Sunday 12 August 2018

संदेश भंडारे यांच्या 'देवळी' छायाचित्र प्रदर्शन उत्साहात सुरू

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र,औरंगाबाद व एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयातर्फे आयोजित प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या 'देवळी कोनाडा' या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज एमजीएम च्या कलादीर्घा आर्ट गॅलरीमध्ये विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, याप्रसंगी संदेश भंडारे,प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी याप्रसंगी संवाद साधतांना म्हटले की,आधुनिकीकरणात आपण बऱ्याच गोष्टींना मुकत चाललो आहे. देवळी व कोनाडा ही घराचा अविभाज्य भाग असलेली गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे, हे फक्त छायाचित्र प्रदर्शन नाही तर एका समृद्ध परंपरेचा दस्तावेज आहे. त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणीही यावेळी सांगितल्या, प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी देवळी कोनाडा प्रदर्शन पाहताना आपल्या बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या,बालपणीच्या आठवणी या देवळी कोनाडा हे आपल्या प्रिय व्यक्तिशी जोडल्या गेल्या आहेत, असे प्रतिपादन केले. छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी याप्रसंगी हे छायाचित्र काढण्यामागील आपली भूमिका विस्तारपूर्वक मांडली.हळूहळू आपल्या जगण्याचा भाग असलेल्या अनेक गोष्टी इतिहासजमा होत आहेत कालांतराने प्रत्येक घराचा आवश्यक भाग असलेले देवळी कोनाडे हे कालौघात नव्या स्वरूपात बदलत आहेत वा आता त्याची उपयुक्तता संपत चालली आहे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य रा. रं.बोराडे यांचा अंकुशराव कदम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला ,याप्रसंगी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन एमजीएम फिल्म आर्ट्सचे प्रमुख शिव कदम यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुबोध जाधव,गणेश घुले, राजेंद्र वाळके,प्रवीण देशमुख,सचिन दाभाडे,मंगेश निरंतर,उमेश राऊत यांनी प्रयत्न केले.

सदरील प्रदर्शन दि १९ ऑगस्ट पर्यंत सर्वांसाठी खुले असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment