी 'व्हर्टिकल फार्मिंग' या विषयावर उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे 'व्हर्टिकल फार्मिंग' म्हणजे नेमकं कायं ऐकण्यासाठी ब-याचसा नोकरवर्ग कार्यक्रमाला हजरं होता. 
आपल्या दर श्वासाची किंमत एक रुपया आहे! निसर्गाला प्राणवायूचे देयक देण्यासाठी भरपूर झाडे लावायला हवीत. ही झाडे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून निसर्गात भरपूर प्राणवायू सोडतात. आपल्याला मिळणाऱ्या प्राणवायूचे व हवेचे स्मरण ठेवून आपण कोणतेही एक झाड लावून त्याची जोपासना केली तर प्राणवायूचे देयक अदा होईल असं काळे यांनी सांगितलं.
'व्हर्टिकल फार्मिंग' म्हणजे काय ? त्याचे पर्यावरणातील फायदे - तोटे, अर्थिक, कमी जागेत अधिक उत्पन्न या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे काळे सरांनी उपस्थितांना देऊन खूश केले. एका व्यवसायिक तरूणाने स्वत:ची कंपनी बंद करून 'व्हर्टिकल फार्मिंग' चालू केल्याचं उत्तम उदाहरण दिलं. 'व्हर्टिकल फार्मिंग' भारत आणि इतर देशांमधील फरक सुध्दा आराखड्यामधून दाखिवला. 

Friday 8 September 2017

महिला व्यासपीठातर्फे वस्तू व सेवा कर या विषयावर व्याख्यान


यशवंतराव प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे प्रभाकर चुरी यांचे सहकारी गृहनिर्माण संस्थांतील निवडणूक प्रक्रिया व रमेश प्रभू यांचे वस्तू व सेवा कर या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ११ सप्टेंबरला दुपारी २ वाजता या व्याख्यानाला सुरूवात होईल. संपर्क - २२०४५४६०, ८२९१४१६२१६.

Tuesday 5 September 2017

शिक्षिकांचा गौरव


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय ठाणे केंद्रातर्फे नूकताच शिक्षकदिन साजरा करण्यात आला.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणा-या पाच शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. यात छाया घाटगे, वर्षा वैद्य, प्रज्ञा जोशी, गीता बलोदी आणि रूचिका इरकशेट्टी या शिक्षकांचा समावेश होता. या सर्व शिक्षिका दिव्यांग मुलांना धडे देतात.
 हा सत्कार समारंभ नीला सत्यनारायण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नीला सत्यनारायण म्हणाल्या, समाजात दिव्यांग मुलांना शिकवणा-या ज्या संस्था आहेत, त्या सर्व महिला चालवत आहेत. या संस्था चालवणे किती कठीण काम आहे, हे मी स्व:त घेतलेल्या अनुभवावरून सांगू शकते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि शिक्षिकांच्या मुलाखती मोनिका नाले यांनी घेतल्या.

Monday 4 September 2017

राज्यभरात लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान व प्रयोग मालाड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'फिल्मिगो' आंतराराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात मुंबई, बदलापूर, नाशिक, अहमदनगर औरंगाबाद, अंबाजोगाई, पुणे, बारामती आणि सोलापूर या ठिकाणी लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पहिली कार्यशाळा २५ सप्टेंबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होईल. 
भारतात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावेत आणि ते फिल्मिग्नो इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हल द्वारे जगप्रसिध्द 'कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'च्या व्यासपीठावरून जगभर जावेत, हा या कार्यशाळेचा आयोजना मागील प्रमुख हेतू आहे. २०१६ साली या कार्यशाळेच्या आयोजनामधून महाराष्ट्रातील पाच पुरस्कार प्राप्त लघुपट कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये नेण्यात आले.  
लघुपट म्हणजे पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे लघुरूप नव्हे तर ते ही एक स्वतंत्र दालन आहे, हे स्पष्ट करणारी कार्यशाळा आहे. लघुकथा आणि कांदबरी तसेच एकांकिका आणि नाटक यात जसा भेद आहे. आणि म्हणून प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व आहे ते प्रत्यक्ष देशविदेशातील लघुपट दाखवून व व्याख्यानाद्वारे या कार्यशाळेत समजावून सांगितले जाते. प्रसिध्द समीक्षक, लेखक दिग्दर्शक अशोक राणे या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन करतील. तसेच चित्रपटसृष्टीतील मान्यवर, दिग्दर्शक, तंत्रज्ञ या कार्यशाळेत सहभागींसोबत संवाद साधतील. 
 २५ सप्टेंबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, २६ सप्टेंबर बदलापूर, २७ सप्टेंबर नाशिक, २८ सप्टेंबर अहमदनगर, २९ सप्टेंबर औरंगाबाद, ३० अंबाजोगाई, ४ ऑक्टोबर, ५ ऑक्टोबर बारामती आणि ६ ऑक्टोबर सोलापूर या सर्व नियोजीत ठिकाणी सकाळी १० कार्यशाळा सुरू होईल.  

Sunday 3 September 2017

खेळ माध्यमातून मूल्य शिक्षण...


यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान, मुंबई आणि सृजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खेळ माध्यमातून मूल्य शिक्षणाचा अभ्यास कसा करता येतो, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मान्यवरांनी केले. या कार्यशाळेला तब्बल ७० मुलं हजरं होती.

Friday 1 September 2017

चित्रपट चावडीतर्फे चित्रपटप्रेमींसाठी 'द सन्स रूम'



नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘द सन्स रूम’हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांच्या अत्यंत गाजलेला व सोळा आंतरराष्ट्रीय पारीतोषीकांनी गौरवलेला यशस्वी चित्रपट आहे. एक इटलीतील मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब अचानक घडलेल्या अपघाताने कोलमडून पडते. मानसशास्त्रीय सल्लागार असलेल्या कुटुंब प्रमुखावर सावरण्याची जबाबदारी येते. दु:खद आठवणींच्या गर्तेतून बाहेर पडण्याची धडपड करणार्या कुटुंबाची ही प्रेरणादायी कहाणी आहे. २००१ मध्ये इटली येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १०० मिनीटांचा आहे.
‘द सन्स रूम’हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.