Monday 26 March 2018

साहित्यनिर्मितीतून समाज घडविण्याची ताकद - इन्दरजित नंदन (सुप्रसिद्ध पंजाबी कवियत्री)

नाशिक : साहित्य निर्मिती ही आंतरीक शक्तीचा उद्गार असून त्यातून समाज बदलवण्याची ताकद आहे. दिव्यांगांनी आपल्या प्रतिभेतून संघर्षांचा सामना करून जिद्दीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. इतिहासापासूनच दिव्यांगांच्या कर्तुत्वाची ओळख समाजाला आहे. आज अनेक क्षेत्रात त्यांना आपले वेगळेपण सिद्ध करूनही मुख्य प्रवाहात येण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. त्यासाठी दिव्यांगांनी शिक्षण, रोजगारात स्वावलंबी व्हावे. त्यातून त्यांच्या जीवनाच्या कक्षा रूंदावतील. यासाठी समाजाने संवेदनशील बनून त्यांना हात द्यावा. असे प्रतिपादन पंजाबी कवियत्री श्रीमती इन्दरजित नन्दन यांनी केले.

साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे आयोजित ७ वे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन शनिवार, दि. २४ व रविवार, दि. २५ मार्च २०१८ रोजी विश्वास लॉन्स, गंगापूर रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर सम्मेलनाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती नंदन यांनी वरील विचार व्यक्त केले.

इन्दरजित नंदन पुढे म्हणाल्या की निराश आणि हताश होऊन प्रश्‍न सुटत नसतात. त्यातून मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. साहित्यातून माणसे जोडण्याची चळवळ उभी राहते.
आ. हेमंत टकले म्हणाले की, भाषा व अनुभवाच्या मिश्रणातून दमदार अभिव्यक्ती निर्माण होते. दिव्यांग साहित्य संमेलनातून नव्या जाणिवांचे, भाषिक अवकाशाचे चित्र दिसते आहे. आपल्या लेखनातून समाजात आनंद निर्माण करा, नवा विचार द्या. तेच साहित्य निर्मितीचे खरे मूल्य आहे. ह्या मूल्यांची जोपासना दिव्यांग करत असतात.

आ. देवयानी फरांदे म्हणाल्या की, विज्ञानाने आज प्रगती केली असून स्टीफन हॉकींगसारखे शास्त्रज्ञ दिव्यांगाचे प्रेरणास्थान आहेत. दिव्यांग व्यक्तींना आपल्यासोबत घेऊन त्यांना मदतीचा हात देणे, त्यांचे प्रश्‍न सोडवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. साहित्य संमेलनातून त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळत असते. लोकचळवळ उभी राहते. आपुलकी, प्रेम या बळांवर दिव्यांगांमध्ये आपण आत्मविश्वास निर्माण करावा. दिव्यांगांनी प्रकाशित केलेल्या अनेक साहित्यकृती अभिजात आहेत. अशा संमेलनातून नवोदित लेखक, कवी समोर येतील.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, दिव्यांगांना नव्हे तर सर्वसामान्य प्रत्येकाला समान सन्मान, प्रेम, आस्था, आपुलकी हवी असते. तीच त्यांना हवी असते. त्यामुळे दिव्यांगांच्या मनातील न्यूनगंड वाढत नाही. त्याच्यावर विश्वास व्यक्त केला तर तो वेगळ्या पद्धतीने आपली उर्जा क्रियाशील करू शकतो. सर्जक करू शकतो. उत्पादित करू शकतो. दिव्यांगांना समान सन्मान आणि संधी हवी असते. दया आणि सहानूभूती या गोष्टी त्यांच्या उमेदीचे खच्चीकरण करतात. त्यामुळे समाजाने त्यांना समान सन्मान आणि समान संधी द्यावी. दिव्यांग अचंबीत करून दाखवेल, अशी प्रगती करू शकतो. देशाचा जबाबदार आणि समर्थ नागरिक होऊन दाखवू शकतो.

कवी किशोर पाठक म्हणाले की, मराठी साहित्यांचे प्रतिनिधीत्व करणारे अस्सल प्रतिभेचे लेखक, कवी, दिव्यांग साहित्य संमेलनातून आले आहेत. मनाच्या जाणिवेतून आलेला अविष्कार वास्तवाची जाणीव करून देणार असतो. ते सारं यांच्या लेखनात आलं आहे. भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवर दिव्यांगांच्या साहित्यकृती आदर्श आहेत.

डॉ. रविंद्र नांदेडकर यांनी दिव्यांगाचे प्रश्‍न व ते सोडवण्यासाठी शासन पातळीवर झालेल्या प्रयत्नांचा वेध घेतला. दिव्यांगांकडे बघण्याची दृष्टी बदलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुहास तेंडुलकर म्हणाले की, दिव्यांगांच्या हक्कांसाठी मागण्यांसाठी चळवळ उभारली आहे. त्याला आज योग्य दिशा मिळाली आहे. नवे अस्त्विाचे भान निर्माण होण्यासाठी अशा संमेलनांची व्याप्ती वाढवावी असेही तेंडूलकर म्हणाले.

याप्रसंगी विजय कान्हेकर यांनी सम्मेलनाच्या आतापर्यंतच्या झालेल्या प्रवासाबद्दल माहिती दिली व संमेलनाच्या व्यवस्थापन कौशल्याबद्दल माहिती दिली.

स्वागत व प्रास्ताविक बापूसाहेब बोभाटे यांनी केले. सुनील पानमंद यांनी संमेलन अयोजनामागची भूमिका मांडली व विधायक व सकारात्मक लढा देण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले व पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सम्मेलनासाठी भारतातील विविध राज्यांतून दिव्यांग आलेले आहेत. संमेलनाचे सुत्रसंचालन सुनील रूणवाल यांनी केले तर आभार भावना विसपुते यांनी मानले.

No comments:

Post a Comment