Saturday, 30 December 2017

‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’

31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला संगीतकार आर.डी. बर्मन 
यांच्या सुमधूर गितांची मैफल 
‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’ 

नाशिक : नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी, याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रृप, विश्वास हॅपीनेस सेंटर तर्फे व विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत संगीतकार आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या समधुर गीतांची मैफल ‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मैफिल सर्वांसाठी विनामुल्य आहे.
रविवार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी सायं.६ ते ९ या वेळात विश्वास लॉन्स येथे सदर मैफल संपन्न होणार असून, मैफिलीचे निवेदन ख्यातनाम लेखक व संगीत अभ्यासक अंबरीश मिश्र हे करणार आहेत. व गीतांचे गायन रागिणी कामतीकर, मिलींद धटींगण, विवेक केळकर हे करणार आहेत.
सुप्रसिद्ध संगीतकार स्व. मदन मोहन यांच्या संगीतकारकीर्दीवर आधारीत कार्यक्रम मागे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अत्यंत दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण निवेदन अंबरीश मिश्र यांनी केले होते. त्यांचे निवेदनाने प्रेक्षकांना सुमारे साडेतीन तास खिळवून ठेवले होते.
विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, सारस्वत बँक, फॅ्रवशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमी, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास लॉन्स, यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम संपन्न होत आहे.
आर.डी. बर्मन यांनी १९७० च्या दशकात आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. कटी पतंग हा चित्रपट त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार अशा अनेक गायकांनी त्यांच्याकडे गाणी म्हटली आणि लोकप्रियता मिळविली. 
आर.डी. बर्मन यांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आणून वापरायचं आणि इतर संगीतकारांनी त्याचा वापर आपापल्या संगीतात नंतर करायचा असा पायंडाच त्या काळी पडून गेला होता. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, गुलाबी आँखें जो तेरी देखी,
त्यांनी संगीत दिलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यामध्ये तिसरी मंजील, पडोसन, हरे रामा हरे कृष्णा, अमर प्रेम, सिता और गिता, मेरे जीवन साथी, शोले, दिवार, खुबसूरत, कालीया, नमकीन, तेरी कसम, परिंदा, पुकार,१०४२ अ लव स्टोरी अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तरी या मैफिलीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर, समन्वयक विनायक रानडे, विवेकराज ठाकूर यांनी केले आहे. प्रवेश विनामुल्य आहे.

Wednesday, 27 December 2017

एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबीर

जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी म्हणून यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पु. ल. अकादमीच्या सहयोगाने २ जानेवारी, २०१८ला रवींद्र मिनी थियेटरमध्ये एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबिराचे आयोजन करीत आहे. विनामुल्य असलेल्या ह्या शिबिरात प्रसिद्ध नाट्य/चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते ह्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. मर्यादित जागा असल्याने, yiffonline.com ह्या वेबसाईटवर अथवा पुढील लिंकवर क्लिक करा..

https://goo.gl/KxoTkU  तुम्हाला पूर्व नोंदणी करुन ह्या शिबिराला येता येईल. उत्तम व नविनत्तम जागतिक, एशियन व भारतीय सिनेमांचा आस्वाद घेण्यासाठी १९ ते २५ जानेवारी, २०१८ ला होणाऱ्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नोंदणीही तुम्हाला ह्याच वेबसाईटवर किंवा ह्या शिबिराच्या जागी प्रत्यक्षात करता येईल. 

Monday, 25 December 2017

विश्वास हॅपीनेस सेंटर’, ‘विश्वास ग्रृप’ तर्फे खवय्यांसाठी ‘नॉनव्हेज महोत्सवाचे’ आयोजन





‘विश्वास हॅपीनेस सेंटर’ ‘विश्वास ग्रृप’ तर्फे ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमार्तंगत अस्सल चवदार झणझणीत चवींचा मिलाफ असलेला ‘नॉनव्हेज महोत्सव 2017’ चे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक,  सारस्वत बँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास लॉन्स,  यांच्या संयुक्त विद्यमाने 25 डिसेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी10 ते रात्री 10 या वेळात विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे संपन्न होत आहे.

महोत्सवाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची आहे. महोत्सवाचे संयोजक विनायक रानडे, विवेकराज ठाकूर आहेत.

सदर महोत्सवाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर किरण विंचुरकर यांचे ‘भरोसा केटरर्स’ असून सी फूड पार्टनर ‘कोकण करी’ असून, कॅफे पार्टनर ‘कॅफे क्रेम’ इंदिरानगर हे आहेत. वाईन पार्टनर ‘यॉर्क वाईनरी’ हे आहेत. शुद्ध व सात्विक शाकाहारींसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. हे महोत्सवाचे वेगळेपण ठरावे.

महोत्सवात स्वादिष्ट मसालेदार मटण, चिकन आणि फिश अशा नॉनव्हेजचे 100 पेक्षा अधिक पदार्थ असणार आहे. त्यात ब्लॅक चिकन लोणचं, मटका चिकन, खपसा, मटका दम चिकन, चिकन पकोडा, लोबस्टर, ऑईललेस तंगडी, चिकन चीज रोट, मंदी चिकन राईस, चिकन दाबेली, चिकन सोसेज, फिश खर्डा, फिश खिमा, फिश बिर्याणी,  फिश टिक्का, कोस्टल साईड फिश तवा फ्राय, फिश मसाला फ्राय, प्रॉन्स चिल्ली, कुझीन फिश पुलीमंची, फिश रवा फ्राय,  मटन, मटन बिर्याणी व सौदी डिशेस, मंगोलियन स्टाईल कोस्टल, शिरकुर्मा आदी पदार्थांची रेलचेल असणार आहे.

महोत्सवात उडपी स्पाईस मंगलम, कोकण करी, फातीमा कुकेलू, बिर्याणी हाऊस, यम्मी इट वेल, सोना सी. फुड, अमर किचन, कश्यपी फ्राय नेशन, स्नॅक्स ऑन बोर्ड, तंदुरी जंक्शन, आस्वाद, भरोसा कुल्फी, सोनाली पान दरबार, साई केळी वेफर्स, मलेनाडू ट्रेडर्स, इनफंट एजन्सी, देशपांडे सोलकढी, प्रेरणा ब्रेव्हरेज प्रा.लि., कॅफे क्रिम, सीकेपी फुडस्, होम रिव्हाईज पब्लिकेशन आदींचा समावेश आहे.

‘विश्वास संकल्प आनंदाचा’ तर्फे ‘मिसळ-सरमिसळ महोत्सव’, ‘नाशिक चौपाटी’  ‘नाशिक फास्ट’,‘नॉन व्हेज महोत्सव’‘भजी महोत्सव’,‘व्हेज बिर्याणी महोत्सव’ आदी वैशिष्टपूर्ण महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला खवय्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.

महोत्सवानिमित्त विश्वास ग्रृप तर्फे उत्कृष्ट गायक/गायिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेचे संयोजक सुप्रसिद्ध संगीतकार संजय गीते आहेत. सदर स्पर्धा महोत्सवाच्या तीनही दिवशी रोज सायं. 6 ते 9 या वेळात विश्वास लॉन्स येथे संपन्न होईल. यात विद्यार्थी-विद्यार्थिंनी, खुल्या गटात महिला व पुरुष अशा एकूण चार गटात स्पर्धा संपन्न होईल. रोजची बक्षिसे रोज दिले जातील. बक्षिस देतांना स्पर्धक उपस्थित असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने गाण्याचा ट्रॅक मोबाईलमध्ये आणावा. परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू विश्वास को-ऑप बँक, भरोसा केटरर्स  यांच्यावतीने देण्यात येतील.

नॉनव्हेज महोत्सवात जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक विश्वास ठाकूर, विनायक रानडे 9922225777, विवेकराज ठाकूर 9028089000 यांनी केले आहे.

फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव – २०१७ संपन्न...






“प्रयोग मालाड” आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ चित्रपट अभ्यासक व समीक्षक श्री. अशोक राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजीत “फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०१७” दिनांक डिसेंबर २२ ते २४, २०१७ या दरम्यान  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, मुंबई येथे संपन्न झाला. महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यास सुप्रसिद्ध अभिनेते श्री. संदीप कुलकर्णी उपस्थित होते.  त्यांच्या हस्ते फिल्मिन्गो २०१७ च्या कॅटलॉगचे प्रकाशन करण्यात आले.  श्री. अशोक राणे यांनी उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक केले. 

या महोत्सवात एकूण १६० लघुचित्रपट सामील झाले होते. त्यामध्ये भारतासमवेत इंग्लंड, अमेरिका, इटली, यु.ए.ई., ऑस्ट्रिया, कॅनडा, आणि श्रीलंका येथील स्पर्धकांचा समावेश आहे.  फिल्मिन्गो महोत्सवातून मागील वर्षी Cannes Short Film Corner ला निवड झालेले लघुपट, त्याचप्रमाणे स्पंदन परिवार व Whistling Woods International मधील पारितोषिकप्राप्त लघुपट या फिल्मिंगो महोत्सवामध्ये दाखविण्यात आले.   श्री. रघुवीर कुल, श्रीमती रेखा देशपांडे, श्री. अनंत अमेंबल, श्री. अरुण गोंगाडे, आणि श्री अवधूत परळकर  या मान्यवरांनी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

दिनांक २३ डिसेंबर २०१७ – महोत्सवाच्या दुस-या दिवशी श्री. अमरजित आमले आणि श्री. विजय कळमकर यांचा मास्टर क्लास महोत्सवाचे अजून एक विशेष आकर्षण ठरले.  उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना चित्रपट निर्मिती विषयीची आस्था आणि निष्ठांवर अधिक भर देऊन निर्मिती प्रक्रियेसंबंधीचे विविध कंगोरे त्यांनी उलगडून दाखविले.  १७२ प्रशिक्षणार्थींनी मास्टर क्लासचा लाभ घेतला.

दिनांक २४ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या सांगता समारंभातील पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द निर्माते आणि दिग्दर्शक श्री. एन. चंद्रा आणि विशेष अतिथी म्हणून प्रभात चित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. किरण शांताराम, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे श्री. दत्ता बाळसराफ आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानचे श्री. निलेश राऊत मंचावर उपस्थित होते.

या महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरणारे पहिले पाच लघुपट, प्रतिष्ठित कान्स फेस्टिवल – २०१८, फ्रान्स येथे पाठविण्याची जबाबदारी “प्रयोग मालाड” ही संस्था स्वीकारणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले.  अर्पिता वोरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत आकर्षक आणि नीटनेटके केले.

Wednesday, 20 December 2017

कादंबरी अथवा आत्मचरित्र हे साहित्यांचे उपजत गुण आहेत - प्रा. फ. मु. शिंदे


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर आणि दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने "साहित्यिक आपल्या भेटीला" या विषयावरती मराठी भाषा विषय व कला विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात नूकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु.  शिंदे हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक होते. प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी  विभागाचे प्रमुख डॉ. राजशेखर शिंदे यांनी केले.
               
विद्यार्थांशी संवाद साधताना शिंदे यांनी साहित्य विषयी आवड निर्माण होण्यासाठी विविध विषयांचा अभ्यास व त्याचे परीक्षण देखील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सविस्तर सांगितले. एखादी कविता अथवा कादंबरी निर्माण होताना त्या लेखकाने अथवा कवीने विविध अंगाने त्याचा अभ्यास करून आणी जे आपल्याला सुचले, ते साहित्य रूपाने कसे मांडले पाहिजे, याबाबत सुध्दा माहिती दिली.

तसेच कथा आणि कादंबरी अथवा आत्मचरित्र हे साहित्यांचे उपजत गुण आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीकडे आपली पाहण्याची दृष्टी खोलवर दृष्टी यावर सर्वकाही निगडीत असते. मराठी भाषा आपण जशी वळवावी तशी वळते पण कोणत्या प्रसंगी कोणत्या ढंगाने व अंगाने त्याचा उपयोग केला पाहिजे, यासाठी मराठी भाषेचे परिपूर्ण ज्ञान अवगत करण्यासाठी मराठी साहित्य तरुण पिढीने वाचणे गरजेचे आहे.

त्याचे रसग्रहण आपण कसे करावे त्याप्रमाणे तुमच्यातला साहित्यीक निर्माण होतो. या प्रसंगी अनेक विध्यार्थ्यांने फ. मु. शिंदे यांना वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन दूर केले. हा संवादाचा कार्यक्रम २ तास होता. महाविद्यालयाचे प्राचार्य व्हि. पी. उबाळे यांच्या हस्ते शिंदे यांचा  सत्कार करण्यात आला, व अध्यक्षीय मनोगत प्राचार्यांनी केले, या कार्यक्रमास विभागीय केंद्राचे सचिव दिनेश शिंदे प्राध्यापक वर्ग व विध्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते. 

क्लायमेट अॅबॅसॅसेंडर्स विद्यार्थी परिषद संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, सृष्टीज्ञान मुंबई आणि जमनालाल बजाज फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्लायमेट अॅबॅसॅसेंडर्स विद्यार्थी परिषदेचे नूकतेच चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे,  प्रादेशिक हवामान विभाग मुंबईचे उपमहानिर्देशक कृष्णानंद होसालीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीला शाळकरी आणि कॉलेजच्या मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची अधिक गर्दी होती.  त्यानंतर सभागृहात विविध प्रकारचे पारंपारिक नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमामध्ये शाळा आणि  कॉलेजच्या मुलांनी अधिक सहभाग घेतला होता. विद्यार्थींनी केलेले उपक्रम फोटोच्या माध्यमातून दाखवण्यात आले. कार्यक्रमामध्ये काळे सरांनी हवामानात होत असलेल्या बदलाबाबत मार्गदर्शन केले. तर होसालीकरांनी सध्या आलेल्या ओकी वादळ बद्दल थोडक्यात माहिती दिली. 

Tuesday, 19 December 2017

'विज्ञानगंगा'चे बाविसावे पुष्प संपन्न ..











यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत बाविसावे पुष्प डॉ. समीर देशपांडे यांचे ‘भारतीय सोशल मार्केटींगचे’ प्रश्न सोडविण्यासाठी सात युक्त्या या विषयावर यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी पार पडले.
सुरुवातीला डॉ. समीर देशपांडे यांनी भारतीय सोशल मार्केटींग म्हणजे नेमके काय आणि त्याचे फायदे आणि तोटे उपस्थितांना समजावून सांगितले. त्यानंतर देशपांडे यांनी उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण कशा पध्दतीने केले पाहिजे हे उदाहरणासहित स्पष्ट करून सांगितले. सध्याच्या घडीला भारतीय सोशल मार्केट मधील तंबाकू आणि अल्कोहोल यांची सुद्धा उदाहरणं देऊन उपस्थितांची मनं जिंकली.

'गुजरात निवडणूक २०१७ अन्वयार्थ' परिसंवाद संपन्न..










यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, औरंगाबाद एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत 'गुजरात निवडणूक २०१७ अन्वयार्थ' या विषयावर विशेष परिसंवाद जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे पार पडला. या परिसंवादामध्ये मा. संजय मिस्कीन, राजकीय पत्रकार, मा. अभिजीत ब्रह्मनाथकर, राजकीय पत्रकार आणि मा. श्रीकांत देशपांडे, राजकीय विश्लेषक सहभागी झाले होते .  

Monday, 18 December 2017

फिल्मिन्गो ‘आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव -२०१७’

प्रयोग मालाड संस्था आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्मिन्गो ‘आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव -२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृह येथे होणार आहे. यावर्षीच्या फिल्मिन्गो फेस्टिवल - २०१७ साठी एकूण १५९ पेक्षा अधिक शॉर्टफिल्म्स आलेल्या असून त्यामध्ये विदेशी स्पर्धकांचा समावेश आहे. हा उपक्रम २२, २३ आणि २४ डिसेंबर २०१७ रोजी रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई , नरीमन पॉईंट येथे होईल. 

या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहूणे अभिनेते संदीप कुलकर्णी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस मा. शरद काळे यांच्या शुभहस्ते २२ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वा होईल.

Sunday, 17 December 2017

राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक पुरस्कार


यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन
नियतकालिक स्पर्धा – २०१७ साठी अंक पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम
दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट महाविद्यालयीन नियतकालिकास यशवंतराव चव्हाण पारितोषिकाने सन्मानित केले जाते. प्रथम पारितोषिक रु. १०,०००/- चा धनादेश, द्वितीय पारितोषिक रु. ७,०००/- चा धनादेश, तृतीय पारितोषिक रु. ५,०००/- चा धनादेश, उत्तेजनार्थ दोन पारितोषिक रु. १,०००/- प्रत्येकी, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असंख्य महाविद्यालयीन नियतकालिकांमध्ये पडलेले पहावयास मिळते या नियतकालिकांमध्ये आपले लेख, कविता लिहणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे साहित्यिक घडत असतात. युवांना आपले मत मांडायची संधी देतानाचा त्यांच्यातील कलागुणांना वाव देणाऱ्या नियतकालिकांचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील उत्कृष्ट नियतकालिकांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. या स्पर्धेकरिता सादर केलेल्या नियतकालिकांचे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये जतन करून ते विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.
स्पर्धेकरिता महाविद्यालयांनी आपली नियतकालिकेची मुदत वाढवून दि. २७ डिसेंबर २०१७ पर्यंत करण्यात आली आहे. तेव्हा महाविद्यालयांनी आपली नियतकालिका २७ डिसेंबर च्या आत प्रती, संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्यावर पाठवावेत. पुरस्कारासंबधी तपशील http://ycpmumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता कार्यालयामध्ये ०२२-२२०२८५०८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा श्री. सुबोध जाधव (९८२३०६७८७९) व श्रीमती. मनीषा खिल्लारे (९०२२७१६९१३) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्ष्या खा.सुप्रिया सुळे व कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी केले आहे.
- दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई)
- निलेश राऊत, संघटक (नवमहाराष्ट्र युवा अभियान, मुंबई)

Thursday, 14 December 2017

‘चित्रपट चावडीतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘ल हावर’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १६ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फिनलँड दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘ल हावर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
फिनलँडचे चित्रपट दिग्दर्शक अकी कौरीस्माको ह्यांच्या तीन चित्रपटांच्या मालिकेतील हा शेवटचा चित्रपट.
‘ल हावर’ ह्या चित्रपटाचे कथानक उत्तर फ्रान्समधील ल हावर बंदरात घडते. आफ्रिकेतील अनेक देशातून लोक अनधिकृतपणे युरोपातील अनेक देशामध्ये आश्रय घेऊ पाहतात. इद्रीस हा गॅबन मधून आलेला कुमारवयीन मुलगा व मार्सेल हा बुटपॉलीश करून पोट भरणारा वृद्ध यातील ही आश्वासक, उबदार कथा, मार्सेल, इद्रीसला त्याच्या आईला भेटविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो ते पहाण्यासाठी अवश्य या. २०११ मध्ये फिनलँड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९३ मिनिटांचा आहे.
‘ल हावर’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

औरंगाबाद विभागीय केंद्रातर्फे 'गुजरात निवडणूक २०१७ अन्वयार्थ'

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, औरंगाबाद एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत 'गुजरात निवडणूक २०१७ अन्वयार्थ' या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष परिसंवादामध्ये मा. संजय मिस्कीन, राजकीय पत्रकार, मा. अभिजीत ब्रह्मनाथकर, राजकीय पत्रकार आणि मा. श्रीकांत देशपांडे, राजकीय विश्लेषक सहभागी होऊन गुजरात निवडणूक २०१७ याविषयावर चर्चा करणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवारी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे सकाळी ११ वाजता सुरू होईल. 

Monday, 11 December 2017

अध्यात्मिक वाचनातून समाज मनाची विधायक जडणघडण

नाशिक :  समाज सुसंस्कृत होण्यासाठी व समाजमनाची विधायक जडणघडण होण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अध्यात्मिक परंपरेचा शोध घेण्यासाठी अध्यात्मिक पुस्तकांचे, संत चरित्रांचे वाचन करणे गरजेचे आहे. त्यातून सत्वशील समाज निर्माण होण्यास निश्‍चितच मदत होईल. असे प्रतिपादन विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले.
विश्वास ग्रुप, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त रविवार कारंजा येथे मोफत अध्यात्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. विश्वास ठाकूर बोलत होते.  ठाकूर म्हणाले की, वाचन संस्कृती वाढविण्याबरोबरच नव्या पिढीला विचारांची व संस्कारांची जोड देण्यासाठी पुस्तके मोलाची भूमिका बजावत असतात.
याप्रसंगी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचे शिल्पकार विनायक रानडे, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार, कार्याध्यक्ष पोपटराव नागपूरे, सेक्रेटरी रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मराठी, हिंदी धार्मिक परंपरेतील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथाचे, संदर्भ ग्रंथांचे, मासिकांचे वाटप करण्यात आले. पुस्तक वाटप प्रसंगी अनेक भाविकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले व म्हणाले की या पुस्तक वाटपातून अनेक चांगली व माहितीपर पुस्तके आम्हाला मिळाली आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रितेश पवार, तुकाराम नागपूरे, वृषाल कहाणे, जगदीश भुजबळ, जुवलेकर मॅडम, सचिन हांडे, कैलास सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शिरसाठ आदींनी परिश्रम घेतले.  

Sunday, 3 December 2017

सृजन कार्यशाळेला १४ वर्ष पूर्ण त्यानिमित्ताने मुलांसाठी जादूची प्रयोग ही कार्यशाळा संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागातर्फे वस्ती पातळीवरील मुलांकरिता सृजन कार्यशाळेतर्फे विविध कार्यक्रम नियमित राबविले जातात. सृजन कार्यशाळेला डिसेंबर २०१७ मध्ये १४ वर्षं पूर्ण होत असून सृजन या कार्यक्रमाची संकल्पना प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची आहे. सृजन २०१७ या वार्षिक कार्यक्रमाची सांगता दिनांक ४ डिसेंबर २०१७ रोजी जादुगार पी. बी. हांडे यांच्या जादूची दुनिया या कार्यक्रमाने झाली.कार्यशाळेत ७५ मुलांचा समावेश होता.

एकदिवशीय कार्यशाळा संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "सहकारी गृहनिर्माण संस्था" कायदा, नियम आणि जीएसटी यासंदर्भात एकदिवशीय माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये कायदा आणि नियम यासंदर्भात प्रभाकर चुरी तर जीएसटी विषयावरती अजीत जोशी यांनी प्रक्षिणार्थींना मार्गदर्शन केले. आजच्या कार्यशाळेत १२० जणांची उपस्थिती होती.

सुरूवातीला अजित जोशी यांनी जीएसटी म्हणजे नेमक काय आहे. कर प्रणाली कशाप्रकारे भरली जाते. जीएसटी आणि सोसायटी याबाबत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी योग्य प्रकारे उत्तरे दिली. सध्या होत असलेले बदल शिकण्याचे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले.
त्यानंतर सोसायटी मधील कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करावा याबाबत सीमा रेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रभाकर चुरी यांनी सोसायटी कायदा आणि नियमन याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.

Friday, 1 December 2017

चित्रपट चावडीतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फिनलँडचे दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
जगप्रसिद्ध कादंबरीकार पॅदेर दोस्तोवस्की यांच्या ‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ या कादंबरी वरती हा चित्रपट आधारीत आहे. चित्रपटाचा नायक राईकायनेन हा एका खाटीकखान्यात काम करत असतो. तो अशा व्यक्तीचा खून करतो त्या व्यक्तीने आपल्या गाडीने नायकाच्या बायकोला जखमी केलेले असते. त्याचवेळी खूनाच्या प्रसंगी नायकाची एका तरूण मुलीशी गाठ पडते. पुढे काय होते ते पाहण्यासाठी आवश्य या. फिनलँडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकी कौरीस्माकी हे त्यांच्या सहज सुंदर, हलक्या फुलक्या, नर्मविनोदी परंतु तितक्याच चमत्कृतीपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रमुख पात्रे सर्व सामान्य फिनलँडर असतात. सर्व सामान्यांची सुख:दुखे:, त्यांच्या जीवनातील चढउतार ते तटस्थपणे नेटकेपणाने टिपतात.
1983 मध्ये फिनलँड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९३ मिनीटांचा आहे.
‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Monday, 27 November 2017

यशवंतरावांचे निर्णय राज्याला समृध्द करणारे

सोलापूर : कृषी, उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समृध्द करणारे ठरले आहेत. त्यांच्यामुळेच ख-या अर्थाने राज्याची प्रगती झाली आहे, असे विचार डॉ. शंकरराव साळुंखे यांनी व्यक्त केले.

शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होते. या प्रसंगी विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार, प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, प्रा. संगमेश्वर नीला आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. गो. मा. पवार यांनी यशवंतरावांचे व्यक्तीमत्त्व नव्या पिढीला समजणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत आपले विचार मांडले.

डॉ. साळुंखे म्हणाले, समाजकारण आणि राजकारण करताना अनेक चढाओढींना यशवंतरावांना तोंड द्यावे लागले. द्विभाषिक राज्य आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले होते. परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी यशवंतराव पंडीत नेहरूंना हे सारे पटवून देण्यात यशस्वी झाले. केवल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य यशवंतरावांनी साध्य केल्यामुळे ते शक्य झाले. आधूनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आदी महत्त्वाची खाती संभाळून त्याला योग्य दिशा देण्याचे काम यशवंतरावांनी केले. कला, साहित्य यासाठी त्यांचे योगदान मोठे असून कृषी उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतरावांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समजणे कठीण आहे, असे ही ते म्हणाले. चव्हाण यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. रेखा ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. 

Sunday, 26 November 2017

आनंदी जगण्यासाठी सुसंवाद, सकारात्मक मानसिकता, सात्विक आहार व व्यायामाची गरज - डॉ. मनोज चोपडा

नाशिक : आजच्या धावपळीच्या जगात जीवनशैलीत वेगाने बदल होत असून ताण-तणावाचे वाढते प्रमाण, सकारात्मक जीवनशैलीचा अभाव, सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे आलेले नैराश्य, उदासिनता, व्यायामाचा अभाव, व्यसनांचे वाढते प्रमाण, विसंवाद यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ते रोखण्यासाठी आनंदी जीवनासाठी निसर्गाशी मैत्री करून सात्विक आहार, मेडीटेशन, त्याचबरोबर आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.

महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांचे जीवनशैली व हृदयरोग या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर येथे सदर व्याख्यान संपन्न झाले.

ते पुढे म्हणाले की आज ग्लोबल वॉर्मिंग, वाढते ध्वनी प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण यांचा परिणाम जीवनशैलीवर होत आहे. आज तरूण वयातच हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी तेल, तूप, साखर, मैदा, मीठ यांचे आहारातील प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर योगा, स्वत:साठी वेळ देणे, आवडीचे छंद जोपासणे यांमुळे ताणतणाव कमी करण्यासाठी मदतच होते. शरीर हे जैविक घड्याळ आहे. ते योग्य रितीने चालण्यासाठी जीवनशैलीत शिस्त आणणे महत्त्वाचे आहे. नियमित आरोग्य तपासणी आहाराच्या वेळा निश्‍चित करणे, प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. वेळेचे व्यवस्थापन करून आनंदी मनाने काम करण्याचे कौशल्य साधता आले पाहिजे. तिच खरी आनंदी जीवनाची गुरूकुल्ली आहे असेही डॉ. चोपडा पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. डॉ. मनोज चोपडा यांचा परिचय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा यांनी केला. तर सन्मान प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला. डॉ. रश्मी चोपडा यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सदस्य कविता कर्डक, तसेच डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, गिरीष देवस्थळी, मंगला कमोद, कैलास पाटील, डॉ. सुभाष पवार, विनायक रानडे, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

अहमदनगर केंद्रातर्फे यशवंतराव चव्हाणची ३३ वी पुण्यतिथी साजरी...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांची ३३ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी केली. तसेच स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचार तरूण पिढाला ज्ञात व्हावेत म्हणून स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाजकारण, संरक्षण या क्षेत्रातील योगदानातून महाराष्ट्राने जी घोडदौड केली आहे ती अहमदनगर केंद्रातर्फे विविध उपक्रमांतून दाखविण्यात आली. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र उभा करण्याचे काम ग्रामीण भागात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई विभागीय केंद्र अहमदनगरच्या माध्यमातून सुरू आहे आज २५ नोव्हेंबर २०१७ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांची ३३ वी पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते.

वार्षिक शिक्षण परिषद संपन्न...

शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक शिक्षण परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर आज दिवसभरात चर्चा करण्यात आली. ह्या कार्यक्रम शनिवारी रंगस्वर' चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान, मुंबई, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई येथे राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमामध्ये डॉ.कुमुद बन्सल यांना उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार देण्यात आला आणि व्हाट्सअँपच्या चर्चा-शिक्षण विकासाच्या या शिक्षण विकास मंच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सेमी इंग्रजी बद्दल विद्यार्थी आणि शिक्षक यांचा टॉक शो झाला याचे सूत्रसंचालन सुदाम कुंभार यांनी केले. त्यानंतर स्वागत व कार्यक्रमाची रूपरेषा बसंती रॉय यांनी केले. कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सेमी आणि मराठी याबद्दल लोकांना मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. तर डॉ. वसंत काळपांडे यांनी सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. नंतर राज्यातील काही तुरळक शाळांनी केलेले प्रयोग दाखविण्यात आले. प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी त्यांच्या काळातील शिक्षण क्षेत्रातील अनुभव लोकांना सांगितले.

लवकरच वयाची १०० वर्ष पूर्ण करणारे भुजंगराव कुलकर्णी यांना यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१७ पुरस्कार प्रदान...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पार पडला. त्यावेळी खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी स्वागत व प्रास्ताविक म्हणून प्रतिष्ठानवतीने शिक्षण, आरोग्य, अपंग व इतर उपक्रमाविषयी थोडक्यात आढावा घेतला यामध्ये विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून त्यांची मदत करणे त्यांना जगण्याची उमेद देणे. शिक्षण व शिक्षणक्षेत्रात होणारे बदल प्रतिष्ठानच्या माध्यामतून राबविणे अशा अनेक उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच पुढील वर्षी ‘युवा संवाद यात्रा’च्या माध्यामातून यशवंतराव चव्हाण यांची ओळख युवा पिढीला होण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजेसमधून चर्चासत्राचे आयोजन केले जाईल असे यावेळी सांगितले. या कार्यक्रमध्ये वि.का. राजवाडे यांच्या संकेतस्थळाचे अनावरण व सदानंद मोरे लिखीत..“लोकमान्य ते महात्मा”या पुस्तकांचे प्रकाशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात १२ मार्च २०१८ रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रोफेसर एम. एम शर्मा यांना दिला जाईल अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केली.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१७
यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्सस्तरीय पुरस्कार २०१७' थोर प्रशासकीय सेवक भुजंगराव कुलकर्णी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शरद पवार यांनी सांगितले की भुजंगराव कुलकर्णी हे दोन महिने अकरा दिवसांनी वयाची १०० वर्षपूर्ण करत आहेत असे सांगितले. या कार्यक्रमासाठी नेहरु सेंटरचे सतिश सहानी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले

Friday, 24 November 2017

३३ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य पदयात्रा

कराड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने देशनेते यशवंतरावजी चव्हाण यांची ३३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता कराड मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रा मार्ग विरंगुळा-विजय चौक-टिळक हायस्कूल-कन्याशाळा-चावडी चौक-समाधी स्थळ असा असेल. त्यानंतर समाधी स्थळी पुष्पांजली व सन्माननियांची आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल. भव्य पदयात्रे मध्ये अधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटिल आणि मोहनराव कृष्णाजी डकरे यांनी केले आहे. 

मा. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी...

आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व धुरंधर राष्ट्रीय नेते मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ वी पुण्यतिथी निमित्त शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमांचे आयोजन चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईन्ट मुंबई येथे करण्यात आले आहे.
असे कार्यक्रम होतील, वि. का. राजवाडे यांच्या साहित्याच्या वेबसाईटचे उद्घाटन, "लोकमान्य ते महात्मा" या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान करणे, राज्यस्तरीय पारितोषिक स्वीकाराचे भाषण, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१७ जाहीर करणे, अध्यक्षांचे भाषण.

Thursday, 23 November 2017

तृतीयपंथींसाठी राज्यस्तरीय स्वतंत्र धोरण असावे- कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे

मागील आठवड्यात एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये राज्यभरातल्या महिलांसोबत कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली होती. चर्चेमध्ये तृतीयपंथींचा सुध्दा समावेश होता. त्याअनुशंगाने आज दुपारी तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाने प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची शिक्षण, व्यवसाय आणि नोकरी अशा ब-याच समस्यांसाठी भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तृतीयपंथींसाठी राज्यस्तरीय स्वतंत्र धोरणाची मागणी करणार असल्याचं शिष्टमंडळाला सांगितलं.

स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती रेखाचित्र दालनाचे शुक्रवारी उद्घाटन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व मराठवाडा साहित्य परिषदेचा संयुक्त उपक्रम

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र,औरंगाबाद व मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जीवनविषयक कार्याचा वेध घेणार्‍या रेखाचित्र दालनाचा उद्घाटन समारंभ आदणीय यशवंतराव चव्हाण यांच्या 33 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येस शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबर 2017 रोजी सायं. 5 वा. आयोजित केला आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांच्या हस्ते होणार असून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, नंदकिशोर कागलीवाल, मुकुंद भोगले, मधुकरअण्णा मुळे, सचिन मुळे, दादा गोरे, कुंडलीक अतगिरे ,सुनिल किर्दक, दासू वैद्य, बिजली देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित या प्रदर्शनात एकूण 28 रेखाचित्रे असून, त्यामध्ये शिवनेरी गडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या प्रतिमेचे अनावरण प्रसंगाची चित्र मालिका, महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्या गेला त्या प्रसंगाची चित्रमालिका त्याच बरोबर संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी व राज्यनिर्मितीचा आनंद सोहळा असे एकूण 28 रेखाचित्रांमधून मा. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जीवनपट या चित्र मालिकेत उलगडून दाखविण्यात आला आहे. सदरील चित्रप्रदर्शन कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या विशेष कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय केंद्र औरंगाबादचे सचिव नीलेश राऊत, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर,डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, रेणुका कड,श्रीकांत देशपांडे,मंगेश निरंतर,गणेश घुले,मयूर देशपांडे आदींनी केले आहे.

