Friday, 28 April 2017

१९ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन

१९  मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन
अंबाजोगाई : मागील वर्षीच्या पावसाने थोडासा दिलासा दिल्यामुळे शेतकरी सावरतो ना सावरतो तोच यावर्षी पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी खचला आहे. अनेक  शेतक-र्‍यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला. नैसर्गिक संकटामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथील मानवलोक संस्था, आई प्रतिष्ठान अंबाजोगाई, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मे रोजी अंबाजोगाई येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवलोकच्या पुढाकाराने सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. मागील काही वर्षापासून बेभरवश्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा सततच्या नैसर्गिक आघाताने खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशासून चार वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. तीन वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबच्या पाच शाखांनी पुढाकार घेत ८ मे २०१४ रोजी मानवलोक कार्यालयात पहिला सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडला. १३ जणांचे लग्न लावून या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य दिले होते. त्यानंतर २०१५ साली १६ जोडप्यांचे विवाह पार पाडण्यात आले. मागील वर्षी म्हणजेच १ मे २०१६ रोजी तब्बल ३० जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय मानवलोक संस्था, आई प्रतिष्ठान अंबाजोगाई, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या सामाजिक संस्थांनी घेतला आहे. या सोहळ्यासाठी शुक्रवार, दि. १९ मे २०१७ रोजी सायंकाळी ६.५४ वाजताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून इच्छुक जोडप्यांच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. विवाह सोहळा अंबाजोगाईतील रिंग रोडवरील मानवलोकच्या मुख्यालयात पार पडणार आहे.
या विवाह सोहळ्यात लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी ७ हजार एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, दिव्यांग आणि पुनर्विवाह करणारांसाठी नोंदणी मोफत आहे, त्यांनी कोणतेही शुल्क जमा करण्याची आवश्यकता नाही. यात सामील होणाऱ्या जोडप्यातील वराला सफारी ड्रेस ,टॉवेल, टोपी, हळदीचा ड्रेस तर वधुला हळदीची व लग्नाची साडी, मनी मंगळसुत्र, जोडवी तसेच संसार उपयोगी साहित्य आणि गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात इच्छुक वधू-वरांची १० मे २०१७ रोजी पर्यंत नोंद करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना वराचा वयाची २१ वर्षे  आणि वधूचा वयाची १८ वर्षे पूर्ण केली असल्याचा कागदोपत्री पुरावा देणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी मानवलोक मुख्यालयात अथवा अनिकेत लोहिया (७७७००१५०११), ॲड. जयसिंग चव्हाण (९८२२०२२८४४), ॲड. संतोष लोमटे (९८५०५४४२००), वैजनाथ देशमुख (९४२२७४४१८१), डॉ. नरेंद्र काळे (९४२२७४२६२८) आणि अभिजीत गाठाळ (९७६४०३३११) यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment