Saturday, 30 November 2019

मोफत प्रथमोपचार व सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम

click here, to watch full video

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि AAA हेल्थकेअरच्या वतीने फर्स्ट एड आणि सीपीआर फ्री ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र महिला व्यासपीठच्या कार्यकारी संयोजिका ममता कानडे, AAA हेल्थकेअर च्या संस्थापिका डॉ. रसिका, डॉ. कामत उपस्थित होते. डॉ. रसिका यांनी AAA हेल्थकेअर विषयी माहिती दिली. पुढे डॉ. कामत यांनी first aid विषयी माहिती देताना घरच्या घरी उपाय करताना कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी करु नये याविषयी माहिती दिली. तसेच heart attack, stroke, heart failure आणि CPR विषयी प्रेझेंटेशनद्वारे आणि प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.
शेवटी डॉ. कामत यांनी उपस्थितांना CPR प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित प्रत्येकाने वैयक्तिक करून पाहिले.



 


Friday, 29 November 2019

बाल दिनानिमित्त सायबर सुरक्षा आणि बाल विश्व याविषयावर जाणीवजागृती कार्यक्रम…

विकास अध्ययन केंद्र आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने नॅशनल उर्दू हायस्कूल, जोगेश्वरी, मराठा हायस्कूल, चौराहा, श्री सरस्वती भुवन प्रशाळा, वेनुताई चव्हाण हायस्कूल, एमजीएम संस्कार विद्यालय आणि शारदा मंदिर कन्या शाळा येथे बाल दिनानिमित्त इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत सायबर सुरक्षा आणि बाल विश्व याविषयावर आठवडाभर जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मूल सोशल मीडिया कोणता वापरतात हे जाणून घेतले. तेव्हा टिकटॉक वापरणारे मुले सगळ्यात जास्त होती. बरेच विद्यार्थी फेसबुक आणि टिकटॉकचे युजर्स आहेत. फेसबुक फ्रेंडस किती आहेत हे जाणून घेतले असता १००० ते १२०० चा आकडा मुलांनी सांगितला. आपल्या देशात सायबर पॉलिसी आहे का?, कायदा कोणता आहे? असे प्रश्न मुलांनी विचारले. मोबाइल आणि इंटरनेटच्या वापराने मुलांचे ज्ञान अफाट आहे, अशी माहिती रेनूका कड यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, मुलांमध्ये टिकटॉकचा वापर जास्त प्रमाणात आहे. १५ दिवसांत एकूण ३०० व्हिडिओ मुलांकडून टाकले जातात. एका दिवसात ही मूल जवळपास २० व्हिडिओ शेयर करतात. टिकटॉक विडिओला जास्तीत जास्त लाईक्स मिळविण्यासाठी ही मूल अनेक उपाय करतात.




Thursday, 28 November 2019

तुषार गांधी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान...


समाजाने नीतीमूल्यांवर अढळ श्रद्धा ठेवावी..
तुषार गांधी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान...
नांदेड : महात्मा गांधी यांचे विचार जगाला आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. महात्मा गांधींनी विचार आणि तत्व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. आजचा समाज त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून बघत असेल तर समाजाने नीतिमूल्यावर अढळ श्रद्धा ठेवताना जे चांगले आहे ते चांगले आणि जे वाईट आहे त्या विरोधात सर्वांनी मिळून आवाज उठवलाच पाहिजे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त तुषार गांधी याचे 'गांधीजींना व त्यांच्या विचारांना आपणास कसे जोडता येईल' या विषयावर शंकरराव चव्हाण सभागृहात व्याख्यान पार पडले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नांदेड विभागाचे अध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम, उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, बापू दासरी, देविदास फुलारी, डॉ. गीता लाठकर, मनोरमा चव्हाण, कल्पना डोंगळीकर यावेळी उपस्थित होते.






Monday, 25 November 2019

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ प्रदान...


कराड, दि. २५ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते, माजी कृषी मंत्री, भारत सरकार मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे मा. शरद काळे, मा. अरुण गुजराथी, डॉ. अनिल काकोडकर, मा. राम खांडेकर, डॉ. सदानंद गोडसे, मा. दिलीप माजगावकर, मा. आ. बाळासाहेब पाटील, मा. सौ. सरोज (माई) पाटील, मा. मीनाताई जगधने, मा. खा. श्रीनिवास पाटील, मा. कल्लाप्पाआण्णा आवाडे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील, अॅड. रवींद्र पवार, मा. आबासाहेब देशमुख, मा. अरुण लाड, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत, प्राचार्य डॉ. माहन राजमाने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मा. प्रभाकर देशमुख उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील अनेक घडामोडी मी जवळून पाहिल्या आहेत. त्यांच्या राजकारणाची जडण-घडण मी अनुभवली आहे. ते उदारमतवादी होते. अशा महान व्यक्तीच्या नावाने दिला जाणार पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. मिळालेल्या पुरस्कारातील एक लाख रुपये माझी मातृसंस्था रयत शिक्षण संस्थेला देत आहे. तसेच इचलकरंजी येथील वाचनालयाच्या इमारतीसाठी एक लाख रुपये देत आहे, असे त्यांनी जाहीर केले.
मा. शरदचंद्रजी पवार म्हणाले की, आजचा दिवस भाग्याचा आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारा व त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी राज्याचे व देशाचे नेतृत्व केले. आंतराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे नेतृत्व केले. चव्हाण साहेब उत्तम वाचक होते, साहित्यिक होते. अशा व्यक्तिच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले, शेतकरी कामगार प्रश्नांसाठी अविरत कार्यरत राहिले, सहकार खात्याचा सखोल अभ्यास, स्वतःच्या कामापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारे व कर्मवीर आण्णांच्या विचारांशी बाधिलकी माणून कर्मवीरांचे विचार अमलात आणणारे ज्येष्ठ विचारवंत मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना पुरस्कार बहाल करताना मनस्वी आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. अरुण गुजराथी यांनी केले. यावेळी राम खांडेकर लिखित सत्तेच्या पडछायेत या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. मानपत्राचे वाचन शरद काळे यांनी केले. यावेळी राम खांडेकर, डॉ. अनिल काकोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुढील वर्षीचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्रो. अभिजीत बॅनर्जी यांना घोषित करण्यात आला. या समारंभास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी शरद काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रेश्मा व प्रा. डॉ. नंदिनी रणखांबे यांनी केले.



Sunday, 24 November 2019

संविधान दिवस...


भारतीय संविधानाला ७० वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने विद्यार्थी मित्र समिती, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नव महाराष्ट्र युवा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. यशवंत क्षीरसागर, अध्यक्ष, साने गुरुजी बालविकास मंदिर व प्रा. आनंद देवडेकर, संपादक, सध्दम्म पत्रिका यांचे व्याख्यान मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्रौ ७ वाजता भारतीय घटनेचा सरनामा स्तंभ चौक, पोलीस स्मारक मैदानाच्याजवळ, नवी बि. डी. डी. चाळ १ समोरील, नायगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे, ही विनंती.

सर्वसामान्य माणसाची आर्थिक व सामाजिक सुरक्षितता जपणे देशापुढे आव्हान…


सर्वसामान्य माणसाची आर्थिक व सामाजिक सुरक्षितता
जपणे देशापुढे आव्हान

  - यमाजी मालकर
नाशिक (दि. २४) : जागतिकरणाचा वेग प्रचंड वाढला होता आणि त्यासोबत भारताचा आर्थिक विकासाचा दर कमी होता. यांची सांगड घालणे आपल्याला अवघड गेले. त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला आणि त्यातूनच कृषी मालाला कमी भाव, शेतकरी आत्महत्या यांचे प्रमाण वाढले. परकीय चलन कमी आले. लोकसंख्येची अनियमित वाढ झाली आणि त्याचा स्वाभाविक परिणाम अर्थ व्यवस्थेवर झाला आहे. सरकारी धोरणे आणि आर्थिक व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे हे आज देशापुढे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्या सर्वसामान्य माणूस आणि भारतीय अर्थव्यवस्थाया विषयावरील व्याख्यानाचे आयोजन अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले होते.
मालकर पुढे म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर हा फार मोठा वर्ग आपल्या देशात आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीय हा वर्ग आर्थिक विकासात महत्त्वाचा घटक आहे. सर्वसामान्य माणसाची या अर्थव्यवस्थेत दखल घेणे व त्याला आर्थिक पत मिळवून देणे, त्याला सामाजिक सुरक्षितता देणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांची विविध पातळ्यांवर आर्थिक कोंडी होऊ न देणे महत्त्वाचे आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड या विषयी समाजात आर्थिक सुरक्षितता म्हणून एक नवा दृष्टीकोन येत आहे तो महानगरांबरोबरच गावपातळीवर हयेत आहे. हा एक बदल दिलासा देणाराही आहे. ऑनलाईन मार्केटींगकडेही लोक आकर्षित होत आहे.

शालेय शिक्षणात वाचन संस्कृती वाढावी...

click here, to watch full video...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, शिक्षण विकास मंच आयोजित १० वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आज मुंबई येथे शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती या विषयावर वर संपन्न झाली.
शिक्षण विकास मंच च्या एकूण कामाचा आढावा मुख्य सल्लागार मा. बसंती रॉय यांनी घेतला. जेष्ठ शिक्षणतज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे प्रास्ताविक मांडून हा विषय घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ग्रंथालीचे संस्थापक मा. दिनकर गांगल यांनी परिषदेच्या विषयावर अनुभवात्मक बीजभाषण केले. वाचन संस्कृती का व कशी वाढेल? याचेही विवेचन केले. बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी लहान मुलांचे वाचन यावर उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला. यानंतर मुलांमध्ये वाचनाची आवड कशी वाढवावी..?’ या विषयावरील परिसंवादामुळे भरपूर काही शिकायला मिळालं. या परिसंवादात  बालभारती किशोरचे संपादक सन्माननीय किरण केंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार, गीतांजली देगावकर, अरविंद शिंगाडे, आणि वयमच्या संपादिका शुभदा चौकर आदीच्या अनुभवसंपन्न चर्चेमुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी होऊ, यासंदर्भातील  समाधान निर्माण झाले.
भोजनोत्तर सत्रात विद्यार्थी सोहम कुलकर्णी (नाशिक) यांनी आपले वाचन कसे घडत गेले, याचे अनुभव सांगितले. वाचन लोकल ते ग्लोबल या विषयावर मा. विजय जोशी (स्वित्झरलंड) यांनी आपले विचार व्यक्त केले.
मा. अजित तिजोरे यांनी शालेय मुले काय वाचतात? याचा मूल्यमापनात्मक आढावा सादर केला. यानंतरच्या खुल्या सत्रात राज्यभरातील प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले.
मा. जयवंत कुलकर्णी, मा. संभाजी पाटील, संपदा जोशी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आजच्या परिषदेला राज्यभरातून एकूण ३०० प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षण विकास मंचचे समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी उपस्थितींचे आभार मानले.



ग्रामीण भारताचा नवा चेहरा : ग्रामसंस्कृती पर्यटन विषयावर व्याख्यान...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ वी पुण्यतिथीनिमित्त सोमवार २५ नोव्हेबर २०१९ सकाळी ११ वा. ग्रामीण भारताचा नवा चेहरा : ग्रामसंस्कृती पर्यटन या विषयावर मनोज हाडवळे ( लेखक व कृषी पर्यटन तज्ज्ञ, पूणे ) हे व्याख्याते असून आईननस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएण परिसर, औरंगाबाद येथे होणार आहे.

‘International Year Of Periodic Table’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा केंद्र ठाणे आणि रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत व्याख्यानमालेचे चौथे पुष्प आयोजित करण्यात आले आहे. डॉ. अर्णब भट्टाचार्य, शास्त्रज्ञ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई हे ‘International Year Of  Periodic Table’ या विषयावर २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत रूम नं. ३४, ३रा मजला, रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर येथे मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती.

Thursday, 21 November 2019

डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०१९ जाहीर...


डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०१९ जाहीर...
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्याकडून दरवर्षी उत्कृष्ट शैक्षणिक विषयांवरील पुस्तकांची निवड करून त्यांचे लेखक/संपादक आणि प्रकाशक यांना डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. २०१९ च्या डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कारासाठी पुढील दोन पुस्तकांची निवड समितीने एकमताने निवड केली आहे:-
१. पुस्तकाचे नाव:- मुलांचे ग्रंथालय,
    संपादक:- डॉ. मंजिरी निंबकर
     प्रकाशक:- ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे
२. पुस्तकाचे नाव:- नवी पालकनीती
     लेखक :- रेणू दांडेकर
     प्रकाशक :- सुरेश एजन्सी, पुणे
पुरस्कार वितरण रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित होणाऱ्या शिक्षण परिषदेत उद्घाटनप्रसंगी (सकाळी १०.०० ते ११.३० या कालावधीत)  मा. सुप्रिया सुळे, निमंत्रक, शिक्षण विकास मंच आणि कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई  यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. लेखक/संपादक यांना पाच हजार रुपये रोख, गौरवपत्र आणि स्मृतिचिन्ह ; तर प्रकाशकांना गौरवपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. 
पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.



Wednesday, 20 November 2019

नवी मुंबई केंद्रातर्फे ‘यशवंराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे

 


यशवंराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९
नवी मुंबई, २१ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा यशवंराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९ या वर्षी नेरुळच्या 'युथ कौन्सिल' ह्या संस्थेस मा. दिलीप वळसे -पाटील यांच्या हस्ते शनिवार, दि. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्टर्लिंग कॉलेज हॉल सेक्टर १९, नेरुळ येथे समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
या प्रसंगी प्रख्यात कविवर्य अशोक नायगावकर यांचा कवितेचा धमाल कार्यक्रमही होणार आहे.
तरी, या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

Sunday, 17 November 2019

सृजन विभाग – प्राण्यांशी मैत्री कार्यशाळा


मानव अभ्यास संघ, महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सृजन विभागाद्वारे प्राण्यांची मैत्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मासे, बेडूक, खेकडा, उंदीर,  हॅमस्टर, कोंबडी, कडकनाथ, बदक, लव बर्ड, आफ्रिकन पोपट, सिल्की कोंबडी, विंचू, घार, इगवाना, इ. प्राण्या-पक्ष्यांशी मुलांनी मैत्री केली. पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी ही कार्यशाळा मुलांना प्रेरणा देऊन गेली. यावेळी मनपा शाळेचे शिक्षक, सर्पमित्र सुनिल कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.






Saturday, 16 November 2019

अमृता जोशीच्या स्वरांतून आर्ततेचा प्रभावी अविष्कार

सूर विश्वास

नाशिक (दि. १६) : स्वरांची कोवळी रिमझिम मधून निथळणारे अनवट स्वर, शब्दातील लालित्य, आर्तता यांचा अनोखा अविष्कार सूरविश्वासच्या मैफलीत सादर झाला. जगण्याचं आर्त, परंपरा याचं संचित घेऊन मैफल मनाचा ठाव घेऊन गेली. सदरची मैफल गायिका गीता माळी यांना समर्पित करण्यात आली.
रसिक कुलकर्णी (तबला), कृपा परदेशी (संवादिनी), जास्वंदी जोशी (तानपुरा), केतकी गोरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
विश्वास गृ्रपतर्फे सूरविश्वासचे दहावे पुष्प, अमृता जोशी यांनी गुंफले. मैफलीची सुरूवात बिलासखानी रागाने केली. बंदिश होती बिसरावे काहे बलमास्वरांचा धारदारपणा आणि तितकेच माधुर्य समोर आले. त्यानंतर छोटा ख्याल सादर केला. दिन कटत रैनमनाचं रितेपण आणि हळवेपण याचं प्रखर दर्शन यातून अमृताने घडवले.
लोकगीत आणि शास्त्रीय संगीत यांचा अनोखा मिलाफ संगीतात आला आहे. त्याचीच अनुभूती राजस्थानी मांड या गीत प्रकारातून सादर केली. सावरीयाया शब्दांतून राजस्थानी जीवन व्यवहारांचे परंपरांची जाणीव व्यक्त झाली.
भावभक्ती व नामस्मरणातून वातावरणात चैतन्य निर्माण झाले. भजन होते गिरीधर के घर जाऊयानंतर मैफलीने परमोच्च बिंदू गाठला तो भैरवीने. शब्द होते जीवन के दिन चार’.
कार्यक्रमाची सुरूवात दिवंगत गायिका गीता माळी यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. साथसंगत करणार्‍या कलावंतांचा सन्मान मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त स्मिता गायधनी, राजश्री शिंपी, नाट्य समीक्षक एन. सी. देशपांडे, अ‍ॅड. प्रेरणा देशपांडे, सुवर्णा महाबळ यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.




Friday, 15 November 2019

विज्ञानगंगाचे चव्वेचाळीसावे पुष्प ‘अनुवंशिक जनुकशास्त्र' संपन्न...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत अनुवंशिक जनुकशास्त्र' (Genetic Science) या विषयावर सागरिका दामले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी जनुकशास्त्राविषयी माहिती दिली. आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या वातावरणात वावरतो त्याचा परिणाम आपल्या जनुकांवर होत असतो. Epigenetics म्हणजे काय तर आपल्या जनुकांनी कसं वागायचं हे त्यांना ते सांगत तसच DNA म्हणजे काय?, RNA म्हणजे काय?, जनुक म्हणजे काय? ती कशी काम करतात? याबद्दल त्यांनी माहिती दिली. शेवटी प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.