Tuesday 27 March 2018

औरंगाबाद शहर कचरा समस्येवर 'कचराकोंडी जागर संवाद'


औरंगाबाद - शहराचा कचरा प्रश्न दिवसेंदिवस अधिक पेटत चाललेला आहे. प्रशासकीय पातळीवर तात्पुरत्या स्वरूपातील इलाज करून हा विषय काही काळाकरीता स्थगित ठेऊन यंत्रणेला या विषयावर यश मिळविता येईल, पण त्यामुळे कायमस्वरूपी हा प्रश्न सुटणारा नाही. औरंगाबादच्या कचराकोंडीवर कायमस्वरूपी उपाय काय असू शकतात? या अनुषंगाने दुरगामी मुलभूत चिंतनाची आवश्यकता आहे. या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कचराकोंडी जागर संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. २ एप्रिल २०१८, आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत करण्यात आलेले आहे.

कचराकोंडीवर सातत्याने विविध आंदोलने, चर्चा, जनआंदोलनांची उभारणी होत आहे. त्याबरोबरच चर्चेच्या माध्यमातून या विषयाकडे सोडवणुकीच्या दृष्टीकोनातून पाहण्याची नितांत गरज आहे. या सर्व अनुषंगाने जागर संवादाचे आयोजन करण्यात आलेले असून कचरा प्रश्नावर नेहमीच्या प्रश्नांच्या पुढे जाऊन प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून काय मार्ग असू शकतात, याचा वेध घेण्याची या कार्यक्रमामागील भूमिका आहे. मुंबई शहराच्या कचऱ्याच्या प्रश्नावर विविध संस्थांच्या सोबत ज्यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले असे कचरा प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक व भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथील शास्त्रज्ञ, पद्मश्री मा. डॉ. शरद काळे हे या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्येष्ठ संपादक मा.संजय वरकड हे 'औरंगाबाद शहर व कचरा' या विषयावर मांडणी करतील.या संवाद परिषदेत स्वच्छ, पुणे, स्त्री मुक्ती संघटना, मुंबई, एमजीएम क्लीन इंडिया सेंटर, औरंगाबाद, सीआरटी, औरंगाबाद, औरंगाबाद कनेक्ट टीम, अदर पुनावाला फाऊंडेशन, पुणे, वायु मित्र, पुणे इत्यादी महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या यशस्वी प्रयोगांचे सादरीकरण देखील करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महापौर मा. नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त मा. नवलकिशोर राम हे उपस्थित राहणार आहेत.
या जागर संवादास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,एमजीएम क्लीन इंडिया सेंटरचे प्रमुख डॉ.आर.आर.देशपांडे, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर,आयोजन सदस्य त्रिशूल कुलकर्णी, सुबोध जाधव, डॉ.संदीप शिसोदे,श्रीकांत देशपांडे,प्रवीण देशमुख,मंगेश निरंतर, गणेश घुले, निखिल भालेराव, मयूर देशपांडे, सचिन दाभाडे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment