Wednesday 27 September 2017

लघुपट निर्मितीसाठी दृश्यमाध्यमाच्या जाणिवा विकसित होणे गरजेचे



नाशिक : लघुपट निर्मिती करतांना व त्यामध्ये गतीमानता येण्यासाठी रोजच्या जगण्यातील गोष्टीला प्राधान्य देण्याबरोबरच वर्तमानातील सहज साध्या भाषेचा वापर करावा. घडणार्‍या घटनेकडे कृती म्हणून बघावे. तसेच कथेचे बीज हे दर्जेदार आणि अविष्कारासाठी पुरेपूर शक्यता असणारे हवे. दृश्यमाध्यम असले तरी शब्दांचा नेमका वापर करण्याचे कौशल्य दिग्दर्शकाकडे असावे. त्यातून कलात्मक आणि उत्तम  लघुपट समोर येतो. असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट समीक्षक, लेखक, अशोक राणे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, प्रयोग मालाड, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास लॉन्स यांच्या संयक्त विद्यमाने ‘लघुपट निर्मिती कार्यशाळे’चे आयोजन विश्वास क्लब हाऊस येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. राणे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ‘लघुपट निर्मिती करतांना दिग्दर्शकाने आपल्यातील दृश्यमाध्यमाच्या शक्यता तपासाव्यात आणि त्यातून मला काहीतरी आणि नेमके सांगायचे आहे. याची जाणीव अधोरेखित करावी. सिनेमाची एक भाषा असते आणि त्याचा वापर करण्याची शैली विकसित करावी. दृश्यातील व्यक्तीमत्त्वाच्या कंगोर्‍यातून खूप काही व्यक्त होत असते त्याचा पुरेपूर वापर करावा.’
यावेळी श्री. राणे यांनी भारतीय व जागतिक सिनेमाचे वेगळेपण, पटकथा, कॅमेरा आणि कथा मांडण्याची तांत्रिक शैली यांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले.
भारतात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावेत आणि ते फिल्मिन्गो इंटरनॅशनल लघुपट महोत्सवात जगप्रसिद्ध कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या व्यासपीठावरून जगभर जावेत, हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख हेतू होता.
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना दिग्दर्शक शिव कदम म्हणाले की, दिग्दर्शकाने पात्राच्या भूमिकेनुसार कथेची मांडणी करावी. पात्राचा प्रवास का कसा होतो? पात्राच्या भूमिकेनुसार लघुपटातील कथेत जिवंतपणा निर्माण करणे, सरळ-साधी गोष्टी सांगण्याची पद्धत यात वेगळेपण असायला हवे. उत्तम चित्रपट निर्मितीसाठी सर्व कलांचा व्यासंग आणि जाण असणे महत्त्वाचे आहे. संगीत चित्रकला यांची जाण दृश्य माध्यमाला पूरकच आहे असेही श्री. कदम म्हणाले.
प्रास्ताविक व स्वागत करतांना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, नाशिकमधील अनेक कलावंत लघुपट, चित्रपट क्षेत्रात जगभर नाव कमवत आहेत. त्यांना अशा कार्यशाळांमधून मार्गदर्शन, व्यासपीठ मिळण्यास निश्‍चितच मदत होईल. सिनेमा, लघुपटातून अनेक विषय प्रभावीपणे तरूण दिग्दर्शक मांडत आहेत. हे चित्रपटसृष्टीला बळ देणारे आहे.
कार्यशाळेत लघुपट म्हणजे काय? पटकथा लेखन, छायाचित्रण आणि संकलन, लघुपट निर्मितीची इतर अंगे, लघुपट त्यांचे आणि आपले आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत शंभरहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण काळे यांनी केले. 

No comments:

Post a Comment