Monday, 20 November 2017

सहकारी गृहनिर्माण संस्था समस्या जीएसटी या विषयावर एकदिवशीय माहिती कार्यशाळा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "सहकारी गृहनिर्माण संस्था" कायदा, नियम आणि जीएसटी यासंदर्भात एकदिवशीय माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये कायदा आणि नियम यासंदर्भात प्रभाकर चुरी तर जीएसटी विषयावरती अजीत जोशी हे २ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत प्रक्षिणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्या-या प्रक्षिणार्थीं कडून २५० रूपये शुल्क आकारले जाईल. ही कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. या कार्यशाळेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. संपर्क - ८२९१४१६२१६, २२०४५४६०.

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने वाटप


सासवड येथे आज अपंग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यात आले. आज या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बघून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचामार्फत आम्ही अपंग बांधवांच्या हक्कासाठी, सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कामाचे समाधान वाटतं असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
जुलै महिन्यात बारामती येथे दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी मोजमाप नोंदणी शिबिरे घेण्यात आली होती, या शिबिरात अपंग व्यक्तींना आवश्यक साधने व कृत्रिम अवयव देण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती आणि मोजमाप घेण्यात आले होते. या शिबिरात बारामती तालुक्यात ३०८, दौंड तालुक्यात २५२, इंदापूर २३४, पुरंदर २७१, भोर ४५४, पौड २४४, खडकवासला ५९६ जणांची नोंदणी झाली होती. या सर्वांना या कार्यक्रमात कृत्रिम अवयव व साधने यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Sunday, 19 November 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यंदाचा राज्यस्तरीय पारितोषिक श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना जाहीर..

त्यांचा थोडक्यात परिचय


भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी मूळचे बीड जिल्हा परळी तालुक्यातील पिंपळगावचे. ५ फेब्रुवारी १९१८ चा त्यांचा जन्म. अंबाजोगाई, संभाजीनगर ते हैदराबाद असा त्यांचा शैक्षणिक प्रवास. १९३९ मध्ये त्यांनी हैदराबाद राज्याच्या प्रशासकीय सेवेत कारकीर्दीला सुरुवात केली. हैदराबाद राज्यातच ते उपसचिव पदापर्यंत पोहोचले. पुढे देश स्वतंत्र झाला, मराठवाडाही निजामाच्या जोखडातून मुक्त झाला तेव्हा भुजंगरावांची कारकीर्द ही नांदेडच्या जिल्हाधिकारीपदापासून सुरू झाली. संभाजीनगरातही ते १९५६ ते १९५९ या कालावधीत जिल्हाधिकारी होते. पुण्याचे मनपा आयुक्त, मुंबईचे विभागीय आयुक्त अशी पदे भूषवत ते जनगणना मोहिमेचे प्रमुख, मंत्रालयात नगरविकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि जलसंपदासारख्या विभागाचे सचिव होत १९७४ मध्ये शासकीय सेवेची ३५ वर्षे पूर्ण करीत ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीलाही आज ४३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आपल्या खात्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करीत. खात्यांतर्गत सुधारणा घडवून आणण्यात भुजंगरावांचा हातखंडाच होता. शासकीय सेवेत असताना मनाजोगे सामाजिक कार्य करताना काही बंधने असतात, भुजंगराव या बाबतीत असे सुदैवी की, शासकीय सेवेच्या कार्यकाळात यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांसारखे पारखी नेतृत्व लाभले होते, तर पद्मविभूषण गोविंदभाईंसारखी अतिशय तळमळीने मराठवाड्याच्या विकासाला वाहून घेतलेल्या मंडळींची त्यांना निवृत्तीनंतर प्रदीर्घ काळ सोबत लाभली. त्याच संस्कारांचे परिणाम म्हणून की काय आज शंभराव्या वर्षात पदार्पण करतानासुद्धा भुजंगराव हे मनाने तरुण आणि खंबीरच आहेत. निवृत्तीनंतर भुजंगराव कुलकर्णी यांनी गोविंदभाईंच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. शासनानेही त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेत त्यांच्यावर अनेक प्रकारच्या जवाबदाऱ्या सोपवल्या. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, न्हावाशेवा बंदराचे अभ्यासप्रमुख, कुटुंब नियोजन अभ्यासगट प्रमुख, मागास जिल्हे अभ्यासगट अध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, बॅकलॉग समितीचे अध्यक्ष तर सिंचन आयोग, कापूस एकाधिकार, अनुशेष अभ्यासक दांडेकर, उत्पन्न बाबींची अभ्यास समिती, राज्य नियोजन मंडळ, तांत्रिक शिक्षण अनुशेष समिती, नोकऱ्यातील अनुशेष शोध समिती, विद्यापीठ स्थापना समिती यासारख्या अनेक समित्यांचे ते सदस्य होते. एका परीने निवृत्तीनंतरही त्यांनी विविध समित्यांवर, मंडळांवर तब्बल २६ वर्षे अर्धशासकीय कामच केले. गोविंदभाईंमुळे भुजंगराव सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आले आणि कायमस्वरूपी ते या संस्थेचे होऊन गेले. संस्थेचे ते तब्बल २३ वर्ष उपाध्यक्ष होते. धर्माचे अवडंबर न माजवता धार्मिक वृत्तीने जगणे त्यांनी अंगीकारलेले असल्यामुळे जेव्हा सरस्वती भुवनच्या इमारतीचे काम पूर्ण झाले तेव्हा नव्या वास्तूची वास्तुशांती झाली पाहिजे असे शाळेत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटत होते. मात्र संस्थाध्यक्ष बापूसाहेब काळदातेंनी वास्तुशांतीस नकार दिला. मात्र पालकांची अडचण ओळखून भुजंगरावांनी वास्तुशांतीला केवळ मान्यताच दिली नाही तर स्वतः प्रत्येक धार्मिक विधीमध्ये सहभागही घेतला. आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, नियमित योगासने, आयुष्यभर शाकाहार, मद्यपान, धूम्रपानापासून कायम दूर, कोणत्याही कामात सतत गुंतवून घेण्याची सवय, पुस्तक वाचन आणि लेखन हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. चार प्रकारचे प्रत्येकी १३ पत्ते असतात. यात डाव येण्याची लाखात एकदाच वेळ येते. तुमच्या वाट्याला चांगले पत्ते असतील किंवा नसतीलही. मात्र हातात आहे त्या पत्त्यावर चांगल्यात चांगला डाव खेळणे आपल्या हातात असते. ब्रिजमधील हेच कौशल्य जीवनातही वापरावे लागते, अशा शब्दांत भुजंगराव आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात.

यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त 'जीवनशैली आणि हृदयरोग' या विषयावरती व्याख्यान



नाशिक : यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पूर्वसंध्येला 'जीवनशैली आणि हृदयरोग' या विषयावर डॉ. मनोज चोपडा (ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ) यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे होईल. या कार्यक्रमाला अधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय केंद्र, नाशिक यांच्या कडून करण्यात आले आहे. 

Friday, 17 November 2017

‘चित्रपट चावडी’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘द मॅन विदाऊट पास्ट’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार 18 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध फिनलँडचे दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘द मॅन विदाऊट पास्ट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे दाखविण्यात येणार आहे.
फिनलँडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकी कौरीस्माकी हे त्यांच्या सहज सुंदर, हलक्या फुलक्या, नर्मविनोदी परंतु तितक्याच चमत्कृतीपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रमुख पात्रे सर्व सामान्य फिनलँडर असतात. सर्व सामान्यांची सुख:दुखे:, त्यांच्या जीवनातील चढउतार ते तटस्थपणे नेटकेपणाने टिपतात. हा चित्रपट एका वेल्डरची गोष्ट आहे. काही चोरटे पार्कमध्ये त्याच्यावर हल्ला करतात. डोक्यावरील आघाताने मृत्यु व नंतर तात्पुरती विस्मृती आलेला चित्रपटाचा नायक जणु पुर्नजन्म घेऊन नवे आयुष्य शोधतो. त्यात गत आयुष्याच्या खुणा सापडतात का? हे जाणून घेण्यासाठी पहायला विसरू नका ‘द मॅन विदाऊट पास्ट’
2002 मध्ये फिनलँड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 97 मिनीटांचा आहे.
‘द मॅन विदाऊट पास्ट’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.
                                                                                     माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील
होणारे बदल शिकण्याची तयारी ठेवा - डॉ. अच्युत गोडबोले

सध्या जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. ते बदल शिकण्याची तयारी ठेवा अन्यथा त्या क्षेत्रातून तूम्ही बाहेर फेकला जाऊ शकता असं मत संगणक तज्ज्ञ संगणकतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी काल-आज-उद्या' या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत एकविसावे पुष्प, संगणकतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांचे 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी काल-आज-उद्या' या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला त्यांनी माहिती तंत्रज्ञान काय आहे हे गोडबोले यांनी विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले. त्यानंतर पुढील २० वर्षांत काय बदल होईल हे सांगू शकत असेही ते म्हणाले. १९६०, १९७०, १९८० आणि १९९० या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कसे बदल झाले आणि त्याचे परिणाम काय झाले या विषयावर सुध्दा त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले.
खासकरून त्यांनी १९८० च्या काळात घडलेल्या या गोष्टी सांगितल्या, पर्सनल संगणक तयार झाला तो ही कमी आकाराचा, त्यानंतर तो घरोघरी दिसायला लागला. माऊस आला आणि त्यानंतर लोकांचा संगणकावरचा विश्वास वाढला. 

Thursday, 16 November 2017

२५ नोव्हेंबरला वार्षिक शिक्षण परिषद

शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक शिक्षण परिषद आयोजीत केली आहे. या परिषदे मध्ये सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ सकाळी  ९.३० ते ५.३० या वेळेत रंगस्वर' चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान, मुंबई, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई येथे होईल. या कार्यक्रमामध्ये 'शिक्षण विकास मंच' चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे आणि बसंती रॉय उपस्थितांना मार्गदर्शन करतील.    

Tuesday, 14 November 2017

व्हेज बिर्याणी पुलाव महोत्सवाचा शानदार समारोप


नाशिक : रविवारचा सुट्टीचा दिवस, गप्पा, मित्रपरिवार, कुटुंबियांचा ओघ विश्वास लॉन्सवर सुरू होते. बिर्यानी अनोखा स्वाद घेत वातावरण आनंददायी दिसत होते. बिर्याणी, पुलाव बनवण्यासाठी पध्दत आणि चवीनं खाण्याची मौज अनोखी होती. टमाटा, कांदा, मिरचीचा वापर आणि त्यातुन अस्सल महाराष्ट्रीयन मेनू खवय्यांसाठी अनोखी मेजवानी होती. 
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेज बिर्याणी पुलाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सावाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. महोत्सवाला अंदाजे अठरा हजाराहून अधिक खवय्यांचा प्रतिसाद दिला.